साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) – पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार २०२५ चे निकाल कामगार दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी ही माहिती दिली.
या चौथ्या वर्षीच्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यभरातून साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १४३ साहित्य कलाकृती स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये कवितासंग्रह – ७८, कथासंग्रह – २२, कादंबरी – १६, ललित लेखसंग्रह – २२ तसेच इतर ५ प्रकारांचा समावेश होता. परीक्षकांच्या परीक्षणानंतर प्रत्येक प्रकारातील एक उत्कृष्ट कलाकृती निवडून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –
- कवितासंग्रह : “जामिनावर सुटलेला काळा घोडा” – कवी धनाजी धोंडीराम घोरपडे, वाळवा, जि. सांगली
- कथासंग्रह : “कोंडमारा” – डॉ. अनंता सूर, वणी, जि. यवतमाळ
- कादंबरी : “घरंगळण” – डॉ. भीमराव वाघचौरे, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
- ललित लेखसंग्रह : “काळीजफुल” – मा. वर्षा किडे-कुळकर्णी, हिंगणा रोड, नागपूर
या कलाकृतींच्या परीक्षणासाठी प्रतिष्ठित साहित्यिक परीक्षकांची निवड करण्यात आली होती. परीक्षक म्हणून प्रा. रामप्रसाद वाव्हळ (परभणी) – कवितासंग्रह, प्रा. सुवर्णाताई चव्हाण (येवला) – कथासंग्रह, डॉ. भाऊसाहेब गमे (प्राचार्य, येवला महाविद्यालय) – कादंबरी, व डॉ. धीरज झाल्टे (नाशिक) – ललित लेखसंग्रह यांनी जबाबदारी पार पाडली.
प्रतिष्ठानने सर्व परीक्षकांचे आभार मानत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
या विजयी साहित्यिकांचा राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा दि. ४ जून २०२५ रोजी पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथे पार पडणार असून, त्यावेळी त्यांचा औपचारिक सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी दिली.