तर अशा धम्मचक्रप्रवर्तनाची गरज काय?
दरवर्षी दसरा आला की नेमकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. त्यांनी केलेल्या महान कार्याची आठवण येते नव्हे तर असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते तर आम्ही ख-या अर्थानं स्वतंत्र झालो असतो का? आम्हाला स्वतंत्र्यता अनुभवता वा उपभोगता आली असती का?
या प्रश्नांचं उत्तर नाही असंच आहे. आम्हाला स्वतंत्रता नक्की मिळाली असती. पण मुठभर जर सोडले तर बाकीच्यांना स्वतंत्रता उपभोगता आली नसती.
मी हिंन्दू जरी जन्माला आलो असलो तरी हिंन्दू म्हणून मरणार नाही. हे बाबासाहेबांचं विधान. ते त्यांनी अंतिम समयी का होईना सार्थ करुन दाखवलं. कारण त्यांना माहीत होतं की जर माझा हा समाज याच धर्मात राहिला, तर या लोकांची प्रगती होणार नाही. तेच कर्मकांड तेच देवी देवता आणि त्याच रुढी परंपरा पाळत हा समाज जगेल, त्यांना प्रगती करता येणार नाही. म्हणून माझ्या या समाजाच्या उद्धारासाठी या समाजाला दुसरा धर्म स्विकारावा लागेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दुसरा धर्म स्विकारायचा होता. पण नेमका कोणता धर्म स्विकारावा?याबद्दल त्यांनी अभ्यास केला. काही मौलवी त्यांना त्यांनी आपल्या धर्मात यावे म्हणून विनवू लागले. काही फारशीदेखील. पण डॉक्टर बाबासाहेब यांचा गाढा अभ्यास. मला शांतीचा, प्रगतीचा आणि नवविचाराचा धर्म पाहिजे. त्यानुसार बौद्ध धम्म हा त्यांना शांती, प्रगती व नवविचारांचा आढळला. त्यानुसार त्यांनी ह्या धम्माची निवड करुन हा धम्म शेकडो बांधवासमवेत चौदा ऑक्टोबर १९५६ ला स्विकारला आणि आव्हान केलं की आजपासून दलित मागासवर्गीयांनी हा बौद्ध धम्म स्विकारुन आपला उद्धार करुन घ्यावा. तो दिवस दस-याचा होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला आव्हान केलं खरं. त्यानुसार कोंबड्या खायला तसेच मुर्तीपुजेला डॉक्टर बाबासाहेबांनी विरोध केला. ज्यांनी हा धम्म स्विकारला. ते खरेच आज यशोशिखरावर आहेत आणि ज्यांनी तो धम्म स्विकारला नाही, ते मात्र आजही सनातन्यांच्या ठोकरा खात आहेत. त्यांना आज मात्र बाहेर पडायला रस्ते नाहीत. जे रस्ते आज त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. फरक एवढाच आहे की डॉ. बाबासाहेबांनी म्हटलं, ‘शिका संघटीत व्हा व संघर्ष करा.’ ते बाबासाहेबांनी केलेलं नाही. आज त्यामुळंच त्यांच्यावरच अत्याचार होतात. नाव मात्र दलित म्हणून सर्वांचं होतं. पण आम्ही हे मोजत नाही की दलित म्हणून गणल्या जाणा-या अठरापगड जातांपैकी एकट्या महार जातीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार हा धम्म स्विकारला. त्या एकट्या महार जातीवर आजच्या काळात किती अत्याचार होतात? तर त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. सर्वात जास्त अत्याचार दलित म्हणून गणल्या जाणा-या इतर लोकांवर होतात. कारण ते आजही सनातन्यांचे गुलाम आहेत. देवी देवता यात गुरफटलेले आहेत. त्यांच्यात आजही एकी नाही.
ही दलित जात सोडा. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्रप्रवर्तन केवळ महार नावाच्या एकाच व्यक्तीपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर ते सर्वसमाजव्यापक केलं. ज्याला पटेल तो घेणार? किती लोकांनी स्विकारला मग हा धम्म? केवळ महार सोडला तर इतरांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. जागतिक क्रमवारीत या धम्माची संख्या वाढती असतांना आम्ही आमच्या देशात या धम्माला केवळ महारांपुरतं सीमीत केलं आहे यात शंका नाही. धम्म चांगला आहे. सत्य अहिंसेने भरलेला आहे नव्हे तर जगातील शांतीचे तत्व धम्मात दडलेले आहे. असे असतांना आम्ही धम्माचा स्विकार न करता लपुनछपून या धम्माचा द्वेष करीत असतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्विकारला. त्याचबरोबर हिंदू धर्माची तत्वे नाकारली. ज्या धर्मात दलितांना माणूस म्हणून जगवत नाही नव्हे तर जगता येत नाही. तो धर्म काही कामाचा नसून त्यांच्या परंपराही कामाच्या नाहीत. मुळात हिंदू धर्मात भेदाभेद सांगीतलेला नसूनही जर माणसे स्वार्थासाठी जर सवर्ण दलित भेदभाव, स्रीपुरुष भेदभाव पाळत असतील, तर तो धर्म कोणत्या कामाचा? म्हणत बाबासाहेबांनी धम्मपरीवर्तन केलं. त्यांना हिंदू धर्म प्रिय जरी असला तरी त्या धर्मात माणूस बनविणारी तत्वे नव्हती.
डॉक्टर बाबासाहेबांनी आता बौद्ध धम्म स्विकारला आहे. त्यांच्या अनुयायांनीही हाच धम्म स्विकारला आहे. या धम्मात कर्मकांड नाही. ज्या बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी घेतल्या, त्या प्रतिज्ञेत डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं की मी देवधर्म व चमत्कार पाळणार नाही. कोंबड्या बक-याही खाणार नाही. पण आज धम्मातीलच मंडळी कोंबडं बकरं खातात. सर्रास खोटं बोलतात. हिंसा करतात नव्हे तर डॉक्टर बाबासाहेबांचा होणारा अपमानही सहन करतात. हे बरे नाही. आम्ही जेव्हा आमच्यावर अत्याचार होतो. तेव्हा संविधानाचा उपयोग करुन घेतो. अन् काम संपल्यावर बाबासाहेबांना शिव्या देतो हे बरे नाही. मात्र एक महार जात जर सोडली तर किती मंडळी डॉक्टर बाबासाहेबांच्या हिताच्या गोष्टी करत असतात तर आकडेवारी अत्यल्प आहे. आम्ही ओरडतो की अमुक ठिकाणी आमच्यावर जातीय अत्याचार झाला. पण खरंच ज्या इतरेतर समाजावर जातीय अत्याचार होतो, जे अँक्ट्रासीटीचा फायदाही घेतात. ते खरंच डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांनी चालतात का? त्यांचा समाज तरी. याचं उत्तर नाही असंच आहे. याचाच फायदा घेवून ही इतरेतर जातीची मंडळी होणा-या अत्याचारावर एकत्र येवू शकत नसल्याने आजही जातीय अत्याचार सुरु आहेत नव्हे तर त्यात आणखी वाढ झाली आहे.
याच गोष्टीचा विचार करुन बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला व नवविचारांचा बौद्ध धम्म स्विकारला. याचे कारण कोणी या समाजावर अत्याचार करु नये. त्यांनी हा धम्म दलितांनी आवर्जून स्विकारावा यासाठी विनंतीही केली. पण आम्ही त्यांना दाद न देता आजही धर्म बदलविला नाही. त्यामुळे आजही होणारे हाल भोगतो आहोत. तसेच अँक्ट्रासीटीच्या कायद्याचा उपभोग घेतो आहोत आणि बाबासाहेबांनाच शिव्या हासडतो आहोत हे कितपत बरोबर आहे. याचा विचार करण्याची आज गरज आहे. त्याशिवाय आपल्यावरील अत्याचार ख-या अर्थानं दूर होणार नाही आणि आपल्याला धम्मप्रवर्तनाची गरज समजणार नाही. हे तेवढंच सत्य आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आपण जर बाबासाहेबांच्या विचारानं चालत नसू. तर अशा धम्मचक्रप्रवर्तनाची गरज काय? त्यापेक्षा आपण त्याच धर्मात राहावं व पिढीजात विटाळाचा जो अत्याचार सहन केला, तोच अत्याचार तिथं राहून सहन करावा म्हणजे झालं.
-अंकुश शिंगाडे नागपूर