गरीब बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक संस्था निर्माण केल्या, या कार्यकीद्रीत या संस्थांचा वेल विस्तार वाढला. गरीब श्रमिक वर्गाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या संस्था साहाय्यभूत झाल्या. पण बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर या संस्था बाबासाहेबांच्या ज्या अनुयायांच्या ताब्यात गेल्या ते आणि आई समर्थ आणि कार्यक्षम असे निघाले नाहीत. उलट अत्यंत स्वार्थी गरीब समाजाच्या हिताबद्दल बेदरकार असलेले आणि खुर्चीबहादुर निघाले. त्यामुळे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांचा विस्तार ते करू शकले नाहीत.
बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर सामाजिक समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन समाज परिवर्तनाचा लढा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या अनुयायांमधून कोणीही नेता पुढे आला नाही. सामाजिक समता आणि बंधुभाव स्थापन करण्याचा पुसटसुद्धा प्रयत्न कोणी करू शकला नाही. या दृष्टीने सामाजिक आघाडीवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांचा पराभव केला आहे असे खेदाने म्हणावे लागते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब दलित आणि श्रमिक वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटी तर्फे मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आणि मराठवाड्यामध्ये मिलिंद महाविद्यालय तसेच महाराष्ट्र मध्ये हायस्कूल व विद्यार्थी वस्तीगृह स्थापन केली. मुंबई, बेंगलोर वगैरे शहरात जमिनीचे प्लॉट विकत घेऊन भारताच्या मागास भागात शिक्षण संस्था काढाव्यात आणि ज्ञानाच्या प्रकाशाने खेड्यातील लोकांची झोपडी सुद्धा उजळून निघाली पाहिजे अशी इच्छा धरून बाबासाहेबांनी शिक्षणसंस्थेचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू केले.
पण खेड्यातील लोकांच्या सुधारणेसाठी मागास भागात जाऊन राहण्याचे बाबासाहेबांचे हे स्वप्न त्यांच्या अकाली निर्वाणामुळे साध्य झाले नाही. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था अनुयायांच्या हातात आहेत. पण बाबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारताच्या मागास भागात शिक्षण संस्थांचे जाळे त्यांनी पसरलेले दिसत नाही.
बंगलोर मध्ये बौद्ध विद्यापीठ स्थापन करण्याची बाबासाहेबांची इच्छा होती. येथे बौद्ध विद्यापीठ आजही स्थापन झालेले नाही. मुंबईमधील शैक्षणिक संस्थांमध्ये तर शैथिल्य आणि अकार्यक्षमता आलेली आहे. परीक्षा वेळेवर न होणे, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुरा न करणे, वगैरे कारणांवरून विद्यार्थी निदर्शने करून मोर्चा काढत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अशी इच्छा होती की “दलित समाज हा शासनकर्ती जमात बनली पाहिजे” या दृष्टीने त्यांनी आपल्या राजकीय चळवळीची आखणी केलेली होती. काँग्रेसला पर्यायी एकच बलाढ्य विरोधीपक्ष स्थापन करावयाचा म्हणून त्यांनी *राम मनोहर लोहिया* यांच्या सारख्या पुढाऱ्याबरोबर बोलणी केली होती, परंतु बाबासाहेबांच्या अकाली महापरिनिर्वाणामुळे इतर विरोधी पक्षातील पुढारी रिपब्लिकन पक्षात येऊ शकले नाही.
त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची धुरा *बी. सी. कांबळे* व रावबहादुर *एन. शिवराज* यांना वहावी लागली. *बी. सी. कांबळे* यांनी *आर.डी. भंडारे, आवळे बाबू,* *दादासाहेब गायकवाड,* *खोबरागडे,* *रुपवते,* यांच्या सहकार्याने पक्षाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु याच काळात पक्षातील काही *’स्वयंभू’* पुढार्यांनी *’दुरुस्त रिपब्लिकन’ आणि ‘नादुरुस्त रिपब्लिकन’* पक्षाची दोन शकले पाडली.
पोलादाप्रमाणे भक्कम अशा पक्षात दुहीची बीजे पेरली, पुढाऱ्यांमधील हे मतभेद आणि दुही वाढतच गेली आणि पुढे पुढे तर जेवढे पुढारी त्यांच्या नावाचे पक्ष अशी पक्षबाजी सुरू झाली. पुढाऱ्यांनी बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडली नाही किंवा त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून बौद्ध समाजातील तरुणांनी *’दलित पँथर्स’* नावाची संघटना स्थापन केली. या पँथरच्या पुढाऱ्यांनी आपला मुलुख मैदानी भाषणांनी समाजात आणि इतर पक्षात सुद्धा खळबळ माजवून दिली. अन्याय-अत्याचार विरोधी मोर्चे काढून प्रचाराची राळ उडवून दिली. परंतु *’दलित पँथर्सच्या’* तरुणांमधील ऐक्य जास्त वेळ टिकू शकले नाही. आणि *’एक* *दील के तुकडे हजार हुए’* या म. रफी ने गायलेले गीता प्रमाणे दलित पॅंथर च्या एक दीलाचे *नामदेव ढसाळांची (दलित पँथर),* *अरुण कांबळेंची* *(पँथर्स),* *राजा ढालेंची (मास मुव्हमेंट),* *जोगेंद्र* *कवाडेंची हाजी मस्तान च्या कृपेने* *चालवलेली (दलित* *मुस्लिम सेना)* अशी मुव्हमेट सुरु झाली. *रिपब्लिकन पक्ष* आणि *दलित पँथर्स,* मधील या फाटाफुटीमुळे बौद्ध समाजाची चळवळ दुभंगली गेली. त्यामुळे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकीत *(कॉंग्रेस-आर.पी.आय युती* *वगळता)* रिपब्लिकन पक्षाचा एक सुद्धा उमेदवार स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊ शकला नाही. रिपब्लिकन पक्षाचे राजकीय दृष्ट्या पानिपत झाले.
डॉ. बाबासाहेबांनी दलितांच्या कल्याणासाठी, माणुसकीच्या हक्कासाठी देह चंदनाप्रमाणे झिजवला आपल्या अडाणी, भोळ्या बांधवांना जागे केले. पण त्यांचे अनुयायी, त्यांचे बांधव बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून जाताना दिसतात का ? याचे उत्तर नाही असे द्यावे लागते. सुशिक्षित व बुद्धीवादी म्हणवणारी समाजातील पांढरपेशी मंडळी समाजापासून व चळवळीपासून अलग राहू लागल्यामुळे समाजात मतभेद व फाटाफूटी यांना उत्तेजन मिळू लागले आहे.
बाबासाहेबांनी पोटातील भूक मारून ज्ञानाची भूक भागवली; पण अशा थोर महामानवाच्या नावाचे कुंकू लावून आमचे पुढारी आज दुसऱ्यांबरोबर संसार करीत आहेत. आमचा समाज वाईटाकडून अधिक वाईटाकडे जात आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षानंतर हा समाज पुन्हा गुलामगिरीत जाण्याची भीती वाटत आहे. वस्तुतः बाबासाहेबांनी सोन्याच्या मापाने संघटना उभारली, परंतु त्या संघटनेचे वाटोळे करणारे लुच्चे समाजाचे ढोंगी पुढारी बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेत. *ज्या नेत्याने* *नामांतरासाठी उग्र आंदोलने केली* *तोच नेता नंतर पवार* *साहेबांच्या दाऊनीचा बैल बनून* *मंत्री झाला, खासदार* *झाला. राष्ट्रवादीचे* *मांजर बनलेल्या या* *नेत्याच्या गळ्यात शरद पवार* *सारख्या धूर्त बोक्याने* *शिर्डीतून हाकलून* *दिले. नंतर हे मांजर काँग्रेसचे* *गाजर खायला येण्या* *अगोदरच घर मालकीनीने* *या मांजराचे* *सामान दिल्लीच्या घरातून बाहेर* *फेकून दिले.*
बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन जाणारा एकही नेता आपल्या समाजाला मिळाला नाही. अपवाद फक्त *बापूसाहेब तथा* *बी. सी. कांबळेंचा.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका* *सभेमध्ये म्हणाले होते की,* *”मी माझ्या पक्षाची चळवळ* *जेथपर्यंत पुढे नेली* *आहे त्याच्यापुढे नेण्याची कुवत* *आणि ताकत माझ्या* *नंतर येणाऱ्या पुढाऱ्यांना मध्ये* *नाही. परंतु ती चळवळ* *जेथे आहे तेथे जरी* *त्यांनी ठेवली तरी मला* *समाधान वाटेल, पण ती* *त्यांनी मागे नेता कामा* *नये….”* बाबासाहेब आम्हाला क्षमा करा, सध्याच्या आमच्याच संधीसाधू रिपब्लिकन नेत्यांनी तुमची चळवळ पुढे नेलेली नाहीच, पण तेथे होती तेथे सुद्धा ठेवली नाही. तर ती लाचारी च्या खड्ड्यात नेऊन ठेवली आहे….
तेव्हा पक्षाच्या आघाडीवर सुद्धा *बाबासाहेबांच्या अनुयायांनी* *बाबासाहेबांचा पराभव केला आहे* असेच दुःखाने म्हणावे लागते……
*लेखक :-*
- सिद्धार्थ कांबळे
- मुंबई
(वेब साईट प्रकाशित मताशी संपादक सहमत असेलच असे नाही, सदर मत लेखकाचे समजावे- संपादक)