कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम
गौरव प्रकाशन ठाणे, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिमेन्स वर्कर्स युनियनतर्फे एक विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिमेन्स वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष मनोज बोडके, उपाध्यक्ष जयंतीलाल गुप्ता, सहचिटणीस भास्कर कोतवाल, सेक्रेटरी महादेव गेजगे, सांस्कृतिक विंगचे अध्यक्ष राकेश मांजरेकर, युनिट सेक्रेटरी शिनोज नायर, विश्वनाथ शिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ठाणे विभागाचे प्रमुख नितीन पाटील, उल्हासनगर केंद्र प्रमुख वीणा तरेकर, शहाड केंद्र संचालक गजेंद्र आहेर, वर्तक नगर (ठाणे) केंद्र प्रमुख प्रवीण सकट, पनवेल केंद्र प्रमुख दयानंद कदम आणि गुणवंत कामगार अरविंद मोरे हेही उपस्थित होते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नितीन पाटील यांनी कामगार कल्याण मंडळाच्या उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यानंतर गजेंद्र आहेर यांनी मंडळाच्या शैक्षणिक, क्रीडा, शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अनुदान, साहित्य संमेलन व इतर योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
गुणवंत कामगार अरविंद मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “श्रम आणि भांडवल यांची सांगड घालून देशाचा विकास होतो. उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.” त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत कामगार कल्याणासाठी त्यांचा मोलाचा वाटा अधोरेखित केला. तसेच, त्यांनी आपल्या स्वयंलिखित ‘कुतूहलाचा करिश्मा’ या पुस्तकाची प्रती सिमेन्स वर्कर्स युनियन व मंडळास भेट म्हणून दिली.
कार्यक्रमात महेश शिखरे व भूषण पाटील यांनी कामगार जीवनावर आधारित कविता सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर आभार प्रदर्शन विश्वनाथ शिर्लेकर यांनी केले.