
‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ
“ताई कितीला दिला हा फडा?” ” भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला” त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला “दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?” ” भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून” मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.
एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. ” भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले” “अहो ताई मी किंमत कमी करनार नाही ” त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.
शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज. परत ती म्हणाली “भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भी खराब नाही.” “अहो मी त्या फड्याच्या पानोळ्या नाही बघत.त्या झिजूनच जानार आहेत ना.मी बघत आहे मुठ मजबूत असावी.” “भाऊ मी स्वता बळ लाऊन आवळल्यात मुठी.. ” ” भाऊ कोनता घेता मग ? ” “ताई दोनीबी” तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले. “हे घ्या एकशे दहा रुपये” भाव न करता फडे घेवून मी माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी .. मी विचार करत होतो.
कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर भारे आना.मग त्या पानांचे बारिक बारिक पाते कट करा. त्याला एका गोलाकार पध्दतीने विना.ते कितीतरी वेळा हताला टोचते.नखात टोचल्यावर जिभाळी लागते.कुठेच जीव लागत नाही इतकी आग होते.तळहावर ते सर्व विनायचे.मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची.यावेळी स्त्रीयांना सर्व जीव एकवटून ती मुठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी.
मुठ ढिली असेल तर गिर्हाइक निघून जाते. एवढ्या बेजारीतुन त्या फड्याची किंमत किती तर पंन्नाससाठ रुपये.. आन यांच्या मॉल मधला झाडु कितीला तर एकशे दहा पासुन बोली … एका दिवाळीत भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात …!