आमचे हलाखीचे जगणे
होऊन जाते तुमच्या
साहित्याचा विषय
किती सुलभपणे
वृत्तपत्रांच्या पानांवरील
आमचे रडगाणे वाचून
वाचक रसिकही देतात
वाचनतृप्तीची ढेकर
आमच्या अर्धनग्न
फाटक्या राहणीमानाचे
संशोधन करून
नवोदित विद्यार्थी होताहेत
वाड;मय आचार्य
शहरी पीक विमावाले
येतात पिकांचा पंचनामा करायला
नाक मुरडत, अनिच्छेने
नुकसान भरपाई न देण्यासाठी
किती सहज सांगितल्या जाते
कॉन्व्हेंटच्या मुलांना
उदध्वस्त झालेल्या
कास्तकारावर चित्र काढायला
जलमय शेताबद्दल गरळ ओकून
इलेक्ट्रॉनिक मीडियावरील
सुटा बुटातले निवेदक
असतात टीआरपी
वाढविण्याच्या नादात
किती सहज नाकारतात
जगाच्या पोशिंद्याला
एक माणूस म्हणून
– वेणुप्रशांत
नागपूर
9921284056