काहीच तासांवर नववर्ष सुरू होण्याचे बाकी आहे.प्रत्येकजण नव्या संकल्पना घेऊन नव्या योजना, आखण्या करत नववर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कुणाला करियर करायचे तर कोणाला छंद जोपासायचे असतात. मनसुबे रचत हरेकजण नव्या सालाचे स्वागत करतो.पण मनाला प्रश्न पडतो की प्रत्येकाचे इप्सित साध्य होते का? त्या दृष्टीने ते किती प्रयत्नशील असतात.तर अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोक संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतात.इतरजण नववर्ष आले नि गेले याची पर्वाच करत नाहीत.
नववर्षाच्या संकल्पना मनात ठेवून जीवनाचा आराखडा तयार करण्यात गैर नाही पण आळशी वृत्तीने काहीच काम होत नाही. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर लाथ मारीन तिथे पाणी काढता येते.नव्या पिढीला न मागताच सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे या समाजात राहताना समाजाशी आपणही काही देणं लागतो याचे सामाजिक भान नसते.तसेच सर्व गोष्टी सहज मिळाल्याने आपण काहीतरी करून दाखवू ही वृत्ती फार कमी युवकांच्यात दिसून येते. मुलांच्या मानाने हल्ली मुली सर्वच बाबतीत जास्त पुढारलेल्या किंवा जिद्दी असलेल्या दिसतात. मुलींच्या अंगी जात्याच समर्पणाची वृत्ती असल्याने त्या आपली सामाजिक जबाबदारी ओळखून त्या अनुषंगाने वागत असतात.
दरवर्षीप्रमाणे आता २०२१ साल मागे पडून नव्या सालाची सुरूवात होत आहे. आपण सर्वजण नव्या सालाचे स्वागत करण्यासाठी आतूर आहोत.आत्ता आपण कोरोनासारख्या घातक विषाणुच्या विळख्यातून बाहेर पडत आहोत. एकमेकांना धीर देत स्वच्छतेचे मार्ग अवलंबून सावरत आहोत. कोरोनाचे नवनवे स्ट्रेन आपणास संसर्ग करत आहेत.तरीही आपण फिनिक्स पक्ष्यांची भरारी घेत आहोत.मास्क,सॅनिटायझरच्या वापराने स्वतःची काळजी घेत आहोत. आगामी नववर्षाच्या नवनवीन संकल्पना मनात घोळवत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेत आनंद मिळवूया. कोरोनावर मात करून बहरलेल्या सृष्टीचा लाभ उठवू.
- होता गतकाल आपला
- कोरोनाने व्याप्त सारा
- जपूनीच आरोग्याला
- परतवून लावू माघारा
गुलाबी थंडीचा मस्त ऋतु आहे. शिवारे भाज्या, फुले आणि फळांनी फुललेली आहेत. नवनवीन पक्वान्न बनवून दु:खातूनच सुख शोधू आणि त्या क्षणांना ओंजळीत भरून घेऊ. मानव जात्याच हुशार आणि बुद्धिमानी सजीव आहे. प्रत्येक संकटाला आपल्या बुद्धीने परतवून लावण्यात वाकब्गार आहे. त्यामुळे चला नव्या दमाने नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करू.
- नववर्षाच्या देऊ सर्वांना
- आरोग्यासाठी शुभेच्छा
- मिळावी सुखसमृद्धीही
- ह्याच मनीच्या इच्छा
- सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835