ठाण्याचे कवी सुधीर शेरे यांचा ‘वेस’ हा पहिलाच काव्यसंग्रह. काव्यसंग्रह पहिला जरी असला तरी त्यातील कविता अनुभवताना पहिलेपणाच्या खुणा कुठेच जाणवत नाहीत, हे विशेष! या काव्यसंग्रहात एकंदर ३९ कविता आहेत. या सर्वच कविता त्यांच्या जीवनाबद्दलच्या वैचारिक आणि भावनिक जाणिवांतून आकाराला आल्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या परिसरात कवीचा जन्म झाल्याने आणि नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाल्याने या दोन्ही ठिकाणचे जीवनानुभव त्यांच्या कवितेतून चित्रित होतात. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या संवेदनशील मनाला जे जाणवले त्या संवेदनांना काव्यमय रुप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अर्थात, त्यांचा हा प्रयत्न निश्चितच काव्यप्रांताची वेस ओलांडणारा आहे. यमक आणि मुक्तछंद या काव्यप्रकारात आविष्कृत झालेली, समतेचे गीत गाणारी ,मानुसकीचे मूल्य जपणारी, देशप्रेमाने ओथंबलेली आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी उत्कृष्ट रचना म्हणजे ‘वेस’ हा काव्यसंग्रह होय.
या काव्यसंग्रहाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आशय आणि रचनापद्धती. आशयाचा विचार करता कवीने विविध विषय समर्थपणे हाताळल्याचे जाणवते. त्यात आई-वडील, शिक्षण, राजकारण, पर्यावरण, महापुरुष, निसर्गविषयक कविता व सामाजिक जाणिवेच्या कवितांचा समावेश होतो. परंतु बहुतांशी कवितांचा विषय मात्र समाजसुधारक, राष्ट्रपुरुष व महापुरूषांबद्दलचा वाटणारा अभिमान हाच आहे. त्यामुळे या राष्ट्रपुरुषांबद्दलचा कवींच्या मनात असलेला नितांत आदरभाव व त्यांच्याविषयी वाटणारी कळकळ हीच त्यांच्या काव्यलेखनामागील प्रमुख प्रेरणा आहे. महापुरुषांच्या कर्तृत्वाला शब्दबद्ध करणं ही त्यांची काव्यविषयक भूमिका आहे. या कवितांमधून कवींची समाज हिताची दृष्टी किती व्यापक आहे हे जाणवते.
आविष्कार पद्धतीचा विचार करता त्यांच्या कवितेवर बोरकर आणि बहिणाबाईंच्या कवितेचा गडद प्रभाव जाणवतो. याचे कारण म्हणजे या काव्यसंग्रहातील बहुतांशी कविता यमकप्रधान असल्याने त्या सुरावर किंवा चालीवर गाता येतात. त्यामुळे या कवितेला एक लय व नाद प्राप्त होतो. गेयता, कोमलता आणि त्यातून निर्माण झालेले नादमाधुर्य यामुळे ही कविता पुन:पुन्हा गुणगुणाविशी वाटते. ‘माय’ आणि ‘बाप’ या दोन्ही कविता याचे उदाहरण म्हणून देता येईल. ‘माय’ नावाच्या कवितेत ते लिहितात …
- ”माझ्या मायच्या पिरतीची,
- ख्याती आकाश पाताळात,
- असं पिरेम पिकतं,
- माझ्या मायच्या मळ्यात”
या कवितेतून कवींचा आईविषयीचा कृतज्ञताभाव चित्रित होतो. आईचे वात्सल्य, तिचे कुटुंबासाठी झिजणे, तिचा त्याग आणि तिच्यामुळेच कवीच्या अस्तित्वाला प्राप्त झालेला अर्थ या सगळ्या बाबींचे ग्रामीण बोलीतून केलेले वर्णन रसिकांच्या पसंतीस उतरणारे आहे. कवी यशवंत, माधव जुलियन, फ. मु. शिंदे यांनी आईविषयी कविता लिहिल्या आणि त्यातील आशयसौंदर्य आणि गेयतेमुळे त्या लोकप्रिय झाल्या. याही कवितेला आशयाचे सौंदर्य आणि गेयता प्राप्त झाल्याने तिच्यात लोकप्रियतेचे सामर्थ्य दडल्याचे जाणवते.
स्वातंत्र्य चळवळ आणि समाजसुधारणा चळवळींचा कवींच्या लेखनशैलीवर प्रभाव जाणवतो. गौतम बुद्ध, चार्वाक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक ही कवींची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे या महापुरुषांबद्दलचा अपार श्रद्धाभाव या काव्यसंग्रहाच्या पदोपदी जाणवतो. या महापुरुषांनी नव्या समाजाच्या निर्मितीसाठी आपला देह चंदनासारखा झिजवला. त्यांच्यामुळेच इथे सामाजिक लोकशाही अवतरली. ‘माझी सावित्री माऊली’ या कवितेत सावित्रीबाईंचे ऋण व्यक्त करताना कवी लिहितात…
- “माझी सावित्री माऊली साऱ्या वंचितांची माय,
- देह झिजवला तिनं,
- आज आम्ही खातो साय”
चूल आणि मूल एवढ्यापुरतेच बंदिस्त असणाऱ्या भारतीय स्त्रीला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्याचे पवित्र कार्य सावित्रीबाईंच्या हातून घडले. साधी-सोपी परंतु अर्थपूर्ण आणि प्रवाही रचना हे शेरे यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही आपल्या लोकशाहीची मूलतत्त्वे आहेत. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे मात्र अजूनही दीनदुबळ्यांच्या वस्तीत ज्ञानाची गंगा अवतरली नसल्याची खंत कवी मनाला जाणवते. आपल्या समाजसुधारकांनी जी स्वप्ने पाहिली ती तळागाळात रुजलीच नाहीत. पंचवार्षिक योजना, शिक्षण हक्क कायदा या सगळ्या फसव्या योजना आहेत. शेवटी ज्यांच्याकडे पैसा त्यांनाच शिक्षण हे भयाण वास्तव कवीला अस्वस्थ करते. म्हणून ‘गरिबांची शिक्षण तहान का म्हून नाय भागली?’ हा कवींचा त्यांच्या अंतर्मनाशी चाललेला संवाद वाचकाला अंतर्मुख करतो.
राजकारण हाही कवींच्या चिंतनाचा विषय आहे. लोकशाही, पेच ते शिरपेच, अशी लोकशाही आज यांनी गाडली या कवितांतून आपल्या देशाच्या राजकारणाचे वास्तव कवी मांडतात. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो की मित्र. राजकारण फक्त सत्तेभोवतीच फिरते. म्हणूनच ‘पेच तेच शिरपेच’ या कवितेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री नाट्याचे खुमासदार वर्णन येते. राजकारण्यांनी राजकारणाची व्याख्या बदलली. येथे जनतेच्या हितापेक्षा स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा मानला जातो. निवडणुकांतील गैरप्रकाराने लोकशाहीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आपली लोकशाही धनदांडग्यांच्या हातातील बाहुले बनली आहे. जातीच्या आणि धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण झाल्याने आणि साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर वाढल्याने आपल्या लोकशाहीची पवित्र मूल्ये पायदळी तुडवल्या गेल्याची खंत कवी मनाला बोचते. या सगळ्या परिस्थितीला राजकारणी जसे जबाबदार आहेत तसेच मतदारही जबाबदार आहेत. म्हणूनच कवी लिहितात..
- “याची देही याची डोळा
- पाहिले मरण
- मतदार स्वतःचे रचतो सरण”
सुजाण नागरिक ही लोकशाहीची ताकद आहे. परंतु तोच विकला गेल्याची विमनस्क जाणीव कवीला त्रस्त करते.या काव्यसंग्रहाचा आणखी एक विशेष म्हणजे निसर्ग व पर्यावरणविषयक कविता होय. या कविता वाचताना कवीच्या मनाचा कल बऱ्याचअंशी निसर्गाकडे व पर्यावरणाकडे असल्याचे जाणवते. या कवितेवर बोरकरांच्या कवितेचा प्रभाव जाणवतो. बेट, माझं कोकण, श्रावण, बेंदूर, आभाळ माया व पाणी या कविता निसर्ग व पर्यावरणाचे चित्रण करतात. कोकणचा निसर्ग आणि सह्याद्रीच्या कुशीतील कृषी संस्कृतीचे बेहोश करणारे वर्णन यात येते. त्याबरोबरच तेथील मानवी जीवनाचे चित्रणही ही कविता करताना दिसते. या कवितेतील निसर्ग मानवी रूप धारण करतो. हा निसर्ग केवळ साधन म्हणून, अनुभव खुलवण्यासाठी येत नाही तर त्यांच्या अनुभवाचा एक भाग म्हणून येतो. ‘बेट’ ही त्यांची नितांत सुंदर अशी कविता आहे. या कवितेत ते लिहितात…
- ”निळं जलं सभोवार,
- भुई वेढली पाण्यानं
- बेटावर घरं छान,
- वेढा घातला नदीनं
- घरातून उगवली,
- पायवाट चिमुकली
- तृणफुलांनी सजून,
- नदीकाठी विसावली “
अत्यंत लयबद्ध व नादमय अशी ही कविता आहे. सभोवार निळेशार जल, पाण्याने वेढलेले बेट, नागमोडी वळणे घेत वाहणारी नदी आणि तृणफुलांनी सजलेल्या पायवाटेचे नदीकाठी विसावणे यातून निसर्गाचे लोभस चित्र कवीने रेखाटले आहे.त्यांची पर्यावरणविषयक कविता चिंतनाच्या डोहातून वर येते. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या विध्वंसाला माणूसच जबाबदार असल्याचे कवीला वाटते. ‘वेस’ ही मानव आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष उभा करणारी कविता आहे. मानवाने भौतिक प्रगती केली पण पर्यावरणाचा बळी देवून. प्रगतीच्या नावाखाली माणसांनी जंगलांची कत्तल केली आणि पशूंना उघड्यावर आणले. अशावेळी पशू आणि मानव यांच्यात अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होतो. ‘निमित्त ह्या मरणाला, ओलांडली कुणी वेस?’ हा कवींचा प्रश्न वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो. सगळ्या चराचराला व्यापून असलेल्या निसर्गाचे मानवी जीवनाला वरदान मिळावे असा आशावादही त्यांच्या कवितेतून प्रकट होतो.
सुधीर शेरे यांच्या काव्यसंग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातून प्रत्ययाला येणारी दलित जाणीव. कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित साहित्याचे प्रेरणास्थान आहेत. डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ज्या कविता आहेत त्यातून दलित जाणिवेचा प्रत्यय येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून १९६० च्या दशकात निर्माण झालेल्या दलित कवितेतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह दिसून येतो. परंतु अलीकडे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया गतिमान झाल्याने संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे. त्यामुळे दलित कवितेची भाषाही आता बदलते आहे. सुधीर शेरे यांच्या कवितेतून व्यक्त होणारी दलित जाणीव ही इतर दलित कवितेपेक्षा वेगळी आहे. दलित समाजातील खदखदणारे समाजवास्तव ती अत्यंत संयत भाषेत व्यक्त करते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेश ही घटनाच मुळात कवीला क्रांतिकारी वाटते. हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणाऱ्या या घटनेचं वर्णन कवी ‘विद्यार्थी दिन ‘ या कवितेत करतात. प्रस्थापित समाजाने युगानयुगे दलितांना अज्ञानाच्या वेशीत कोंडून ठेवलं होतं. डॉ.आंबेडकरांच्या शाळाप्रवेशाने मात्र वंचितांच्या शिक्षणाची ही ‘वेस’ पहिल्यांदाच ओलांडली गेल्याचे कवीला वाटते. त्यामुळेच डॉ.आंबेडकरांना शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचा प्रत्यय आला. त्यांनीच दलितांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला. वंचितांच्या जीवनातील अंधःकार दूर करणाऱ्या या घटनेचे वर्णन करताना कवी लिहितात ..
- “तुझ्या शाळा प्रवेशाने
- दूर अंधार युगांचा
- दीनदुबळ्यांना मिळे
- नवा प्रकाश ज्ञानाचा”
डाॅ. आंबेडकर यांच्या प्रेरणेने दलित समाज शिकला; परंतु त्यांना अभिप्रेत असलेला समाज मात्र निर्माण होऊ शकला नाही, याची खंत कवी मनाला जाणवते. डॉ.आंबेडकरांनी दलित समाजाला ‘शिका,संघटित व्हा, नि संघर्ष करा’ असा कानमंत्र दिला. त्याप्रमाणे दलित समाज शिकला, मोठी पदे मिळवली मात्र तो स्वत्व गमावून बसल्याचे कवीला वाटते. सत्ता , स्वार्थ , सौदेबाजी, तडजोडी, पुढाऱ्यांचे क्षूद्र राजकारण यामुळे खऱ्या अर्थाने डॉ.आंबेडकरांचे विचार त्यांच्या अनुयायांत रुजलेच नाहीत. जे प्रश्न पूर्वी होते ते तसेच राहिले. या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी ते पुन्हा अवतारावेत असे कवीला वाटते. ते म्हणतात..
- “शिकलेला समाज तुझा
- हळूच प्रस्थापित झाला
- विसरून समाजसेवा
- न मानी समाजऋणाला
- लोचनांचे तू तयांच्या
- झणझणीत अंजन व्हावे “
आत्मभान गमावून बसलेल्या दलित समाजाला आणि कार्यकर्त्याला सावध होण्याचा संदेश ही कविता देते.महाराष्ट्र, मराठी भाषा, आणि देशाभिमान त्यांच्या कवितेतून ठसठशीतपणे व्यक्त होतो. येथील वेद आणि आयुर्वेद, शुरता आणि विद्वत्ता, ज्ञान आणि विज्ञान, भाषा आणि संस्कृती या भूमीतील संत-महात्मे आणि वीर पुरुषांच्या त्याग आणि बलिदानातून निर्माण झाल्याने त्याबद्दलचा अभिमान प्रत्येकाला वाटलाच पाहिजे,असे कवीला वाटते. परंतु शहरात वावरणाऱ्या आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या माणसाकडूनच आपल्या भाषा आणि संस्कृतीची हेळसांड होत असल्याचे दुःख कवीला बोचते. आपल्या मनाची अस्वस्थता व्यक्त करताना कवी लिहितात…
- “खेड्यातील लेकरं
- नित्य मला बिलगती
- शहरवाशी कधी मधी
- दूध मावशीचं पिती “
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या भाषा आणि संस्कृतीचे जतन व्हावे आणि संपूर्ण मानव जातीला एकमेकांना उपयोगी पडण्याचे बळ प्राप्त व्हावे अशी ‘प्रार्थना’ ते विश्व निर्मात्याकडे करतात. या प्रार्थनेतून त्यांच्या मनात असलेल्या उद्दात जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो.
मानवी जीवनातील व्यापकता, भव्यता आणि विरोधाभास शब्दबद्ध करणारी आणि नव्या समाजाचे स्वप्न पाहणारी वास्तवदर्शी कविता म्हणूनच ‘वेस’चा उल्लेख करावा लागेल. या काव्यसंग्रहास दिलेले ‘वेस’ हे काव्यमय शीर्षक समर्पक वाटते. अन्याय, शोषण आणि गुलामगिरीच्या मर्यादा ओलांडणारी ही वेस आहे. शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्षाचे प्रतीक म्हणून ती येते. शोषक आणि शोषित यांच्या संघर्षात अंतिमत: शोषकांचाच नायनाट होतो, हे कवीला सूचित करायचे आहे. या कवितेला लाभलेली गेयता, कोमलता आणि नादमाधुर्य यामुळे ती वाचकांच्या मनावर उत्तम संस्कार उमटविते. अर्थात, शब्दांच्या लयीमध्ये अर्थापेक्षा नादाला प्राधान्य मिळाल्याने व्यापक जीवनानुभव शब्दबद्ध करण्याची मर्यादाही त्यात जाणवते. सुधीर शेरे यांच्या या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे वाचक निश्चितच स्वागत करतील असे वाटते.
- —————————————————
- डॉ. नरसिंग वाघमोडे
- लातूर
- ——————————————–
- ‘वेस’
- कवी : सुधीर शेरे
- समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर
- मूल्य : ८० रु.
- ——————————————–