अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड
अनाथांचा बाप होणे सोपे काम नाही.सामान्य मुलांना जेथे सांभाळणे कठीण काम तेथे बेवारस सापडलेल्या अनाथ,मूक बधीर ,दिव्यांग,गतिमंद मुलांना सांभाळण्याचे काम शंकरबाबा अविरत करीत आहे.
बाबा कोणत्याही पुरस्काराचे भुकेले नसले तरी बाबांच्या वझ्झर मॉडेलची योग्य ती दखल भारत सरकारने घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातला ‘पद्मश्री’ सन्मान घोषित केला त्यामुळे बाबांच्या चाहत्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे.तसाच तो मलाही झाला आहे म्हणून बाबांचे मनापासून अभिनंदन.
वझ्झर येथील शंकरबाबांची व त्यांच्या मुलांची दिनचर्या बघितली तरी नकळत तोंडात बोट जाते.त्या दिनचर्येची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.अगदी संगणकीय प्रणालीसारखे तेथे काम चालत असते.अर्थात त्याचे सर्वच श्रेय बाबांना जाते.
वझ्झरच्या आश्रमातील बाबांच्या ह्या मुलांनी १५००० झाडे लावून वनराई फुलविली आहे,अनेक प्रकारची उपयुक्त फळे,फुले त्या वनातून उपलब्ध होत आहेत.बाबांच्या मार्गदर्शनातून ह्या झाडांचे संगोपन ही मुलेच करतात.
१८ वर्षावरील अशा मुलांच्या संगोपनासाठी केंद्र सरकारने कायदा करावा हा बाबांचा अट्टाहासच आहे.कारण अशी मुले १८ वर्षाची झाली की त्यांना वाऱ्यावर सोडू नये ही पवित्र भावना त्यामागे आहे.हा विषय निघाला की बाबा एकदम भावूक होतात.त्यांना ती चिंता सतत सतावत असते आणि ती रास्तच आहे.अशी मुले आणि विशेषतः ह्या तरुण मुली जर समाजात बेवारस सोडल्या तर त्यांचे काय होते हे सूज्ञांना सांगणे नलगे.
बाबांनी हा पुरस्कार जरी स्वीकारला असला तरी जर १८ वर्षावरील गतिमंद मुलांच्या संगोपनासाठी केंद्र सरकारने कायदा केला तर तो बाबांसाठी पद्मश्री पेक्षाही मोठा असेल.हा कायदा होईलच अशी आपण अपेक्षा करु या.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबांचे एकवार पुनश्च अभिनंदन.💐
–आबासाहेब कडू,
(९५११८४५८३७)