📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

पारावरची चालती बोलती पुस्तके.!

On: September 17, 2025 5:03 PM
आम्हाला फॉलो करा:

पारावरची चालती बोलती पुस्तके.!

ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली …
डोळे विझत चाललेली गावाकडची …
ही म्हातारी माणसं म्हणजे ….
आयुष्यावरली चालती-बोलती पुस्तकं असतात..!

आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला..,
सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली..,
ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे..,
गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे….

कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध ….
जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का….
नांगर हाकून कमरेला आलेला बाक….
नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा…

कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ….
डोईवर पांढरी टोपी….
पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची
साथ सोबत दर्शवणाऱ्या अशाच. ….

डोळ्यांवरचा चष्मा किमान …
दोन-तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला…
गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा
हीच काय ती संपत्ती….

हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न ..??रानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा ….पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस …!

ह्यांची सोसायची तयारी….

आताच्या पिढीतल्या …
शेतकऱ्यासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत.
ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की ,
शेतात अजूनही दारे धरायला लागतात …
म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.

देवळात पांडुरंगासमोर ….
तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर
नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील.

ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते ..?
याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत.

दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी
जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या
दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन-तीन चण्या ..
हेच अमृत जेवण…!

कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा
गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती.
मग पारावरच्या गप्पा…!!!

एखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार..,
गप्पांचे विषय अगदी साधे…,
`माती अन नाती….`
ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने
कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील.
डोळ्यात पाणी का आले ..?
कधी वाच्यता करणार नाहीत.

मोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया,
सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक,
रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा …
असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही.
स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने
कोणत्याही साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची
तिळमात्र निकड नाही.

दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर
ते अलगद तरंगत असतात.
दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील ,,
पण ते स्वतः ओले होत नाहीत की ..
बुडूनही जात नाहीत.

म्हणूनच ही माणसं …
आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात.
गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन
शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात.

ना बीपी .. ना डायबेटीस .. न कोलेस्टेरॉल..
नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू…!

सुख दुखाच्या साध्या व्याख्या…
जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी…!
कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही.

मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव.
जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण …!
आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत ,
अन दुख झाले म्हणून …
गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत.
नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय..!

खूप हेवा वाटतो अशा लोकांचा…!!
अशी माणसे पाहिली की …
डोळे नकळत भरून येतात .…
अन मग..
काळजात कोलाहल माजतो..!!

रामकृष्ण हरी…..

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now