हिवाळ्यात तापमान कमी होत असताना आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसतात. उच्च रक्तदाब, आर्थरायटिसच्या रुग्णांना या काळात जास्तच त्रास होतो. थंडीमध्ये आपल्या राहणीमानात बदल होतात. बाहेरच्या थंड हवेमुळे अधिकाधिक वेळ घरात जात असल्यामुळे हालचालींवर र्मयादा येतात. खाण्यापिण्याच्या पद्धती बदलतात. चहा-कॉफीसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांचं सेवन वाढतं. गोड, तेलकट पदार्थ खाल्ले जातात. या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. थंडीत शरीराचं सर्वसामान्य तापमान टिकवून ठेवण्यासाठी रक्ताभिसरण प्रक्रिया आणि रक्तप्रवाहावर बर्याच र्मयादा येतात. परिणाम रक्तदाब वाढतो. थंडीत हृदयाशी संबंधित तक्रारी वाढतात. भारतात ह्दयविकाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. हिवाळ्यात जंक फूड, गोड, तेलकट पदार्थांचं सेवन अधिक प्रमाणात होत असल्यामुळे आणि शारीरिक हालचालींवर र्मयादा आल्यामुळे कोलेस्टरॉलचं प्रमाण वाढतं. वजन वाढण्याची शक्यता असते. या सगळ्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो. सर्वसाधारण निरोगी व्यक्ती अशा बदलत्या वातावरणात तग धरू शकते. मात्र हृदयविकार किंवा हृदयाशी संबधित तक्रारी असणार्यांनी या दिवसात अधिक काळजी घ्यायला हवी.
सर्वसाधारपणे उन्हाळ्यात रक्तदाब कमी असतो आणि हिवाळ्यात तो वाढतो, अशं तज्ज्ञ सांगतात. थंड वातावरणात धमन्या आणि रक्तवाहिन्या आकुंचिन पावत असल्यामुळे हृदयाला कमी रक्तपुरवठा होऊ लागतो. यामुळे रक्तदाब वाढतो, रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तसंच हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठाही कमी प्रमाणात होऊ लागतो. या सगळ्यामुळे रक्तदाब वाढू लागतो. थंडीमध्ये शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी हृदयाला जास्त ताकदीने काम करावं लागतं. यामुळे हायपोथेमिया होऊ शकतो. या आजारात हृदयाच्या स्नायूंना दुखापत होऊ शकते. थंड वातावरणासोबतच इतर काही कारणांमुळेही रक्तदाब वाढू शकतो. बर्फवृष्टी, जोरात वाहणारे वारे, वातावरणातील दाब अशा कारणांमुळेही रक्तदाब वाढू शकतो. आद्र्रता, आकाशात झालेली ढगांची दाटी या कारणामुळेही रक्तदाब वाढू किंवा कमी होऊ शकतो. ज्येष्ठांना थंडीत जास्त त्रास होऊ शकतो. म्हणूनच उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी रक्तदाब नियमितपणे तपासून घ्यायला हवा. रक्तदाबातला छोट्यातला छोटा बदल टिपल्यास बराच त्रास वाचू शकतो. रक्तदाब वाढल्याचं लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टर औषधांमध्ये काही बदल करून देऊ शकतात. उच्च रक्तदाब ही किरकोळ बाब मानून गप्प बसू नये. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यायला हवा. आहारविहाराच्या सवय बदलून उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येईल. यासाठी आहारात बीट, दही, भोपळ्याच्या बिया, मेथीदाणे, लसूण अशा पदार्थांचं सेवन करता येईल. थंडीत उच्च रक्तदाबाची समस्या वाढते हे आपण जाणून घेतलं. हे टाळण्यासाठी शरीरावर अधिक ताण पडू देऊ नका. अती थंड वातावरणात बाहेर जाणं टाळा. पहाटे किंवा फार सकाळी फिरायला जाऊ नका. हृदयाला फार कामाला लावू नका. घराबाहेर पडताना स्वेटर, हातमोजे नक्की घाला. शरीराला उष्णता मिळवून दिल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023