माझं वय २६ वर्षं असून नुकतंच लग्न ठरलं आहे. भावी पती सुशिक्षित आणि पुढारलेल्या विचारांचा असल्याने आमचे विचार जुळले आणि मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला जुगाराची सवय जडली आहे. तो ऑनलाईन गॅंबलिंग करतो. पगाराचे सगळे पैसे यावर उडवून टाकतो. मध्यंतरी त्याने यासाठी कर्जही घेतल्याचं मला कळलंय. याचे आमच्या भविष्यावर खूप वाईट परिणाम होतील. यातून मी त्याला कसं बाहेर काढू?
उत्तर : ऑनलाईन गॅंबलिंगचं व्यसन वाईटच. त्याला यातून बाहेर काढण्याची गरज आहे. तू त्याच्याशी स्पष्टपणे बोल. ही सवय आपल्या भावी आयुष्याला घातक ठरू शकते हे समजावून सांग. तसंच तुझ्या आणि त्याच्या घरच्यांशीही बोल. त्यांच्याकडून त्याला चांगली समज मिळू शकेल. गरज असेल तर समुपदेशकांची मदत घ्यायला मागे-पुढे पाहू नको. हा तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे हे लक्षात ठेव. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नको. एक चुकीचा निर्णय तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो. मुख्य म्हणजे लग्न मोडल्यास लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करुन ताण घेऊ नको. अजूनही तुमचा संसार सुरू झालेला नाही. तुझ्या भावी पतीला हे व्यसन सोडायचं नसेल तर न घाबरता नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घे. स्वतच्या आयुष्याचा खेळ होणार नाही याची काळजी घे.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023