कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’
—————————— ——
“किती बांधू मी पडाय खांडकाले काळ्या बिब्ब्याचं
रोग निदान ज्यानं केलं तो वैद आजारी होता ! ”
‘बिबा’ हे औषधी गुणयुक्त व त्याचे फुल आणि गोळंबी खाण्यासाठी उपयोगात पडणारे जंगली फळ आहे. हा एक प्रकारचा रानमेवा आहे. पण या फळाचा काळ्या रंगाचा भाग (बिबा) हा गावाकडील कष्टकरी, शेतकरी लोक तळपायाला जर काटा रुतला, काडी रुतली, कापलं तर त्या जखमेवर जाळावर गरम करून त्याच्या तेलाचा चरका (चटका किंवा डागणी) देतात. बिब्याचं पडयही बांधतात. त्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते व वेदनाही कमी होते. कवी विजय ढाले हा शेतकरी, कष्टकरी आहे. त्याला याचा वापर कसा व कुठे करायचा ? याचे ज्ञान आहे. आणि म्हणूनच त्याने कवितासंग्रहाचे शिर्षक बिब्बा असे वापरले असावे. तो त्याकडे प्रतीक म्हणून बघत असावा. पुर्वीपासून येथील व्यवस्थेने वंचितांना नाडवले आहे. सामान्य माणसाचं जगणं नकोसं करून टाकलं आहे. कदाचित तो या बिब्याने व्यवस्थेला डागणी,चटके देऊ पाहतो आहे. जेणेकरून व्यवस्थेतील अन्यायकारी लोकांचं डोकं ठिकाणार आणता येईल. कवी म्हणतो….
“ओल्या जखमेले देजो बिब्ब्याचा चरका
सग्या नात्याले गा लेप इथं लावते परका”
सामान्य माणसाला येथे जीवन जगताना दररोज भूकेच्या प्रश्नसोबतच अनेक प्रश्न पडतात. उत्तराच्या शोधात तो सतत धावत असतो पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत.
“धाप लागेपर्यंत धावतात
या देशात कित्येक प्रश्न दोन पायावर
उत्तराच्या शोधात मैलोन मैली…
आपल्याच खांद्यावर
आपलेच मढे घेऊन…!”
विजय ढाले हा शेताच्या मातीत मुरलेला कवी आहे. हा रांगडा गडी आपलं व समाजाचं जगणं, भोगणं, ठणक, व्यथा, वेदना, अनुभव,सामाजीक जाणीवा, आपल्या धारदार शब्दात बिनधास्त मांडत असतो. तेव्हा तो कवितेचे नियम, तंत्र, प्रकार, छंद याची तमा बाळगत नाही. कोण काय म्हणेल? याची तो तमा बाळगत नाही. तो साहित्य संमेलनात, चारचौघात, घरी सारखाच असतो. पण तो मुक्तछंदात लिहितो, अष्टाक्षरीत लिहितो, अल्पाक्षरीत लिहितो,गझलसदृश्य,द्विपदीत लिहीतांना दिसतो. ‘आत्महत्या’ या मुक्तछंदात वाचकाच्या मनात थरार निर्माण होतो. शेतक-याच्या आत्महत्तेवर दिलखुलास व विद्रोही अंगाने तो व्यक्त होतो. यावेळी तो शब्द , भाषेला महत्व देत नाही. तो म्हणतो…
“या सा-या दु:खापेक्षा आत्मा त्यागण्याचं
दु:ख लाख पटित कमी वाटते…
वाटते ना मंग कुनी आत्महत्या करु नये मनुन…येते ना मसनातल्या मया निवलेल्या राखेचं मोल…
मंग तत्वज्ञानाचे डोज नका पाजू चोट्टेहो
सांत्वनेचे पेनकिलर देनं बंद करा…
नाही तर..
आज पर्यंत शेतीवर कुनी भा.द.वि.दफा३०२ लावला नव्हता ?
ती वेळ येईल आणि इतिहास घडेल!”
तो आपल्या व-हाडी बोलीभाषेत मोकळ्या मनाने व्यक्त होताना दिसतो. ‘आजार डोक्याला आणि औषधोपचार गुढघ्याला ‘ अशी अवस्था सर्वच प्रकारच्या व्यवस्थेची असल्याचे त्याला वाटते. आत्महत्या करणा-याला नावे ठेवण्यापेक्षा त्याच्या समस्या सोडवा. ज्याप्रमाणे शेतकरी वावरातील कुंदा खोदून ‘हराई’ कायमची नष्ट करतो, तशा मुळासकट समस्या नष्ट करा. तरच शेतकरी आत्महत्या करणार नाही. एवढच नाही तर तो व्यवस्थेला एक गोड धमकी, गर्भीत इशाराही देताना दिसतो.
“बंडी, आक, वंगन, जू, शिवळ, खुटलं, बे ड्डी, धिरी, मुचके, खांजाळं, डवरदुं डं, नांगर, इळा, कुशा, फावळं, कु-हा ड, रुमनं, बंदाटी, काकरं, सरतं, पुरा नी, इळत, कासरा, चराड, येसन, झूल, डमनी…. हे सगळं जर मीया काॅंरन्टाईन करुन ठेवलं तर...? “
अथात शेतक-याने शेती करून अन्नधान्य पिकविणं बंद केलं तर काय अवस्था होईल, इतर लोकांची, समाजाची ? खायला अन्न मिळणार नाही. तो मनातील चिड व्यक्त करतो एका शेतक-याच्या शब्दात. येथील व्यवस्था मुख्य समस्या समजून घेण्याऐवजी दुसरंच सांगते. असं त्याचं मत ‘छपाक’ कवितेत मांडतो. यासाठी तो जनतेलाही तितकंच जबाबदार माणतो. त्याला वाटतं व्यवस्थेविरुद्ध लोक काहीच बोलत नाहीत. मूग गिळून बसले आहेत. ‘शेपूट’ कवितेत तो खरमरीत शब्दात म्हणतो…
“गांडीनं डमरू वाजवणा-या
व्यवस्थेसमोर उभी आहे
गांडीत शेपूट घालून ‘मुकी’ जनता…
नेमका हागणा-याचा गुन्हा आहे की गोदरीचा, कळायला मार्ग नाई..!”
इथे त्याचे शब्द शस्त्रासारखे धारदार होतांना दिसतात. तो व्यवस्थेवर आसूड ओढतो. या शब्दात गावात सर्रास बोलल्या जातं. काही म्हणी व वाक् प्रचारही आहेत असे. तो म्हणतो गावातील लोक कष्टाला वाघ आहेत. ते घाबरत नाहीत. असं असतांना गावाने शहराकडे कां जावं कामाची भीक मागण्यासाठी? हा त्याचा मुख्य प्रश्न आहे.
“गावातील प्रत्येक झोपड्यांची छते, भिंती ऐकत आल्या आहेत की, गावं, शहरं वसवितात, शहरंच्या शहरं उभी करतात.. स्वत:च्या रक्ताचा चिखल करून !”
गावाने खुप वैभव बघितलं आहे, श्रीमंती उपभोगली आहे. मनाची आणि धनाचीही . एकोपा, माणुसकी, बंधुभाव, दानधर्म मैत्री, जिव्हाळा,आपुलकी. पण आता ते वैभव लयाला गेलं आहे. ते कुठेच बघायला मिळत नाही. जातीभेद, गरीबी, अशिक्षीतपणा, अज्ञान या गोष्टी निच्छितच होत्या, हे विसरून चालणार नाही. पण त्या कदाचित वर्णव्यवस्था, शिक्षणाच्या अभावामुळे असाव्यात.
“या दलिंदर श्रीमंतीत
गरिबितलं येवढं मोठं वैभव
आता कुठं पाहाले भेटते ?”
पण याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. जर मनात असेल तर सर्व काही शक्य होतं. हे व्यवस्थेला समजलं पाहिजे. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’. प्रयत्नातून वाळू रगळून तेलही काढता येवू शकते. तात्पर्य हेच की, फक्त ते करण्यासाठी आपली नियत पाहिजे. असं त्याला वाटतं. याला दुजोरा म्हणून तो पक्षांचे उदाहरण देत म्हणतो….
“क्युकी पंछीयो के कदमो के निशाॅं नही होते
मगर वो अपनी मंजिल अपने आप पा लेते है ..”
कष्टक-याला, शेतक-याला वाटते, जर मी एवढे कष्ट उपसतो तर मी असा कफ्फलक का ? स्वत:ला संपवितांना आली नसेल का त्याच्या मनात ही शंका ? शेतक-याला वाटतं मी कधीच आपल्यासाठी जगलो नाही. घरातल्यासाठी ऐश्वर्य विकत घेऊ शकलो नाही. ही खंत त्याच्या मनात आहे. म्हणून तो एवढ्या तळमळीने व्यक्त होताना दिसत असावा कदाचित. कवी आपल्या ‘अर्धांगीनी’ साठीही काही शब्द खर्ची घालून व्यक्त व्हायला विसरत नाही. कारण ती आयुष्याच्या बैलबंडीचं महत्वाचं व भक्कम आधार असलेलं एक चाक असते.
कविला वाटते ‘आंदोलनं’ माणसं घडवितात आणि संपवितातही. मला कवी जेव्हा मुक्तछंदात व्यक्त होतो तेव्हा तो अधिक प्रभावी व परिपूर्ण वाटतो . लोक स्वार्थासाठी भांडतात. सख्खे भाऊ एकमेकाचे पक्के वैरी होतात. हे चित्र समाजात त्याला दिसते. तेव्हा तो मोकळ्या मनाने आपल्या गझलसदृश्य कवितेत व्यक्त होतो…
“या धु-याचे त्या धु-याला दु:ख कळले नाही
दोघे जळले दिनरात पण अंतर मिळले नाही”
अंधारात ठेऊन ‘घातपात’ करणा-या माणसांनी व भेदाभेद करणा-यांनी समोरून वार करावा, असं शेरदिलानं तो आवाहन करतो . त्याला फसवणूक मान्य नाही. कविचा कृतिशिलतेवर अधिक भर आहे.
“करायचाच जर वार
हृदयाच्या आत कर
नेहमी ती आड येते
दुर ती जात कर !”
जर घाव करायचाच असेल तर व्यवस्थेवर करा. तिला धारेवर धरा. केवळ देखावा करू नका. आणि आपल्याच माणसाशी भांडण्यात काय हशील आहे ? असेही त्याला वाटते.
“नुसत्याच नको हातात छुरी सु-या
घाव व्यवस्थेच्या करु आरपार मित्रा !”
कवी पुरोगामी विचार पुढे नेणारा दिसतो. त्याची कविता प्रश्नकर्ती आहे. त्याला परिवर्तन अपेक्षीत आहे. पण कोणत्या मार्गाने ते होणार ? याबाबत तो सुतोवाच करताना फारसा दिसत नाही. तो उत्तर मागतो व्यवस्थेकडे, व्यवस्थेशी दोन हात करायचे म्हणतो पण .….
“जो तो देतो दाखले
सातबा-यावर पर्याय सांग?
मृत्यू कवटाळतो क्षणात मी
जिवनासाठी पर्याय सांग ?
त्याचं भोगलेपण कवितेतून निरंतर व्यक्त होतं. आपल्या कष्टकरी माय-बापाचं दु:खही तो मांडायला विसरत नाही.
“कापूस कुठे वावरात?
मी बाप वेचला होता
बुजगावण्याच्या गळी
हुंदका दाटला होता .
ह्या व्यथा समजू नका रे
पिढीजात पीक आहे
प्रत्येक पारध्यानं इथं
फास टाकला आहे !”
विजय ढाले याची कविता आशयगर्भ आहे. शब्दयोजन शैली सुंदर आहे. त्याने प्रहार करणारे दमदार शब्द कवितेत योजले आहे त्याची कविता काळजाला जाऊन भिडते. भिडतच नाही तर मनाला एल्गार करायला भाग पाडते . तो संकटांना घाबरत नाही. त्यांना तो पिढीजात पीक समजतो. या समस्या त्याला कच-यासारख्या वाटतात म्हणूनच त्याच्यातील लढाऊ बाणा जिवंत दिसतो. प्रत्येक माय-बापाला आपलं मुल हि-यासारखंच वाटत असतं . तसंच कविच्या आईलाही वाटते.
“ज्याच्या पायाचे फोपले
मिया भाकरीत शोधले
ठेऊन दगड मनावर
मायनं आरावर शेकले
तरी जगण्याचा तोरा
माय मने मले हिरा...
बाप खळखळतं पानी…!!३!!
कष्टकरी माय-बापाचं मनोगत आपल्या ‘फोपले’ या कवितेत मांडताना कवी काहीसा भाऊक होताना दिसतो. पण त्यातही त्याचा रुबाब एखाद्या राजकुमारासारखा भासतो. त्याच्या नावातच विजय आहे. तो स्वत: हरताना दिसत नाही. खंबीरपणा त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात भरून असलेला जाणवतो. परिस्थितीचं वास्तव तो आपल्या शब्दातून कलात्मकतेने, कल्पकतेने मांडतो. हे या कवितेचं सौंदर्यस्थळ आहे.
“खिशातल्या नाण्याचा आवाज मुका झाला
शिवला खिसा ज्यानं तो दर्जी जुवारी होता”
ही ताकद आहे विजय ढालेच्या कवितेची. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तो शासनाला संशोधन करायला लावतो. शाळा दत्तक देऊ नये,त्या कंपन्यांना विकू नये. पाहिजे तर मी माझी एक किडणी दान करायला तयार आहे. असे निवेदन शासनाकडे करतो. मुळ प्रश्नावर निर्णय घ्यायला लावतो.
“मरणावर संशोधन कर
सरणावर संशोधन कर
बांध पानवठे कोरडे
धरणावर संशोधन कर
असाही तसाही गहान देह
तारणावर संशोधन कर
रोज देते संसद दिलासे
कारणावर संशोधन कर !”
माणसाचं जीवन हे तसं एका शून्यापासून दुस-या शून्यापर्यंतचा प्रवास असतो. माणूस येताना काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. हा सर्व खटाटोप केवळ येथे जीवन कंठण्यासाठी चाललेला असतो. जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस जाणारच आहे. परंतु त्याला जातांना देह पुरविण्यासाठी थोडी जागा तरी येथे आपल्या हक्काची मिळाली पाहिजे. त्यासाठी तजबीज करून ठेवावी लागेल की काय ? याची काळजी त्याला वाटते.
म्हणून तो ‘आतड्या’ कवितेत म्हणतो….
“कष्ट केलेले सारे जाईल वाया
ये नाटीले काट्या टांगून ठेऊ
होईल गर्दी तिथंही अचानक
स्मशानात जागा राखून ठेऊ !”
यापेक्षा कोणत्या शब्दात व्यवस्थेविषयीची चिंता, चिड, खंत व्यक्त करायला पाहिजे, एखाद्या साहित्तीकाने ? शेतकरी दरवर्शी उसनवारी, कर्ज काढून, दागीने गहान ठेऊन पैसा शेतीला लावतो,मरेस्तोवर काबाळकष्ट करतो. म्हणजे तो एक प्रकारचा जुगारच (गंजीपत्ताच) खेळतो, असे त्याला वाटते.
‘सुखाचा नाही अजून का रे अत्तापत्ता,
खेळ नाही शेतीसारखा ‘गंजीपत्ता’ !
शेतकरी वर्षभर पीक घरी येण्याची वाट बघत बसतो. पण शेवटी निसर्गाच्या लहरीपणामुळे ‘सौ के साठच होतात’. ही खंत तो पुढील रचनेत व्यक्त करताना दिसतो. त्याचे शब्द त्याचेसारखेच रांगडे साद्या बोलीतील आहेत.
“भोकात गेलं सारं
कुठून आलं वारं
विकासाचं गणित
लेका सांग खरं खरं
आमालेच लागते चुना
आमालेच लागते खार
घरच्या भाकरीवर कवरीक
हानाव मामाचे ढोरं-ढारं ?”
शेतक-याला दुसरा व्यवसाय नाही. करायचा म्हटला तर अनेक लोकांनी आधीच त्यावर कब्जा करून ठेवला आहे. अनेक उद्योगपतींचे कोटी रुपयाचे कर्ज क्षणात माफ केल्या जाते. पण शेतक-याचे करायला सरकार मागेपुढे बघते असे वाटते म्हणून उद्वेगाने तो म्हणतो….
“वाटा बरोबरीचा नसेना खारीचा त ठेवा
एखादा तरी शिल्लक धंदा वाटमारीचा त ठेवा
सारेच करसाल कर्ज माफ त आम्ही कोण्या तोंडी जगू ?
चोपडीत रिकामा एखादा कप्पा उधारीचा त ठेवा !”
ही अवस्था येथील शेतक-यांची आहे. तरी पावसाला दम देत हा कवी म्हणतो…’आमी बी पायतो पावसा,तुयात किती दम हायतं ! आमच्या बी छाताडात भरले आमी बम हायतं ! एवढंच नव्हे तर तो ‘बाभळी’ त आभाळ फाडण्याची भाषा करताना दिसतो.
“असा करुन उदीम
मीया पेरलं जीवन
जातो क्षितिजाखाली
अन् आभाय फाडीन
घाव देण्याची निसर्गा
तुही जुनीच रीत सख्या
कर वारावर वार
मी जखमा शिविन !”
या समस्याग्रस्त जीवनातही तो बहारदार कविता लिहितो. पावसाळ्याच्या दिवसात शेत शिवार कसं फुलून जातं, हिरवंकंच होत? याचं वर्णन तो सुंदर शब्दात मांडताना दिसतो. कल्पकतेनं मोहरलेली ही रचना मनाला भावली.
” हिरव्या हिरव्या रानात कसं हिरवं झालं मन
खडकाळ डोंगराले नभाचा आहेर साडी खन !
घाम अन् रगताचं कसं नातं हे अजब
पाणी करून देहाचं पिकवते ढवळं सोनं !”
अवघ्या महाराष्ट्राला परिचीत असलेला, आतून बाहेरून साधासुदा असलेला, कष्टकरी, शेतकरी चळवळीचा खंदा कार्यकर्ता, साधारण परिस्थितीत जगणारा कविता सादरीकरणाचा बादशहा असलेला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील व-हाडी व विद्रोही कवी विजय ढाले यांचा ‘बिब्बा’ हा पहिलाच कवितासंग्रह आहे. अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती यांनी नुकताच प्रकाशीत केलेला आहे. प्रस्तावना चंद्रकांत वानखडे, नागपूर यांनी रोखठोक शब्दात लिहीली आहे. कवितेला न्यायसंगत अशीच ही प्रस्तावना आहे. ११६ पानाच्या या कवितासंग्रहात एकूण ८४ रचना आहेत. विविध काव्यप्रकारातील या सर्वच रचना वाचकांच्या मनावर गारुड करून जातात. विचार करायला लावतात. दखल घ्यायला भाग पाडतात. कवितेची भाषा, आशय, विषय, प्रतिमा, दाहकता, विद्रोह, आक्रोश, व्यथा, वेदना, वास्तव ,प्रश्नांचं गांभिर्य, ठणक ,लयबद्धता हे वाचकाला भुरळ पाडतात. मला या पुस्तकातील मुक्तछंदातील रचना अधिक भावल्यात. हा बाज कविने जीवंत ठेवावा असे वाटते. दमदार कवितासंग्रहाबाब विजय ढाले यांचे अभिनंदन आणि पुढील साहित्यकृतीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
-अरुण हरीभाऊ विघ्ने
मु.पो.रोहणा
त.आर्वी,जि. वर्धा
कवितासंग्रह : ‘ बिब्बा ‘
कवी : विजय ढाले,९६८९८५४१००
अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
मो.७४९९०५८८७९,९३०७००६३३६
प्रस्तावना :चंद्रकांत वानखडे,नागपूर
पृष्ठसंख्या : ११६
मुल्य : १८०/- रुपये