सियाराम सिल्क मिल्स लि. नांदगाव पेठ मधील कामगारांचा तीन दिवसीय संप सुरू…!
तिवसा/स्वाती इंगळे : सियाराम सिल्क मिल्स लि. ही कंपनी गेल्या सात वर्षापासून अति. एम. आय. डी. सी. नांदगाव पेठ मध्ये कार्यरत आहे. या कंपनीमध्ये जवळपास तीनशे कामगार काम करतात. परंतु गेल्या तीन वर्षापासून या आस्थापनेतील व्यवस्थापनेने कामगारांवर अनेक प्रकारचा दबाव टाकणे सुरू केले आहे. तसेच दोन वर्षात कुठल्याही प्रकारची पगारवाढ केली नाही तसेच विविध प्रकारच्या सुविधा कामगारांना कायद्यानुसार लागू असून सुद्धा कंपनी कामगारांना या सुविधा देत नाही.
गेल्या दोन वर्षात कंपनीने अनेक कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता किवा कोणतेही लेखी पत्र न देता कामावरून काढून टाकले आहे. तीन महिन्यांपूर्वी कंपनीमध्ये पाच कामगार प्रतिनिधीची निवडणूक होऊन जे कामगार प्रतिनिधी निवडून आले त्यांना सुद्धा कंपनीचे व्यवस्थापन योग्य वागणूक देत नाही.
कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन कामगार प्रतिनिधींनी मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम १९४६ नुसार सियाराम सिल्क मिल्स लि. च्या आस्थापनेला दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी मागणीपत्र सादर केले होते. यामध्ये नियमित पगारवाढ, घरभाडे भत्ता, विशेष भत्ता, सुरक्षाविषयक प्रश्न, वैद्यकीय सुविधा, कंत्राटी कामगारांचे प्रश्न अशा मुद्द्यांना घेऊन विविध मागण्या आहेत. परंतु, यावर कंपनीतील व्यवस्थापनेने कोणताही तोडगा काढला नाही. यामुळे सियाराम सिल्क मिल्स लि. एम. आय. डी. सी. नांदगाव पेठ या आस्थापनेतील कामगार प्रतिंनिधी व सर्व कामगार औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ मधील तरतुदींनुसार दि. २२ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ पर्यंत तीन दिवस संपावर गेले आहेत. या संपाला अमरावती जिल्हा वस्त्रोद्योग कामगार संघटना (संलग्न- सिटू) चा पाठींबा आहे. जर कंपनीने या तीन दिवसीय संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढला नाही आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सर्व कामगार तात्काळ बेमुदत संपाला सुरुवात करेल, अशी माहिती सियाराम सिल्क मिल्स लि. एम. आय. डी. सी. नांदगाव पेठ या आस्थापनेतील कामगार प्रतिनिधी आनंद यादव, धिरज खडसे, आकाश बावणे, शेख जमीर शेख रफिक, तज्ञिल सांभारे यांनी दिली आहे.