- ’आदर्श विद्यार्थी प्रबोधनमाला’कर्ते प्रा.अरुण बा.बुंदेले यांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनकार्यावरील व काव्य फुलांवरील लेख येथे देत आहोत.
- “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांची समाज प्रबोधनात्मक काव्य फुले”
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !
आद्यशिक्षिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म खंडोजी सिंदूजी नेवसे पाटील या इनामदार घराण्यात नायगाव, ता. खंडाळा, जिल्हा – सातारा येथे 1931 सालातील जानेवारी मासाच्या तीन तारखेला झाला. नेवसे पाटील यांना सिंदूजी, सखाराम आणि श्रीपती ही तीन मुलं व सावित्री थोरली मुलगी होती.
सावित्रीबाईचा विवाह तत्कालीन चालिरीतीनुसार वयाच्या 9 व्या वर्षी इ.स. 1840 साली नायगाव येथे जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला, तेव्हा जोतीबाचे वय 13 वर्षाचे होते.
इ.स. 1842 पासून जोतीराव सावित्रीबाईंना शेतीची कामं करताना आंब्याच्या झाडाखाली शिक्षण देऊ लागले. इ.स. 1846-47 ला त्या प्रशिक्षित शिक्षिका झाल्या आणि दि. 1 जानेवारी, 1848 साली पुण्याच्या बुधवारपेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये जी मुलींची पहिली शाळा स्थापन केली त्या शाळेतील विद्यार्थिंनीना शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी सुरु केले. त्या शाळेत 4 ब्राह्मण, 1 धनगर व 1 मराठा अशा 6 मुली होत्या. यासाठी सावित्रीबाईंनी शिव्या आणि छळ सहन केला. इ. स. 1849 साली जोतीबांना वडील गोविंदरावांनी या शैक्षणिक कार्यामुळे घराबाहेर काढले, तेव्हा जोतीबांनी गृहत्याग केला. याप्रसंगी सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी गृहत्याग केला.
पुढे त्यांनी दि. 28 जानेवारी, 1853 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1854-55 मध्ये ”साक्षरता अभियाना’ ची सुरुवात केली. सत्यशोधक समाज स्थापन करुन हुंड्याशिवाय कमी खर्चात साध्या पद्धतीच्या ’सत्यशोधक विवाहाची’ प्रथा फुले दाम्पत्यांनी सुरु केली. स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करुन अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. बालविवाहाला विरोध तर केलाच शिवाय विधवांचे पुनर्विवाह समारंभपूर्वक घडवून आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले. फुले दांम्पत्याला मुलबाळ झाले नाही म्हणून त्यांनी एका काशिबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्याला डॉक्टर बनविले व त्या काळात त्याचा आंतरजातीय विवाह केला. त्यांचे हे सर्व कार्य ऐतिहासिक होते. त्यांच्या या कार्याचे वर्णन करताना ”दि पुना आब्जर्व्हर अॅन्ड डेक्कन विकली” या वृत्तपत्रात पत्रकाराने लिहिले होते की, ”हे कार्य म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय.” याचाच अर्थ त्यांच्या कार्याची योग्य समीक्षा करणारे त्या काळातही होते असे म्हणता येईल. आज खरोखरच ते नवयुगातील नवविचाराचे प्रवर्तक ठरले यात शंका नाही.
क्रांतीज्योती सावित्रीबाई वास्तववादी साहित्यिक होत्या असे त्यांच्या वाङ्मयावरुन म्हणावेसे वाटते. त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य 1) काव्य फुले (कवितासंग्रह) इ.स. 1854, 2) जोतीबांची भाषणे, संपादक : सावित्रीबाई फुले. 25 डिसेंबर 1856, 3) सावित्रीबाईची जोतीबास पत्रे 4) बावन्नकशी सुबोध रत्नाकर (कविता-संग्रह, 7 नोव्हेंबर 1892), 5) मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे – 1892. हे सर्व वाङ्मय ’सावित्रीबाई फुले : समग्र वाङ्मय” या ग्रंथात एकत्रित प्रकाशित करण्यात आले आहे.
’काव्यफुले’ या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता असून त्या निसर्ग, सामाजिक, ऐतिहासिक, बोधपर आहेत, तर ”बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या काव्यसंग्रहात देशाचा इतिहास काव्यरुपाने मांडलेला आहे. जोतीबांच्या कार्याचे चित्रण या संग्रहात आहे. एकूण 52 काव्यरचना त्यात आहेत.
’श्रेष्ठ धन’ या काव्यरचनेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणतात की,
” अभ्यास करी विद्येचा । विद्येस देव मानून । घे नेटाने तिचा लाभ । मनी एक होऊन ॥”
आजच्या टी. व्ही. समोर तासंतास बसणार्या तसेच रात्रंदिवस मोबाईल बघणार्या आणि अभ्यास न करणार्या विद्यार्थ्यांसाठी असा हा अनमोल संदेश या काव्यातून सावित्रीबाईंनी दिलेला आहे.
- ”विद्या हे धन आहे रे ।
- श्रेष्ठ सार्या धनाहून ॥
- तिचा साठा जयापाशी ।
- ज्ञानी तो मानती जन ॥
’विद्या’ हेच सर्वश्रेष्ठ धन असे सांगणार्या सावित्रीबाई या खर्या शिक्षणतज्ज्ञ होत्या असे म्हणता येईल. ‘इंग्रजी शिका’ या अभंगरचनेत त्या म्हणतात.
- ”विद्येविण गेले । वाया गेले पशू ।
- स्वस्थ नका बसू । विद्या घेणे ॥”
- ”वाचे उच्चारी । तैसी क्रिया करी । तीच नरनारी । पूजनीय ।”
तर याच अभंगात ’थोर’ मानसे कोणाला म्हणावे हे सांगताना म्हणतात की,
- ”सुख दु:ख काही । स्वाथपणा नाही ॥ परहित पाही । तोच थोर ॥”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ’तयास मानव म्हणावे का ?’ या कवितेत मानसाच्या अंगी दुर्गुण असले तर त्याला मानव कसे काय म्हणावे ? हा प्रश्न ते समाजालाच विचारतात. ज्ञान नसून ती घेण्याची गोडी नसणार्या माणसाविषयी म्हणतात की,
- ”ज्ञान नाही विद्या नाही । ते घेणेचि गोडी नाही ॥
- बुद्धी असुनि चालत नाही । तयास मानव म्हणावे का ? ॥”
पशूपक्षीही परिश्रम करतात ते असे कधीच म्हणत नाहीत.
- ”देरे हरी पलंगी काही। पशूही ऐसे बोलत नाही ॥
- विचार ना आचार नाही । तयास मानव म्हणावे का ? ”
सेवा, त्याग, दया, माया यापैकी एकही सद्गुण नसणार्यांना मानव कसे म्हणावे ? हे सांगताना सावित्रीबाई म्हणतात की,
- ”दुसर्यास मदत नाही ।
- सेवा त्याग दया माया नाही ॥
- जयापाशी सद्गुण नाही ।
- तयास मानव म्हणावे का ?”
प्रत्येकाने स्वकार्य करीत राहणे आवश्यक आहे. काही व्यक्ती कोणतेही काम न करता जीवन जगतात त्यांचा इतरांना त्रास होतो. अशा ऐतोबाविषयी सावित्रीबाई म्हणतात की,
- ”बाईल काम करीत राही ।
- ऐतोबा हा खात राही ॥
- पशू पक्षात ऐसे नाही ।
- तयास मानव म्हणावे का ?”
’बाळास उपदेश’ या कवितेत त्यांनी ’उद्या करायचे ते आजच काम कर’ असा उपदेश देऊन कार्य करण्याचा अनमोल संदेश दिला आहे. आपल्या काव्यफुलातून समाजाचे सतत प्रबोधन करणार्या आणि सामाजकार्य करता करताच दि. 10 मार्च, 1897 रोजी निर्वाणपदी पोहोचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !
- ’महात्मा जोतीराव फुले राज्यस्तरीय पुरस्कार’ प्राप्त
- प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
- माजी पर्यवेक्षक,
- नांदगाव कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव (खंडे.)
- जि. अमरावती
- भ्रमणध्वनी : 8087748609