‘जंगलाचं देणं’ ; पळस
वसंताची सुरूवात झाली की कापसाच्या वावराची उलंगवाडी व्हायची.उलंगवाडी म्हणजे असं शेत किंवा वावर की ज्या शेतामध्ये उन्हाळ्यात शेतकऱ्यांनं आपली जनावरं चारायची. ही जनावरं पऱ्याटयाईचा हिरवाकच पाला, पत्ती, हराय, शेवऱ्याईचं गवत खायची. आम्ही पळसाच्या झाडाखाली बसून चरणाऱ्या ढोराईची सावलीत बसून गंमत बघायचो.तर कधी डांबरी सडकेवरच्या मोटारगाडया तासनतास निरखत बसायचो. अशा रखरखत्या उन्हात थंडगार सावली देणारा पळसच आमचा सखा, सोबती, जिवलग वाटायचा.सोबतीला फडक्यात घरून बांधून आणलेली जेवणाची शिदोरी व प्यायला कॅनीत थंडगार पाणी असायचं. ह्या कॅना बहुतेक तेलाच्या रहायच्या. त्या रिकाम्या झाल्या की त्या धुऊन स्वच्छ करून बोंदरी बांधून त्यामधे पाणी भरायचं .जंगलातील सुंदर नैसर्गिक थंडी हवा लागली म्हणजे ते पाणी एवढं गार व्हायचं की फ्रीज मधल्या पाण्यासारखं घशाखाली रिचवायला बिलकुल थंडगार वाटायचं.
जंगल खाली झाला म्हणजे दूरून दूरून पोटापाण्यासाठी शोधात आलेले मेंढपाळाचे कळपही जागोजागी आपला डेरा टाकून बसायचे. त्यांची ती तंबुसारखी ओळीनं लागलेली चालती फिरती घरं,समोर तीन दगडांची चूल, पाण्यासाडी स्टील,पीतयची भांडी. डोक्यावर एकावर एक अशी रचून जिथं पाणी उपलब्ध आहे तिथून हातापायात चांदीचे कडे घातलेली ही बाया मंडळी पायी एवढ्या तप्त उन्हात हंडे डोक्यावर घेऊन पाणी आणायची.सोबत दोन चार उघडी नागडी लहानगी पोरं त्यांच्या मांगमांगं अनवाणी चाललेली.सोबत एखाद्या कुत्रा असायचा.जो आपल्या या पाण्यासाठी दूर जंगलात गेलेल्या कुटूंबातील लोकांची सुरक्षा,चौकीदारी करायचा. त्यांना संरक्षण पुरवायचा. नाल्याच्या वा नदीकाठी वाढलेल्या गवतात,पळीतातातून आम्ही ढोरं चारत थंड सावलीच्या झाडाखाली बसलेलो असायचो. समोर अशा या रखरखत्या उन्हात पळसाची सुंदर झाडं आनंदाने उन अंगावर झेलत मस्त फुललेली असायची.जिवनातील दुःखाविषयी आमची कुठलीही तक्रार नसल्याची असंच बहुतेक ही जिवनाचं तत्वज्ञान आम्हाला सांगत असावी.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
धकाधकीच्या जिवनातही दुःख अंगावर झेलत माणसानं कसं फुलावं संकटातही कसं जगावं? यांचा परिपाठ देणारी ही फुललेली पळसाची लालभडक झाडं डोळ्यांनी नुसती पाहिली की मन आनंदाने बहरून यायचं.तसं मीही या पळसाच्या झाडा विषयी बि.ए ला असतांना आम्हाला ‘जंगलाचं देणं’ हे पुस्तकच अभ्यासक्रमात समाविष्ट होतं. त्यामधे पुस्तकाचे लेखक ‘मारूती चितमपल्ली’ हे जंगलातील झाडांची,पशु पक्षांची,वेलीची सुंदर माहिती सांगायचे.मला ते खुप आवडायचं. आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्याने जंगलांशी आमचा संबंध नेहमीच म्हणजे दररोजचाच यायचा.बहुधा ती माहिती आमच्या संबंधितच असल्याने ती माहिती खुप मस्त आवडायची. तेव्हापासून हे जंगलाचं घट्ट नातं मनात बसलं ते अजूनही घर करून बसलेलं आहे.आजही मी एखाद्या निसर्ग चित्रणावर लिहीत असतांना चार भिंतींच्या घरात राहून लिहूच शकत नाही.असं लेखन मला कृत्रिम वाटतं. परंतु तेच लेखन जंगलाच्या वा निसर्गाच्या सान्निध्यात केलेलं मला कसदार वाटतं. परिणामी ते अस्सल असं झरझर उतरतं. एवढी ऊर्जा त्या निसर्गामध्ये निश्चितच आहे.पाण्यानं भरून वाहत असलेलें ओढे , त्या काठावर बहरलेली सुंदर झाडं व त्या झाडावर थंड सावलीत झाडाझुडुपांमध्ये विसाव्या साठी बसलेली चिवचिवत व किलबिलाट करत असलेली पाखरं आपलं दुःख हलकं करतात.आपणास ती जिवन जगायला शिकवतात. एवढेच नव्हे तर आपल्या मनाची मरगळ दूर करतात.एवढी ताकद त्या निसर्गामध्ये आहे,फक्त पारखी नजर पाहिजे. दुसरीकडे आनंद शोधायला जायची तुम्हाला गरजच पडणार नाही. म्हणून तर ‘निसर्ग माझा सोबती’ असं म्हणतात ते खोटं नाही.
अशा या वसंत पंचमीच्या ऋतूत तप्त उन्हात पळसाची फुलांनी लदबदलेली सुंदर झाडं जंगलामधे सभोवताली नजरेस दृष्टीस पडायची एखाद्या लाव्हारसासारखी.आमचा बाप भर उन्हात पायजाम्याच्या सोग्याला आपला घामानं डबडबलेला चेहरा पुसत ढेकलांच्या वावरात बैलांना हाकलीत वखर वाहायचा.आम्ही झाडाखाली सावलीत बसुन बापाची ही कसरत कुतुहलाने बघायचो.तोही या प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात पळसासारखाच आनंदी व निर्विकार वाटायचा.आपलं ठणकणारं दुःख विसरून, उन्हातान्हात सुखाच्या वाऱ्याची झुळूक अंगावर झेलत असलेल्या फुललेल्या पळसासारखाच. त्याच झाडाच्या थंडगार सावलीत सोडलेल्या बंडीखाली बसुन घरून घामाच्या कष्टानं कमावलेली फडक्यात बांधून आणलेली भाजीभाकरी मस्त बसून खायचा.पंरतु आपल्या जिवनाची तक्रार न करणाऱ्या पळसासारखाच तोही स्थितप्रज्ञ,अगदी संकटातही स्तब्ध उभा राहणाऱ्या पळसासारखा वाटायचा. रंगपंचमीच्या दिवसात आम्हाला उंच झाडावर चढून फुलं काढायला मदत करणारा आमचा बापचं कामी यायचा.
पळसाची फुलं अगदी लालचुटुक मनाला मोहून टाकणारी अशी.चांदुर रेल्वेच्या जंगलात ही बहरलेली,फुललेली झाडे आवर्जून बघायला मिळतात. तेथे पळसखेड नावाचं एक गाव आहे. बहुतेक त्या फुललेल्या पळसाच्या फुलांच्या झाडावरूनच त्याला पळसखेड हे नाव पडलं असावं असं मला तरी वाटतं.बरेचदा येताजाता ती झाडं मी आवर्जून बघायचो.थोडावेळ गाडी बाजूला घेऊन क्षणभर विश्रांती घ्यायचो. समोर वळणावळणाची डांबरी सडक बाजूला घनदाट हिरवीगार पळसाची झाडी व वळणाच्या रस्त्यावर वाघा मायचं मंदिर असं ते दृश्य. तेथील पुजाऱ्याला याबाबत विचारणा केली असता पूर्वी म्हणजे आताही तेथील निसर्ग सौंदर्य पाहून रात्री वाघ यायचे. म्हणून या देवीच्या मंदिराला वाघा मायचं मंदिर म्हणूनच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक ओळखतात.
● हे वाचा – सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?
पळसाची ही फुललेली लालचुटुक फुले रंगपंचमीच्या आदल्या दिवशी आम्ही ती जंगलातून घरी आणून चूलीवर भगोन्यात वा बटलोईत पाणी घेऊन त्यात साजरी पळसाची फुललेली लालभडक फुलं टाकून ती साजरी चुलीवर रात्रभर उकळून सकाळी उठल्यावर त्या फुलांच्या पाण्या पासून सुंदर रंग बनवायचा व शिशीत भरून त्या रंगानं ‘धुयमाती’ म्हणजे रंगपंचमी खेळायची.तसं बघीतलं तर पळस ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाडसर असलेली पानं सम्पूर्ण विदर्भात लग्ना,कार्यात, समारंभात जेवणाच्या पत्रावळीसाठी व भाजीच्या द्रोणासाठी यांच्या पानांचा वापर हमखास व्हायचा.पत्रावळीवर जेवणावळीचा आनंद म्हणजे स्वर्गसुखच,अवर्णनीय तो न घेणारा माणूस हा जगात विरळाच. लहान लहान घरून जेवणं करून आलेली मुले मुद्दाम पत्रावळीच्या पंगतीत आईवडील, आबा,आजीसंग आवडीनें जेवायला बसायची.याच पळसाच्या पानावर पंगत बसल्यावर एका पोळीवर आगीतले कोळसे घेऊन त्यावर तुपाची धार टाकून
‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ सहजीवन होते नाम घेता फुकाचे,जिवन करी जिवित्वा,अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे,जाणीजे यज्ञकर्म’
पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणत मोठ्याने जयजयकार होऊन मगच अंगारी पंगतीत फिरवल्या जायची.पानांपासून बनवलेल्या हिरव्याकंच पत्रावळीवर समोर वाढलेल्या ग्लासातलं पाणी शिंपडून त्यामधे जेवलेलं जेवणं व्हॉटेलातल्या पंचपकवान्नालाही मागं टाकायचं. पातळ रस्सा केलेली भाजी पत्रावळीतून सांडू नये म्हणून कोणाच्या फाटक्या पत्रावळीले ठिगळ लावण्यासाठी एक जास्तीची पत्रावळी घेऊन ती आपसात अर्धी,अर्धी वाटली जायची. म्हणजे पंगतीत बसणाऱ्या शेजाऱ्या,पाजाऱ्याले पत्रावळीची आवर्जून देवाण घेवाण व्हायची.लोकं एखाद्या तुकडा मिळतो का याकरिता पत्रावळी वाटणाऱ्याची खुशामत करायची. पूर्वी किराणा दुकानात खावखेडयात होळीचे रंग उपलब्ध नसायचे. तेव्हा पळसाच्या झाडाले वसंत ऋतूत म्हणजे (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात. याच फुलांपासून पूर्वी घरोघरी रंग बनवायचे व धुलीवंदनाच्या दिवशी मुलं घरोघरी, चौकाचौकात रंगोत्सव खेळायचे.
आता हल्लीच्या युगात सहज उपलब्ध होत असणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत आता मागे पडली आहे म्हणजेच कालबाह्य ची झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पळसाच्या बिया फार कडू असुन.त्याला बऱ्याच ठिकाणी पळसपापडी असं म्हणतात. त्याचा औषधी उपयोगही भरपूर प्रमाणात आहे. अक्षय्य तृतीयेला आपल्या पूर्वजांचं म्हणजे पीतरांचं जेवणासाठी पान टाकण्यासाठी (वैशाख शु.३) पळसाच्या झाडाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळीला खुप महत्व असायचं व अजूनही आहे.या झाडाची पानेही तीन पानाच्या समूहातच असल्याने यावरूनच ‘पळसाले पानं तीनच’ ही म्हण मराठी भाषेत रुढ झाली ती यावरूनच.या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार आणि रंग असतो. संपूर्ण झाड आगीनं पेटल्यासारखे दिसते.
ही पळसाची झाडं बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हियेतनाम, मलेशिया आणि पश्चिम इंडोनेशियामध्ये जास्त प्रमाणात आढळतात.असं असलं तरी रखरखत्या उन्हात घट्ट पाय रोवून फुललेला उभा असलेला आपल्या जीवनाची काहीच तक्रार करत नसलेला ‘स्थितप्रज्ञ’ पळस हा मला बालपणीचा सखासोबतीच वाटायचा.
प्रा.विजय जयसिंगपुरे
अमरावती.
९८५०४४७६१९.