अगदी सकाळची वेळ.त्यात कडाक्याची थंडी.जिकडे-तिकडे दवबिंदुमुळे सर्वत्र धुकेच धुके पसरले होते.मी अचानक भूपतीच्या घरासमोरून जात असताना भूपती सोबत गाठ पडली.भूपती तसा लगबगीतच होता.काठीच्या आधाराने पुढील मार्गक्रमण करीत होता.मी त्याला सहज विचारले,” काय!भूपती कशाची गडबड आहे”? कुठे चालला लगबगीने?माझ्या अचानक प्रश्नांने तो अलगदपणे गालातल्या गालात हसला अन लेखी परीक्षेला जात असल्याचे सांगितले.त्याच्या हसण्यातही कारुण्याची छटा अन सामर्थ्याच्या बळासोबत संघर्षाची/कष्टाची चुणूक त्यांच्यात ओतप्रोत भरलेली दिसत होती.मी तर त्याच्याकडे एकटक पाहतच बसलो.भूपती माझ्या नजरेसमोरून कधी दृष्टी आड झाला याची पुसटशीही कल्पना आली नाही.काही क्षणातच मी भानावर आलो अन त्याच्या संघर्षमय जीवनाला न्याहाळू लागलो अन मनातच पुटपुटलो की,सदैव परिस्थितीशी सतत संघर्ष करणारा आणि सदा सर्वांच्या सुख-दुःखात तत्परता दाखवून आधार देणारा भूपती स्वतः काठीचा आधार(अपघातामुळे) घेऊन चालतानाही त्यांच्यात किती तळमळता! भूपती तसा वेगळ्याच धाटणीतील तरुण.संयम,तळमळ, जबरदस्त इच्छाशक्ती,बुद्धीने तल्लक, सामाजिक जाणिवेतून कुणालाही मदत/सहकार्य करणारा आणि शत्रूलाही मित्र मानणारा अशा एक ना अनेक गुणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भूपती.त्यांच्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य, ताकद,बळ,शक्ती आणि सामर्थ्य त्यांच्या नखशिखांत भरलेले.संपूर्ण गावात आदराने ओळखला जाणारा भूपती सर्वांचा लाडका व आवडता.विशेषतः विद्यार्थ्यांचा सर्वात प्रिय व आवडता.गावात कुठलाही सामाजिक/धार्मिक/प्रबोधनात्मक कार्यक्रम असो त्यात तो सर्वात पुढे असणारा,प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रत्येक वर्षी शिक्षणातही अव्वल असणारा. नव्हे! दरवर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या भूपतीच्या सोबतच नशिबाने कसा खेळ खेळला?अशा नानाविध प्रश्नांच्या भडिमारातच मी हवालदिल अन अंतर्मुख सुद्धा झालो होतो.
भूपती तसा माझा अगदी बालपणापासूनचा जिवाभावाचा सखा.त्याच्या जीवनातील असंख्य चढ-उतार मी अगदी जवळून पाहिले आहे.भूपतीच्या घरची आर्थिक परिस्थिती हीं तशी जेमतेम व हलाखीचीच,पण त्यांच्यातील गुणवत्ता बघून हलाखीच्या परिस्थितीतही त्याच्या माता-पित्यांनी पोटाला चिमटा बांधून त्याची शिक्षणाची भूक भागविली.आई-वडिलांची प्रेरणा व प्रोत्साहनाने प्रती वर्ष तो भरघोस यश संपादन करीत असे.म्हणूनच शैक्षणिक दृष्ट्या तो यशाच्या उच्च शिखरावर पोहचला.आमच्या बालपणीचा एक क्षण तर मला नेहमीच आठवण करून देतो कि,भूपती आणि मी दुसऱ्या वर्गात असतांना तो अनुत्तीर्ण झाला होता.त्यामुळे वर्गातील व अन्य विद्यार्थी तसेच गावातील अधिकांश मुल-मुली त्याला चिडवत असे.मुलाच्या धाकामुळे तो काही दिवस शाळेत तर बरेच बरे पण घराच्या बाहेर सुद्धा पडला नव्हता. जिद्दी,मेहनती असलेल्या भूपतीने बालवयात अर्थात त्याच वेळी निश्चय करून जीवनाशी अविरत संघर्ष करण्याचे ठाण मांडले असावे हे त्यानंतरच्या चढत्या शैक्षणिक प्रगती आलेखावरून सहज लक्षात येते.भूपती बालपणीही अपयशाने खचला नाही.याउलट त्याने अपयशातही यशाचे रहस्य शोधले आणि आपल्या स्वकर्तुत्वाने हे सिद्ध करून सुद्धा दाखविले आहे.प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चयाने वेडा झालेल्या भूपतीने नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही तर चक्क प्रत्येक वर्षी कधी प्रथम तर कधी द्वितीय श्रेणीत सातत्याने उत्तीर्ण होऊ लागला हे विशेष!.
भूपतीची शैक्षणिक प्रगती व जबरदस्त आत्मविश्वास बघून अनेक मान्यवरांच्या सल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला जिल्ह्याच्या ठिकानावरील एका नामांकित शाळेत;माध्यमिक शिक्षणाकरिता दाखल केले.परंतु पुढे शहरी शाळेचा खर्च न झेपावल्याने इच्छा नसतानाही त्याला लगेच दुसऱ्याच वर्षी परत गावालगतच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला.काही दिवसातच भूपती दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.तत्कालीन परिस्थितीत आमच्या गावातील गेल्या दोन दशकापासून शाळेच्या इतिहासात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारा भूपती पहिला विद्यार्थी ठरला!.परिणामतः सर्व गावकरी व परिसरातील लोकांनी तितक्याच उत्साहाने त्याचे कौतुक केले.
दहावीनंतर इंजिनियरींग किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेण्याचा त्याचा मानस/संकल्प अन्य सर्वसामान्य गुणवान विद्यार्थ्यांप्रमाणे त्याचाही असणे सहाजिकच होते.परंतु आर्थिक परिस्थिती आड आली. भूपतीचे आईवडील कमी शिकलेले पण शिक्षणाप्रति आस्था असल्याने त्यांनी इतरांचा सल्ला घेणे आवश्यक मानले होते.अनेकांनी पुढील उच्च शिक्षणात आर्थिक परिस्थिती हा एक अडसर ठरेल या भीतीने (सल्याने) इच्छा असतानाही त्याला अपेक्षित शैक्षणिक शाखेत प्रवेश घेता आला नाही.प्रारंभी त्याचा हिरमोड झाला.अपेक्षित शाखेत प्रवेश घेता आले नसल्याचे शल्यही त्याला नेहमीच बोचत असले तरी दुर्लक्षित शाखेतही त्याने पुढे आपल्या बुद्धिमत्तेचा/विद्वत्तेचा ठसा उमटविला.शैक्षणिक क्षेत्रात यशासाठी मेहनतीत कधीही कसूर केली नाही.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भूपती ज्या वर्षी दहावी पास झाला नेमके त्याच वर्षी डी.एड.चे प्रशिक्षण हे बारावी वर झाले.घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कुटुंबाला आधार व्हावा म्हणून कमी दिवसात कमी खर्चाचे व रोजगार संधी लवकर मिळवून देणाऱ्या डी एड प्रशिक्षणापासून त्याला वंचित राहावे लागले.भूपती निराश झाला नाही.आशावादी दृष्टिकोन दृष्टिपटला समोर ठेवून बारावीत जास्तीत जास्त गुण प्राप्त करून डि.एड.करायचेच असा त्यांनी ठाम निश्चय केला होता.परिस्थितीची जाणिव ठेऊन मिळेल तसा अभ्यासाला भरपूर वेळ दिला.जबरदस्त मेहनत केली.त्यांचीच फलश्रुती म्हणजे तो बारावीच्या परीक्षेत काही विषयात विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालाच शिवाय महाविद्यालयातून (२४० विद्यार्थ्यांतुन) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.मात्र नशिबाने येथेही त्याची थट्टा केली.कारण थोड्याफार फरकानेच त्याचा डी.एड.चा नंबर हुकला.भूपतीचा येथेही भ्रमनिरास झाला.त्याच दरम्यान एका नामांकित खासगी संस्थेच्या बँकेत नोकरीत समाविष्ट करण्याचा शब्द त्याच संस्थेच्या एका संचालकांनी भूपती च्या वडिलांना दिला होता.केवळ औपचारिकता बाकी होती. संचालक मंडळाच्या सभेची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता.कारण त्याच सभेत भूपतीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होते.दुर्दैवाने याही ठिकाणी भूपती चा घात झाला.ज्या संचालकाच्या माध्यमातून सभेची मंजुरात घेणार होते त्यांचाच सभेला पोहचण्यापूर्वी वाटेतच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.येथेही मिळता-मिळता नोकरी ने हुलकावणी दिली.आपण कधीच यशस्वी होणार नाही का ;असे कदाचित त्याला वाटत असावे,परंतु तो हिम्मत न हारता आपले ध्येय व उद्दिष्ट प्राप्तीसाठी तितक्याच जोमाने मेहनत करू लागला.सोबतच आपल्या ज्ञानाचा;समाजाला व आपल्या सारख्याच गरीब,होतकरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या उदात्त हेतूने त्याने गावातच विनामूल्य शिकवणी वर्ग सुरू केले होते.तब्बल सहा सात वर्ष हा विनामूल्य उपक्रम राबविला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही चांगली सोय झाली होती.पुढे शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश बघून बरेच विद्यार्थी शिकवणी वर्गात दाखल होऊ लागले होते.
पदवीचे शिक्षण चालू असतानाच त्याच्या जीवनात फार मोठे चढ-उतार आले;नव्हे भयंकर वादळच!याच कालावधीत त्याला फार मोठ्या आजाराने ग्रस्त केले होते.पोटाच्या विकारामुळे प्रकृती त्याला साथ देत नव्हती.अखेर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला पोटाचे ऑपरेशन करावे लागले.दुसरे म्हणजे याच कालखंडात त्याच्या बहिणीचे सुद्धा लग्न झाले होते.तिसरे म्हणजे ऐन तारुण्यात प्रत्येक युवकाच्या जीवनात जे घडले तेच भूपतीच्या जीवनातही घडले, नव्हे!एका वादळाप्रमाणे प्रवेश झाला अन वादळाप्रमाणे निर्गमन ही झाले.अशा एक ना अनेक समस्या त्याच्या वाट्याला आल्यात.अशा स्थितीत कदाचित एखादा युवक खचून गेला असता. पण भूपतीने याला तितक्याच समर्थपणे तोंड दिले.म्हणूनच परीक्षा केवळ एक-दीड महिन्याच्या अंतरावर असताना आणि त्यातही पोटाचे ऑपरेशन झाले असताना सुद्धा पूर्वी प्रमाणेच यश मिळवले.हलाखीच्या परिस्थितीतही व लग्नावर झालेला अवाढव्य खर्च व त्याच्या जीवनात आलेले भयंकर वादळ हे निश्चितच अपयशाच्या खाइत लोटणारे प्रसंग होते;पण भूपतीने अपयशाला जवळपास ही फिरकू दिले नाही हे आताच्या युवकांसाठी खरोखरच प्रेरणादायी म्हणावे लागेल.
कालांतराने भूपती पदवीधर झाला.पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला.शिक्षण आणि राहण्याचा खर्च त्याच्या परिस्थितीच्या पलीकडे होता.म्हणूनच त्याने कॉलेज सोबतच खाजगी नोकरी स्वीकारली.अश्यातही त्याने पदव्युत्तर परीक्षा द्वितीय उच्च श्रेणीत उत्तीर्ण केली.तत्पूर्वी कॉलेज सोबतच खाजगी नोकरी करणे म्हणजे त्याच्यासाठी एकप्रकारे तारेवरची कसरतच होती.अशा बिकट परिस्थितीत ध्येय प्राप्त करीत इतरांसाठी तो नक्कीच आदर्श व प्रेरक ठरला.म्हणूनच आजही बरेचसे युवक-युवती/विद्यार्थी वर्ग भूपतीचा अनमोल सल्ला घेण्यास विसरत नाही.ज्या ठिकाणी भूपती खासगी नोकरी करीत होता त्या मालकाला भूपतीचा मेहनती व होतकरू स्वभाव तसेच त्याची गरिबीची परिस्थिती लक्षात घेऊन त्याला कायम स्वरूपी नोकरी प्राप्तीसाठी पुढाकार घेतला होता.अशातच आरोग्य सेवकांच्या शासकीय जागा जाहीर झाल्या होत्या.मालकाच्या पुढाकाराने तत्कालीन पालकमंत्री मंत्री यांनी भूपती च्या नावाची नोकरी साठी शिफारस केली होती.नव्हे!नोकरी पक्की झाली होती.परंतु काही महिन्यातच शासनाने निवड यादी जाहीर करण्याऐवजी ही नोकर भरतीच थांबवली होती.येथेही दुर्दैव त्याच्या आड आले आणि मिळता मिळता ही नोकरी सुद्धा भूपती च्या हातून निसटली.
सध्या रोजगारीचा प्रश्न मोठा बिकट आहे.उच्च शिक्षण घेतल्या नंतर ही सर्वांनाच रोजगाराच्या संधी मिळेलच असे नाही.अनेकांच्या नशिबी बेरोजगारी येणारच!परंतु शिक्षण कधीही वाया जाणारे नसते.शिक्षण हे जीवन जगण्यासाठी विविध प्रकारच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देतात.वाट चुकलेल्याना योग्य दिशा दाखविते आणि अंधारकामय जीवनाला आशेचा किरण दाखविते.पण त्यासाठी शिक्षणाचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे.
सुशिक्षित पण बेरोजगार नेहमीच शासकीय नोकरीचा हट्टाहास धरून बसतात.त्यात आपला अनमोल वेळ वाया घालविते.मिळेल त्या कामांस किंवा व्यवसाय,उद्योगाला गौण समजतात.म्हणूनच दिवसेंदिवस बेरोजगारीचे त्यातून नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे.परंतु भूपतीच्या स्वभाव जरा वेगळाच!म्हणूनच त्याने अगदी पदव्युत्तर परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तालुक्याच्या ठिकाणी एका दुकानात खाजगी नोकरी स्वीकारली.बेकार राहण्यापेक्षा काही कमविणे योग्य नाही का?असा त्याचा नेहमीचाच प्रश्न असे.काही दिवसातच भूपती पदव्युत्तर परीक्षा द्वितीय उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाला.तत्पुर्वी शिक्षकासाठी आवश्यक ते शिक्षण पूर्ण केले होते. विशेष म्हणजे भूपती दुकान सांभाळीत असताना इतर रोजगाराच्या वाटाही तो शोधू लागला.व्यवसायात गुंतलेल्या भूपतीचा अनेकांशी निकटच्या संबंध आला.अन्य ठिकाणी सुद्धा स्थायी रोजगार शोधण्यास त्याला मदत होऊ लागली.त्यातूनच भूपतीचा मूळ स्वभाव, मेहनती वृत्ती, आत्मविश्वास,चिकाटी,मेहनत इत्यादी लक्षात घेऊन एका खाजगी पण अनुदानित विद्यालयाच्या मुख्याध्यापकानी दखल घेऊन त्याच वर्षी चालू शैक्षणिक सत्रापासून अंशकालीन शिक्षक (नंतर कायम करण्याच्या अटीवर) म्हणून त्याची नियुक्ती केली.मेहनतीचे व संघर्षाचे फलित झाल्याने भूपती तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य निश्चितच तात्पुरते का होईना,पण सुखावले होते.परंतु येथेही नियतीने भूपतीच्या जीवनाची क्रूर थट्टा थांबली नाही.भूपती शिक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वीच त्याचा एका प्रवासादरम्यान जबरदस्त अपघात झाला.त्यात त्याला जगण्यासाठी मोठी झुंज द्यावी लागली.सुदैवाने भूपती जीवाने तर बचावला मात्र एका पायाने कायमचा अपंग झाला !.म्हणतात ना”भगवान देता है तो,छप्पर फाड के देता है”त्याचप्रमाणे भूपतीला संघर्षमय जीवन “छप्पर फाडके दिले आहे”अशाही स्थितीत भूपती न हादरता/डगमगता परिस्थितीशी प्रखर झुंज देत तितक्याच पोटतिडकीने संघर्ष करीत आहे.आजही तो संघर्षाच्या वाटेवरच आहे.त्याच्या संघर्षमय जीवनात न्याय मिळो हीच प्रार्थना व त्याच्या भावी सुखमय/आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!!
- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
- मु.पो.भांबोरा, ता.तिवसा
- मोबा.९९७०९९१४६४