विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज
15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती. संत सेवालाल महाराज यांचे विज्ञानवादी दुष्टिकोन काय होता ते.आपण या लेखातुन पाहुया!
संत सेवालाल महाराज जसे अहिंसावादी ,मानवतावादी होते. तसेच ते विज्ञानवादी सुद्धा होते. संत सेवालाल महाराज हे अठराव्या शतकातील अलौकिक व्यक्तिमत्व होते. ते जरी निरीक्षर असले तरी त्यांचे विज्ञानवादी विचार उच्च कोटीचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व चिंतनशील होते .ते आपल्या बुद्धीच्या भरोशावर तर्क लावत असत. आणि गोरबंजारा समाजाच्या प्रगती करता ते समाजात असे विज्ञानरुपी विचार ते पेरत असत…..
* तम सोता तमार जिवणेंम दिवो लगा सको छो!
* कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत.
* कोई केती कमी छेणीं, सोतार ओळख सोता कर लिजो.
* भजनेम पूजनेम वेळ घाले पेक्षा करणीं करेर शिको.
* मारे सिकवाडी ध्यान दिजो,
* जाणंजो… छांणजो.. पचचं …माणंजो।।
भावार्थ: संत सेवालाल महाराज म्हणतात की, तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार स्वतःच करू शकता. कोणाचीही भक्ती अथवा पूजा-अर्चा करू नका. भक्ती करणे, पूजा करणे म्हणजे आपल्या जीवनाला गुलामी स्वीकारणे होय. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करण्यासाठी तुम्ही स्वतःला जाग्रुत करा. स्वतःचा स्वत्व जागरूक करून आपली प्रगती करा. भजन पुजनात वेळ घालवण्यापेक्षा आपले कर्तव्य पार पाडा. कर्तुत्वहीन माणसाची समाजात कदर नसते. आपली प्रगती ही विज्ञानवादी विचारातूनच शक्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा कोणाच्याही भरोशावर राहून आपली प्रगती अजिबात होणार नाही. करिता “जाणंजो… छाणंजो… पचचं… माणंजो…..!” म्हणजे गोर बंजारा समाजाला कोणतीही गोष्ट स्वीकारताना प्रथम त्याला जाणून घ्या त्यानंतर त्याची सर्व बाजूने चिकित्सा करून ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरते का ते बघा. त्यानंतरच तुमच्या मनाला पटत असेल तर ती स्वीकारा. असे संत सेवालाल महाराज सांगतात. आज सर्वच क्षेत्रात, सर्वच धर्म, संप्रदायात सर्व जाती जमाती द्वारे राजकीय पक्षाद्वारे जनतेला फसवणुकीचे व दिशाभूलीचे प्रयत्न चालू आहेत. अशावेळी संत सेवालाल महाराजांचे वरील बोल लक्षात ठेवून वर्तन केल्यास कोणीही आपली फसवणूक करणार नाही. यासाठी आपण दक्ष राहायला पाहिजे. अठराव्या शतकात गोरबंजारा समाज निरीक्षर असल्यामुळे अंधश्रद्धा, कर्मकांड ,तंत्र- मंत्राच्या चक्रव्युहात पूर्ण पणे फसलेला होता. त्यामुळे बरीच मंडळी गुन्हेगारीकडे वळली असल्यामुळे संत सेवालाल महाराज आपल्या वचनाद्वारे सांगतात ….
आची करणी करेर शिको,
मार सिकवाडीप ध्यान दिजो
भावार्थ: हे बांधवांनो चांगले कर्म करा त्यांनी आपल्या जीवनात कर्म निष्ठालाच महत्त्व दिले. सतत लोकांना प्रबोधन करून जागरूक करण्याचे काम संत सेवालाल महाराज करत होते. ते पुढे सांगतात….
केरी भरोसेपर मत रिजो,
पण दुसरेर भरोसो बणों।
भावार्थ :कोणीही आपल्या जीवनाचे भले करेल, आपले कल्याण करेल अशा विश्वासात बसू नका. पण दुसऱ्याला आपला भरोसा वाटेल असे प्रामाणिक वागा. समाजात ठिकठिकाणी फसवणारे, लुटणारे लोक आहेत. त्यापासून सावधान रहा गोरबंजारा समाजातील अंधश्रद्धा घालवण्याची संत सेवालाल महाराज यांनी खूप प्रयत्न केले. देवी प्रसन्न करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या बळी प्रथेला त्यांनी प्रंचड विरोध केला. आपण निसर्गपूजक आहोत असे ते वारंवार सांगत असत. अग्नी, सूर्य, वायू, पृथ्वी, वृक्ष ,प्रर्जन्यवृष्टी,वरूण, याला प्रसन्न करण्यासाठी तंत्र -मंत्र आणि बळीप्रथा होती. या विरुद्ध प्रहार करून ते चोको पूजन करायचे ते पुढे म्हणतात.
* म धुजीयु कोणी..। आणि खेलीयु.. कोणी
भावार्थ: अनेक भक्तगण पुजारी, भगत, भोपे,अंगात देव, देहात देव आल्याचे ढोंग आणि नाटक करून वेडेवाकडे अंग मोडतात. मुंडके हलवितात. आणि काही तरी बडबड करतात. देवी नवस मागत आहे. दान करा ,लोकांना जेवु घाला. व्रत उपवास करा असे सांगून लोकांना फसवितात. ते मी अजिबात करणार नाही. आणि तुम्हीही असे फसवेगिरीचे नाटक करू नका .असे ते आपल्या प्रबोधनातुन सांगत असत. एक सच्चा विज्ञानवादी युगपुरुष म्हणून संत सेवालाल महाराज यांची आज ओळख होती. हे आपल्याला नकारता येत नाही. गोरबंजारा संस्कृती आणि गोर लोकसाहित्यातून तांडयाची मूळ संस्कृती आणि मौखिक साहित्य हे निसर्गवादी, विज्ञानवादी असून निसर्गवादी, विज्ञानवादी म्हणजे परिवर्तनवादी असल्याचे दिसून येते. गोरबंजारा समाजामध्ये आजही होम-हवन, पूजा -अर्चा , कर्मकांडाला थारा नाही….
* मुयेन मटी ..आंन.. जीवतेनं बाटी.।
अशी संकल्पना आजही रूढ आहे. भावार्थ: मेलेल्या माणसाला माती आणि जिवंत असलेल्या माणसाला बाटी असा रोखठोक व्यवहार गोर गणात असून माणूस मेल्यानंतरही त्यांचे सुतक बाळगत नाही. किंवा तेरवी, अस्थिविसर्जन अशा भानगडीत पडत नाही. आता शिकली सवरली माणसे या भाझंगडी करतात. तो भाग वेगळा आहे. संत सेवालाल महाराज म्हणतात….
* नंगारा थाळीर घोरेम रिजो.।
भावार्थ: नंगारा आणि थाळी हे गोरबंजारा समाजातील प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन असून करमणूक आणि जागृतीचे सुद्धा साधन आहे. बंजारा समाजात दररोज रात्रीला या दोन साधनांच्या माध्यमातून जागृतीचे कार्य चालू असते.
गोरबंजारा समाजात हे भजण्या लोक विद्वान जरी नसले तरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी गोर बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास जिवंत ठेवला आहे. हे नाकारता येणार नाही. संत सेवालाल महाराज यांचे जे बोल, वचन आणि लडी आहे. ते “नंगारा थाळीरे घोरेम रीजो” हे बोल विज्ञानाकडे घेऊन जाते. याचे कारण म्हणजे संत सेवालाल महाराज यांना समाजाने भजन करावे हे अजिबात अभिप्रेत नाही. तर समाजाने सतत अंधश्रद्धा, वाईट चालीरीती कर्मकांड यांच्याविरुद्ध सतत जनजागृती करत राहावी. असे त्यांना अभिप्रेत आहे. आणि होते.संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेले जनजागृतीचे हे अनमोल विचार अंधश्रद्धेत बुडालेल्या समाजापर्यंत पोहोचण्याचे काम अहोरात्र सुरू असायला पाहिजे. असे त्यांना वाटत होते. संत सेवालाल महाराज यांचे उपदेश आणि बोल हे वैज्ञानिक दृष्टीवर आधारित असून त्यांचे म्हणणे होते की, मातापिता हे आपणास वंदनीय आणि पूजनीय आहे. धर्मग्रंथ किंवा मी सुद्धा तुम्हाला काही सांगत असेल तर त्यावर विश्वास न ठेवता. तुम्ही स्वतः तुमच्या अंतःकरणातील अंतर्मनाची स्वानुभावाची संमती घेऊन कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवून अनुकरण करा. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा दबावामुळे स्वार्थासाठी कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवू नका. खरे खोटे तपासून जे सत्य आहे. तेच स्वीकारा म्हणून ते वारंवार सांगतात …*जाणंजो ..छाणंजो..। पचचं ….माणंजो.*
संत सेवालाल महाराज यांनी अठराव्या शतकात आपल्या वाणी आणि बोल वचनातून विज्ञानवादी, अहिंसावादी, मानवतावादी विचार पेरल्यानंतरही आज गोरबंजारा समाजाची परिस्थिती दयनी आहे. गोर बंजारा समाज संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज यांच्या अनमोल उपदेशाने धर्मवीरहीत तर होता. परंतु तो होम-हवन, पूजा;अर्चा कर्मकांड, गंडेदोरे, तंत्र- मंत्र यापासून कोसो दूर होता. परंतु महानायक वसंतराव नाईकसाहेबांच्या आरक्षण नीतीने नोकरीवर लागलेल्या लोकांनी गोरसंस्कृतीला फाटा देऊन आज ते संकट चतुर्थी, एकादशी, होम हवन, पूजा -अर्चा, सत्यनारायण ,वास्तुशांती बाढ-भविष्य यांच्या नांदी लागलेली असून लग्नात सुद्धा गुण जुळवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. जेवढा मोठा अधिकारी तेवढा तो धार्मिक. कर्मकांडात गुंतलेला. (काही लोक अपवाद आहे.) कसा सुधारणार गोरबंजारा समाज ? खरंच आपल्याला प्रगती करायची असेल तर संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज यांचे विज्ञानवादी, क्रांतीकारी, अहिंसावादी, मानवतावादी विचारानेच आपल्याला पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही. जसे भारतात गांधीवाद, आंबेडकरवाद, साम्यवाद असे अनेक वाद आहेत. तसेच अखिल गोरगणाने सेवालालवाद का स्वीकारू नये? स्वीकारलेच पाहिजे. याशिवाय गोरगणाला तरणोपाय नाही. आपली अधोगती थांबवायची असेल तर आपल्याला सेवालालवाद स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही ही काळया दगडावरची रेष आहे. संत कबीर, संत तुकोबाराय यांच्याप्रमाणे संत सेवालाल महाराज हे शुद्धा अंधश्रद्धेवर प्रहार करणारे विज्ञानवादी संत होते. समाजामध्ये अंधश्रद्धा फैलवणाऱ्या कायम भोंदू बाबाच्या आणि पापाचे आचरण करणाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. गोरबंजारा समाजात निरक्षता व दारिद्र्य यामुळे अंधश्रद्धा पसरली होती. त्यामुळे गोरबंजारा समाजाची परिस्थिती अत्यंत विदारक झाली होती. त्यामुळे गोरबंजारा समाजातील जनतेची अतोनात पिळवणूक होत होती. मेहनती व सामर्थ्यवान समाज असतानाही अनेक लोक गुलामीत जीवन जगत होते. हे संत सेवालाल महाराज यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी गोरबंजारा समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी आपल्या प्रबोधनातून ते सतत ढोंगी, लबाड लोकाविरुद्ध प्रहार करीत असत. त्यांच्या शिकवणीतून गोरबंजारा समाजाने व प्रत्येक व्यक्तीने कसे राहावे, कसे वागावे या सर्व गोष्टीचा त्यांनी उहापोह केला,असून प्रत्येक माणसाला सारखीच बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य ,गुणवत्ता असते परंतु स्वतःवर विश्वास नसल्यामुळे आपण आपले जीवन सार्थक करू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात कोणीही कोणापेक्षाही लहान किंवा मोठा नाही. तुम्ही तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकता. अंधश्रद्धेच्या अंधारात कितपत पडलेल्या गोरबंजारा समाजाला संत सेवालाल महाराज यांनी विज्ञानवादी विचार देऊन प्रकाशाकडे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे संत सेवालाल महाराज केवळ संत नाही. तर ते क्रांतिकारी महामानव आहेत. त्यांचे क्रांतिकारी विचार एक दोन पुस्तकात मांडणे तरी मला शक्य नाही .संत सेवालाल महाराज यांचे अहिंसावादी ,विज्ञानवादी, मानवतावादी आणि धर्मविषयक आणि राजकीय विषयक अनमोल विचाराचे अनेक खंड निर्माण होऊ शकतात. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी असे म्हणावे वाटते की, गोरबंजारा समाजातील पीएचडी धारक आमचे गोरबांधव संशोधनात्मक पुस्तक काढण्यावर भर देत नाही. त्यांना भीती वाटते की संत सेवालाल महाराज हे जर आपण खरे मांडले. तर समाजात समस्या निर्माण होऊ शकते. त्यांचेही बरोबर आहे. याआधी आंतरराष्ट्रीय साहित्यिक तथा गोरविचारवंत भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब, तांडाकार आत्माराम कनिराम राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांचा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु समाजाने त्यावरही उलट सुलट प्रतिक्रिया त्यावेळी दिल्या होत्या. याबाबत अभ्यासपूर्ण संशोधन होऊन संत सेवालाल महाराज यांचे अनमोल कार्यावर एखाद्या विस्तृत मांडणी असलेल्या पुस्तकाची आज गोरबंजारा समाजाला गरज आहे. संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर तांडाकार आत्माराम कनीराम राठोड, भिमणीपुत्र मोहन नाईक, महान तपस्वी संत डॉ. रामरावबापू महाराज ,डॉ. कृष्णा राठोड ,प्रा. मोतीराज राठोड, प्राचार्य ग.ह.राठोड, डॉ. रमेश राठोड, प्रा. गजानन सोनुने, प्रा. भाई प्रेमसिंग जाधव, डॉ. प्रकाश जाधव, कवी शेषराव जाधव, आनंद जाधव, प्रा. प्रवीण पवार ,प्रा. गौतम निकम. राजकुमार राठोड ,श्याम नाईक, रामसिंग चव्हाण, या व अशा इतर अनेक लेखकांनी अत्यंत सुंदर रीतीने लिखाण केलेले असून त्यामधील माहिती आणि संदर्भ सगळे वेगवेगळे वाटतात. एकवाक्यता दिसुन येत नाही. परंतु त्यांनी केलेला प्रयत्न निश्चितच चांगला असून संत सेवालाल महाराज यांचे अनमोल वाणीतून अंधश्रद्धा, वाईट, रूढी परंपरावर केलेला प्रहार सामान्य जनतेत पोहोचण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल या सर्व लेखकाचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. नागपूरचे गोरविचारवंत प्रा. डॉ. गजानन जाधव यांचे सुद्धा क्रांतिकारी- संत सेवालाल हे नवीनच पुस्तक काही दिवसांमध्ये येत आहे. निश्चितच त्यांनी क्रांतिकारी संत सेवालाल महाराज मांडण्याचा चांगला प्रयत्न केला असेल असा मला विश्वास वाटतो. त्यांचे सुद्धा मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. संत सेवालाल महाराज यांच्या कार्यावर फार अल्प प्रमाणात साहित्य उपलब्ध असून अनेक मान्यवर मंडळींनी आपल्या लेखातून, कवितेतून संत सेवालाल महाराज यांच्या क्रांतिकारी कार्याला उजाळा दिलेला आहे .आणि ते देत राहतात. संत सेवालाल महाराज यांच्या क्रांतिकारी जीवनावर संशोधन होण्याची आज फारच गरज आहे. असे माझे प्रामाणिक मत आहे. आज गोरबंजारा समाजाला चमत्कारी संत सेवालाल महाराज यांची गरज नसुन क्रांतिकारी संत सेवालाल महाराजाची खरी गरज आहे.
जय सेवालाल..!
– याडीकार पंजाबराव चव्हाण,
पुसद
9421774372