धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे हे आपण जाणतो. धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबतही बरंच काही लिहिलं आणि बोललं गेलं आहे. असं असूनही अनेकजण धूम्रपान सोडू शकत नाहीत. धूम्रपानामुळे मृत्यूची किंवा इतर जीवघेण्या आजारांची शक्यता अनेकपटींनी वाढत असल्यामुळे विमा कंपन्याही धूम्रपान करणार्यांकडून अधिक रक्कम वसूल करतात. त्यामुळे तुमच्या खिशावर जास्तच बोजा पडतो. धूम्रपान करणार्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा कर्करोग असे विकार जडण्याची शक्यता बरीच जास्त असते. याच कारणामुळे विमा कंपन्या त्यांच्याकडून अधिक रक्कमही वसूल करतात.
ठराविक वर्षांसाठी विमा संरक्षण देणारा टर्म विमा असो वा आयुष्यभराचं संरक्षण देणारा सर्वसाधारण जीवन विमा असो, धूम्रपान करणार्यांना कोणतीही विमा पॉलिसी घेताना अधिक रक्कम मोजावी लागते. धूम्रपान करणार्यांच्या आणि न करणार्यांच्या हप्त्यात बराच फरकही असतो. उदाहरणार्थ ३0 वर्षांच्या व्यक्तीने एक कोटी रुपयांची टर्म विमा पॉलिसी घेतली तर धूम्रपान न करणार्या विमाधारकाला वर्षाला ८२६0 रुपये हप्ता भरावा लागेल. मात्र धूम्रपान करणार्याला वर्षाला हप्ता म्हणून १४,७५0 रुपये भरावे लागतील. म्हणजेच हप्त्याच्या रकमेत ७८ टक्के वाढ होते. हप्त्याची रक्कम जवळपास दुप्पट होऊ शकते. म्हणूनच निरोगी रहाण्यासाठी तसंच विमा पॉलिसीचा हप्ता कमी करण्यासाठी धूम्रपान सोडणं किंवा कमी करणं योग्य ठरतं.
हप्ता कमी करायचा असेल तर विमा पॉलिसी घेण्याच्या १२ ते १८ महिने आधी निकोटनयुक्त पदार्थांचं सेवन पूर्णपणे थांबवणं गरजेचं असतं. यानंतरच तुम्हाला कमी हप्त्यात विमा पॉलिसी मिळू शकते.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023