Sant Gadgebaba : संत गाडगेबाबा :- एक चालते बोलते संस्कार पीठ
—————————————-
अशिक्षितपणामुळे समाजाची काय हानी होते. हे अगदी जवळून पाहिल्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहचावी यासाठी एका अडाणी असलेल्या अवलियाने अफाट प्रयत्न करून शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे समाजाला पटवून दिले. आणि ते विद्वान म्हणजे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा होय. गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजजी जानोरकर होते. गाडगे बाबाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील व्यसनाने ग्रासलेले होते. व्यसनामुळे आपल्या परिवारावर सुद्धा त्यांचे दुर्लक्ष होते ,त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था होती. आणि बालवयात गाडगे बाबा आपल्या घरची ही सर्व परिस्थिती पहात होते. आपले वडील अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना व्यसनाची साथ असल्यामुळे आपल्या कुटुंबाची जी बिकट परिस्थिती आहे ,त्याला जबाबदार फक्त आणि फक्त शिक्षण हे आहे हे गाडगेबाबांनी ओळखले होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून मी जरी शिकलो नाही पण मला समाजातील लोकांना शिकण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे. हाच ध्यास घेऊन त्यांनी समाज परिवर्तनाच्या लढ्यात सहभाग घेतला.
वडिलांच्या मृत्यूनंतर ते मामाच्या घरी शिक्षणासाठी आले. तिथे त्यांना शेतातील कामे, गुरे राखणे अशी कामे करावी लागली. काही दिवसानंतर गाडगेबाबांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली व दोन मुले होती. पण गाडगेबाबांचे मन संसारामध्ये लागत नव्हते. समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी, परंपरा ,अंधश्रद्धा होत्या. त्यामुळे समाजाची जी अधोगती होत होती ती गाडगेबाबांना मान्य नव्हती. म्हणून आपण जोपर्यंत गृहत्याग करणार नाही तोपर्यंत माझा समाज सुधारणार नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांनी इसवी सन 1905 मध्ये आपल्या घराचा त्याग केला व ”गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला” या कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्याच्या दिशेने त्यांनी आपले पाऊल उचलले.
गाडगेबाबांनी अनेक धर्मशाळा उभा केल्या. पशु हत्या बंद व्हावी म्हणून त्यांनी समाज प्रबोधन केले. गाडगेबाबांना लहानपणापासून कथा पुराणांची आवड होती. अभंग, गीता, गवळणीची ही आवड होती. गाडगेबाबांनी या कथा आपल्या आई – आजोबांकडून, मामा-मामींकडून अनेकदा ऐकल्या होत्या. देवळात चालणाऱ्या कथा पुराणीकांकडून ऐकल्या होत्या. गोपाळ कृष्णाच्या लीला गाडगेबाबांना खूप आवडायच्या. ते ऐकता ऐकता आपले भान हरपून जायचे कधी कधी त्यांची भाव समाधी सुद्धा लागत होती. या समाधीमध्ये ते तल्लीन होऊन जायचे. या भाव समाधीमध्ये कोणी हाक मारल्यानंतरच ते भानावर यायचे.
त्यांचे मामा चंद्रभानजी यांच्याकडे जवळपास दहा-पंधरा गुरे ढोरे होती. डेबुजींना गुरेढोरे पाळणे मनापासून आवडत होते. म्हणून त्यांनी मामाकडे गुरे चारायला नेण्याची परवानगी मागितली .मामाला ही गुरं राखायला कोणीतरी माणूस पाहिजे होता म्हणून त्यांनी डेबूला परवानगी दिली .मामाची परवानगी मिळताच डेबुजी नित्यनेमाने गुरे चारायला घेऊन जाऊ लागले. त्यांच्यासोबत अनेक सवंगडी सुद्धा जमत होते. त्यापैकी कोणी वाणी, कुणी कुणबी ,कोणी महार ,कोणी चांभार, कोणी मराठा तर कोणी अन्य जातीचा असे अनेक जातीचे मित्र मंडळ होते हे सर्व सवंगडी एकत्र मिळून गुरे चारत असत. एकत्र खेळत असत. खेळत- बागडत असत. पण डेबुजींना जाती व्यवस्थेचा राग होता ते म्हणायचे या सर्व जाती या मानवाने तयार केलेल्या आहे. त्यामुळे जातीसाठी भांडणे डेबुजींना आवडत नव्हते.
समाजामध्ये त्यावेळी बऱ्याच गोष्टी या देवाने केलेल्या आहे. देवाची आज्ञा म्हणून मोडणे म्हणजे पाप आहे. अशा गोष्टी ऐकल्यावर डेबुजी अस्वस्थ होत होते .म्हणून ते देवधर्म या भ्रमक कल्पना मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होते .
दिवसा मागून दिवस जात होते काळ पुढे पुढे सरकत होता. काळा बरोबर गाडगेबाबांचे वय सुद्धा वाढत चाललेले होते. वयाबरोबर त्यांची विचारशक्ती सुद्धा वाढत होती. पण गाडगेबाबांना वयाच्या मानाने अधिक समज आणि जाणीव होती. निरोगी आणि दणकट शरीराच्या या अवलियाने स्वच्छतेला फार महत्त्व दिले. म्हणून त्यांना स्वच्छतेचे जनक म्हणतात. गाडगेबाबाच्या नावाने शासनाने सुद्धा गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सारखे अनेक उपक्रम राबविले. गाडगेबाबा मामाच्या घरी असताना शेती सुद्धा उत्तम प्रकारे करायचे शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे बैलजोडी या सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना होते.
अशिक्षितपणामुळे समाजाची जी हानी होत होती ती गाडगेबाबांना मान्य नव्हती. अनेक रूढी परंपरेमुळे अशिक्षित लोकांना सुशिक्षित लोक लुबाडत होते. त्यांना देव धर्म यांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसा ,धान्य गोळा करत होते .म्हणून गाडगेबाबा म्हणायचे अज्ञान म्हणजे भ्रम ,असत्य ,अंधार ,अधर्म आणि अधोगती आहे. सर्व विनाशाचे लक्षण म्हणजे अशिक्षितपण आहे. म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे गाडगेबाबा ओरडून ओरडून सांगायचे. गाडगेबाबांची शिस्त किंवा शिकवण म्हणजे भुकेल्यांना अन्न द्या ,तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, गरीब मुला-मुलींचे शिक्षणासाठी मदत करा ,बेघरांना आसरा द्या, रोग्याला औषधोपचार द्या, बेकारांना रोजगार द्या, पशुपक्षी व मुक्या प्राण्यांची दया करा. अशा प्रकारची साधी आणि सरळ शिकवण होती. म्हणून गाडगेबाबा म्हणायचे ज्ञानासाठी शिक्षणाची आवश्यकता असून शिक्षणाचे संस्कार झाल्याशिवाय माणसाला मनुष्यात्व येत नाही . म्हणून गाडगेबाबांनी अनेक ठिकाणी शाळा सुद्धा काढल्या .गरिबांची मुले शिकावी म्हणून त्यांच्यासाठी होस्टेलची व्यवस्था केली. अनेक धार्मिक ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा काढल्या. गाडगेबाबा सतत 30 ते 35 वर्ष पंढरपूरला गेले. पण एकही वर्ष त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. पण जी चंद्रभागा नदीच्या काठावर घाण व्हायची ती साफ करण्याचे काम गाडगेबाबांनी केले. आणि निसर्ग संवर्धनाचे काम गाडगेबाबांनी केले. पण गाडगेबाबा पंढरपुरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक भ्रमक कल्पनांचा भांडाफोड करायचे. भोंदू बाबापासून समाजातील लोकांनी कसे दूर राहावे याविषयी अनेक उदाहरणे देऊन ते पटवून सांगायचे. प्राण्यांसाठी त्यांनी गोरक्षण संस्था अनेक ठिकाणी काढल्या. स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला पण त्याचे एवढे दुःख गाडगेबाबांना झाले नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा गाडगे बाबा सतत रडायचे. आणि आंबेडकरांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच गाडगेबाबांचा सुद्धा मृत्यू झाला. असे हे चालते फिरते ज्ञानाचे विद्यापीठ, संस्काराचे विद्यापीठ म्हणजे गाडगेबाबा होते अशा या महान संतांचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1956 रोजी वालगाव येथे झाला. अशा या थोर संतास पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
————————————–
– श्री अविनाश अशोक गंजीवाले (स शि)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव पं. स. तिवसा अमरावती
Related Stories
September 7, 2024
September 7, 2024