
टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘टप्पू’ आणि ‘बबिता’ म्हणजेच भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांचा गुपचूप साखरपुडा झाला का? इंस्टाग्राम, यूट्यूब आणि X (पूर्वीचं ट्विटर) वर फोटो, रील्स, हेडलाईन्सचा पूर आला होता. लोकांचं कुतूहल वाढत होतं, काही जण या नात्याचं स्वागत करत होते, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अखेर या अफवांवर स्वतः ‘टप्पू’ उर्फ भव्य गांधीनेच विराम दिला आहे.
“मीही त्या बातम्या वाचून चकित झालो!” भव्य म्हणतो, “पहिली गोष्ट म्हणजे, ज्या टप्पूचा साखरपुडा झाल्याचं लोक म्हणतायत, तो मी नाही. दुसरी म्हणजे, ही अफवा बडोद्यातून पसरली. आईला अचानक फोन आला ‘अरे, तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला का?’ ती एवढी चिडली की तिनेच विचारलं, ‘तुम्हाला अक्कल आहे का?’ हे सगळं इतकं अचानक आणि विनोदी होतं की आम्ही काही काळ काय बोलावं तेच कळेना.”
भव्यने या गोंधळात एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं “मुनमुन दत्ता माझ्यासाठी मोठी बहीण आहे. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि मी तिच्याकडून खूप काही शिकलो आहे अभिनय, संवादफेक, वर्तन. ती नेहमी मार्गदर्शन करते, प्रोत्साहन देते. त्यामुळे लोकांनी हे नातं चुकीच्या दृष्टीने पाहू नये.”
त्याने पुढे सांगितले की अफवांचा प्रभाव केवळ त्याच्यावरच नाही, तर त्याच्या कुटुंबावरही पडतो. “माझ्या आईला लोकांनी फोन करून विचारलं, अभिनंदन! तेव्हा मला वाटलं सोशल मीडियावर काहीही लिहिणं किती सोपं झालंय, पण त्याचे परिणाम किती मोठे असतात, हे लोकांना कळत नाही.”
भव्य गांधीचा प्रवासही तितकाच रोचक आहे. 2008 साली फक्त अकरा वर्षांचा असताना त्याने ‘टप्पू’ म्हणून लहान मुलांच्या टोळीचं नेतृत्व केलं. त्याचा निष्पाप चेहरा, खोडकर संवाद आणि जेठालालशी असलेली त्याची गोड नोकझोक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. जवळपास नऊ वर्षं त्या भूमिकेत राहिल्यानंतर 2017 मध्ये त्याने शो सोडला आणि गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळला. “टप्पू ही फक्त भूमिका नव्हती, ती माझ्या आयुष्याचा भाग होती,” तो भावुकपणे म्हणतो.
पुन्हा ‘तारक मेहता…’ मध्ये परतण्याबद्दल विचारलं असता तो हसत म्हणाला, “हो, नक्कीच मला परत यायला आवडेल. कारण त्या सेटवर मी मोठा झालो, ते सगळे लोक माझ्या कुटुंबासारखे आहेत.”
भव्यच्या या स्पष्ट, प्रामाणिक उत्तरानंतर चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी लिहिलं “भव्यने जे सांगितलं ते अगदी सच्चं आहे, तो अजूनही आपल्या भूमिकेसारखाच साधा आणि नम्र आहे.”
पण इतकं सगळं झाल्यानंतरही इंटरनेटवरील चर्चेला मात्र पूर्ण विराम लागलेला नाही. काही जण अजूनही जुन्या फोटोवरून तर्कवितर्क मांडत आहेत. मात्र, भव्य गांधीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर सत्य स्पष्ट झालं आहे ‘टप्पू’ आणि ‘बबिता’मध्ये साखरपुडा नाही, तर एक आदरपूर्ण नातं आहे. शेवटी, जसं जेठालाल म्हणतो “बापूजी, आजकाल लोकांना अफवा पसरवायला सोशल मीडियाचं ‘साखरपुडं’ झालंय की काय?”
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
10 वर्ष लहान ‘टप्पू’चा ‘बबिता’सोबत साखरपुडा?