ऊर्जायान : वर्तमान धर्मांधतेला उत्तर देणारे मुखपत्र -यशवंत मनोहर

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : “ऊर्जायान हा विशेषांक पूर्वीच प्रकाशित व्हायला हवा होता. पण तो आज प्रकाशित झाला. त्यालाही संदर्भ आहेत. वर्तमान धर्मांधतेने ग्रासलेला असताना एक नवा सर्वकल्याणकारी विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे लेखन ऊर्जायानात यायला हवे. असे झाले तर ऊर्जायन हे वर्तमान धर्मांधतेला प्रखर बुद्धिवादी उत्तर देणारे मुखपत्र ठरेल” असे विचार प्रख्यात तत्त्वज्ञ डॉ. यशवंत मनोहर यांनी मांडले. भीमा कोरेगाव शौर्यदिन व मुलींच्या शिक्षणाच्या आरंभदिनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या संदीप गायकवाड संपादित ‘ऊर्जायान विशेषांक – २०२५’ चे प्रकाशन करताना  अध्यक्ष या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले, “ऊर्जायन भविष्यात समाजप्रबोधनाचे काम करणारे नियतकालिक व्हावे, वर्तमानातील वणव्याचे प्रतिबिंब रेखाटणारे आणि भारतीय समाजाला नवी दिशा देणारे मुखपत्र व्हावे आणि जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांनी बंधुभाव जोपासण्याचे काम या विशेषांकाने करावे”अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

● हे वाचा –मी भारत माता बोलतेय 

       या प्रसंगी डॉ. प्रकाश राठोड, डॉ. सर्जानादित्य मनोहर, कवी प्रसेनजित गायकवाड, केंद्रप्रमुख संघपाल शंभरकर, दिग्दर्शक नागेश वाहूरवाघ, मुख्य संपादक संदीप गायकवाड व संपादक मंडळ सदस्य हिरामण तेलंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य संपादक संदीप गायकवाड यांनी ऊर्जायान विशेषांकाचे जन्मप्रयोजन विशद केले. डॉ. प्रकाश राठोड यांनी वर्तमान प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव शौर्यदिन व मुलींच्या शिक्षणाच्या आरंभ दिनाची प्रासंगिकता पटवून दिली. डॉ. सर्जानादित्य मनोहर यांनी ऊर्जायन हा जळत्या प्रश्नांचे प्रखर भान असणारा विशेषांक असल्याचे स्पष्ट केले. कवी प्रसेनजित गायकवाड यांनी या विशेषकांतून नव्या विचारांची ओळख व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण तेलंग यांनी केले तर आभारप्रदर्शन दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ यांनी मानले.

Leave a comment