अशी प्रचलित म्हण आहे की, सगळ्याची सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येते नाही. तसेच सगळे काही आपल्याला टाळता येत पण भूक ही टाळता येत नाही. भूक ही अन्नाने भागवावीच लागते. मग गरीब असो की, श्रीमंत. आज बरेच जण भारतात रात्रीचे जेवण जेऊ शकत नाही त्यांना उपाशीच झोपावे लागते. मग हे उपाशी झोपतात तरी कसे ? गरिबी ही माणसांच्या पाचवीलाच लागलेली आहे. गरिबी हटविण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण ते पूर्ण होऊ शकले नाही. भूक मिटविण्याचा एकमेव प्रर्याय आहे तो म्हणजे रोजगार, नौकरी व कामधंदा होय.
रोजगार प्राप्तीसाठी सर्वच जण प्रयत्न करतात, झगडतात. परंतु सर्वानाच रोजगार प्राप्त होईल असे नाही. रोजगार हा मुळातच कमी उपलब्ध होता. त्यात तो दवसें दिवस अधिक कमी होत चालला व लोकसंख्या वाढत चालली असे चित्र सर्वाना दिसून येत आहे. रोजगाराच्या संध्या प्राप्त करून घेणे ही प्रत्येक युवकाची इच्छा व अधिकार आहे. रोजगारावर वेळी वेळी आक्रमण होत गेले. त्याची सुरुवात ही यांत्रिकीकरणामुळे झाली. त्यात फार मोठी भर ही संगणकाने घातली. संगणकाने तर सर्वांचे रोजगार खाऊन टाकले. तो एका पेक्षा अधिक माणसांचे काम करू लागला. सगळीकडे संगणीकीकरण झाल्यामुळे बेरोजगारीच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली. हे सर्व काय थोडं होत होत तर त्यात कोरोनाची भर पडली.
कोरोना महामारीमुळे अक्षरशः हाहाकार झाला. बरेचजण बेरोजगार झाले. आज सगळीकडे मोठी विदारक परिस्थिती आहे. दिवसें दिवस भूक ही वाढत आहे. पण ही पूर्ण करण्यासाठी माणसाचे प्रयत्न फारच खुजे ठरत आहे.
कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केली होती. त्यांच्या अहवालात देशातील बेकारी २७.११ टक्के झाल्याचे म्हटले आहे.
या रिपोर्ट संदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात १५ मार्चपर्यंत भारतातील बेकारी ६.७४ टक्के इतकी होती तर ती ३ मे रोजी २७.११ टक्के इतकी वाढली होती. शहरात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २९.२२ टक्के असून कोरोनाचे जे रेड झोन आहेत तेथे बेकारी अधिक असल्याचे दिसून आले होते . ग्रामीण भागातील बेकारीही वाढत असून ती २६.६९ टक्के इतकी झाली आहे. २६ एप्रिलला शहरातील बेरोजगारी २१.४५ टक्के तर ग्रामीण भागातील टक्केवारी २०.८८ इतकी होती.
सीएमआयईच्या रिपोर्टनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरात लॉकडाऊनचा फटका जोरदार बसला असून हजारो सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग बंद झाल्याने लाखो श्रमिक, मजूरांचे हाल झाले. शहरात फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, रिक्षा चालक, अशा वर्गालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सीएमआयईच्या रिपोर्टनुसार देशातील सुमारे १२ कोटी २० लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागला असून त्यात छोट्या मोठ्या उद्योगात काम करणारे श्रमिक, फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, रिक्षा चालक, नाश्ता-चहा-कॉफी व अन्य खाद्य पदार्थांचा स्टॉल लावणाऱ्यावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
बरेच रोजगार गेले आणि ज्यांचे रोजगार गेले ते पर्यायी रोजगार शोधतआहे. पण पर्यायी रोजगार शोधला पण त्याला ग्राहक नाहीत. ग्राहक नसल्यामुळे पर्यायी रोजगार सुद्धा थिटा पडतो आहे. जनतेची खरेदी करण्याची शक्तीच नसेल तर बाजार कसा वाढेल. बाजार वाढला नाही तर रोजगार कसा मिळेल ? आणि रोजगारच नसेल तर भूक कशी मिटेल ?
जो काही अल्प प्रमाणात रोजगार होतो आहे तो म्हणजे कंत्राटी रोजगार. जिकडे तिकडे कंत्राटी रोजगाराचे पेव फुटले आहे. कंत्राटी रोजगार म्हणजे अति अल्प पगारात किंवा रोजगारावर रोजगार असणे. कंत्राटी पद्धती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून निव्वळ शोषण आहे. कंत्राटी पद्धतीत रोजगाराची काही हमी नाही कधी रोजगार जाईल याची खात्री नाही. अश्या ह्या भयावह स्थितीतून आपले युवक जात आहे. नीट त्यांच्या गरज पण पूर्ण होत नाही. त्यामुळे सगळीकडे असंतोषाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे.
आपला देश हा तरुणांचा देश आहे. तरुणाई म्हणजे उत्साह, प्रचंड शक्ती. परंतु ह्या तरुणाईचा योग्य तो उपयॊग करून घ्यायला पाहिजे व त्यांना त्यांचे जीवन जगण्यासाठी सुकर केले पाहिजे. निव्वळ तरुणाई आहे म्हणून मिरविण्यात काय फायदा ?
तरुणाई सोबतच जे आपल्या देशात जेष्ठ नागरिक आहेत त्यांची सुद्धा काळजी घेणे फार गरचेचे आहे. अगोदर त्यांना पेन्शन होती. सेवानिवृत्ती नंतरचे जीवन हे चांगली जगू शकत होते. परंतु ह्या पेन्शन वर सुद्धा आता टाच आली आहे. पेन्शन पण मोडकळीस निघाली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांचा भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोजगाराची भूक मिटवायची असेल तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे कृषी उत्पादन. आपला देश कृषी प्रधान देश आहे. परंतु पाहिजे तशी प्राथमिकता ह्या क्षेत्राला मिळत नाही. तो उपेक्षित राहतो आहे. आज जर आपण कृषी क्षेत्राला योग्य ते प्राधान्य दिले तर आपल्याला देशाचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. पर्यायाने भुकेचा सुद्धा आणि हे आपणाला करावेच लागेल तरच आपण रोजगाराची भूक मिटवू शकतो…!
- अरविंद सं. मोरे
- नवीन पनवेल पूर्व
- मो.क्र.९४२३१२५२५१