
बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र
आपल्या महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या मध्य ते उत्तरार्धादरम्यान पिढ्यानं पिढ्या चालत आलेली बारा बलुतेदार ही वस्तूविनिमय पद्धतीवर आधारलेली पद्धत ग्रामीण जीवनाचा अविभाज्य अंग होती.त्यात मुख्यत: वस्तू किंवा कामाच्या मोबदल्यात धान्याची देवाणघेवाण होत असे.कुंभार, लोहार, सुतार, चांभार, न्हावी, धोबी, महार, माळी, तेली, गुरव, कोळी, मातंग…असे ते बारा बलुतेदार होत.त्यांच्या व्यवसायानुरुप ही नावे पडलेली दिसतात. ज्यांनी मागील शतकात ग्रामीण जीवन अनुभवले आहे त्यांना ही पद्धत माहित आहे. ह्या व्यतिरिक्त ग्रामीण जीवनाचा भाग बनलेली काही व्यवसायिके होती.ती मात्र आपण लक्षात घेत नाही.त्याचाच आढावा घेणारा हा लेख.

बेलदार
बेलदार समाजातील ही मंडळी कुटुंबकबिल्यासह भटकंती करीत गावोगावी मातीची घरे बांधण्याची कामे करीत होती. मातीच्या दर्जेदार भिंती बांधाव्या तर ह्याच समाजाने. त्याकरिता ते त्या गावातच राहुटी टाकून ही कामे करीत असत.मात्र कामाच्या मोबदल्यात ही मंडळी पैसे व धान्य घेत असत. शक्यतो कामाचा मोबदला पैशाच्या स्वरुपातच असे.मातीच्या भिंती बांधण्यात ही मंडळी तरबेज होती. भिंतीकरिता मातीत तणस वगैरे टाकून लगदा कसा तयार करावा यात ह्या मंडळीची मास्टरी होती. गोऱ्या मंडळींनी बोलतांना बेलदारचा अपभ्रंश करुन बेल्डार अन नंतर बिल्डर केले असे गम्मतीने म्हटल्या जाते.

पिंजारी
ही मंडळी बहुधा मुस्लिम समाजातील असे. आपला पिंजारा घेऊन गावोगावी जाऊन मुक्काम करत घरोघरचा कापूस पिंजून त्याच्या गाद्या व दुलया तयार करुन देत असत. ही मंडळी सुद्धा कधी धान्य तर कधी पैसा अशा स्वरुपात मोबदला घेत असे. पिंजारी हा बहुधा एकटाच फिरत असे त्यामुळे ज्याचे घरी पिंजारा लागत तेथे त्याची जेवणाची व्यवस्था करावी लागत असे.तो निगुतीने कापूस पिंजतांना आम्ही लहान मुले टक लावून बघायचो.

कासार
लहानपणी अंगणात खेळत बागडत असतांना रस्त्यावरुन ‘बांगडी बिल्लोर’ असा आवाज आला की समजून जायचे गावात कासार आला आहे. मग आम्ही घरी जावून आई किंवा बहिणीला तो आल्याची बातमी देत असू. गावातील माता बगिनींना सौभाग्याचे हे लेणे हातात घालून देण्याचे काम तो प्रेमाने करीत असे.हातात बांगड्या घालून देण्याचे कसब त्याच्या हातात असे. त्यावेळी नागपूर आणि हैद्राबाद येथेच बांगड्यांचे कारखाने होते. आताही आहेत. बांगड्या आता जनरल स्टोअर्स मध्ये सर्वत्रच मिळते. त्याकाळी बांगड्याची दुकाने अस्तित्वात नव्हती. याला सुद्धा नगदी पैसे द्यावे लागत असे.आता फक्त लग्न कार्य असले तरच कासाराला बांगड्या घेऊन घरी बोलावले जाते.यात आता स्त्री कासाराचीही भर पडली आहे.
आरसे फणी डाबले वाला
त्या काळात स्त्रिया फणीने केस विंचरायच्या. माणसे मात्र कंगवे वापरत, नसेल कंगवा तर फणीसुद्धा कामात येत असे.त्या फणीने डोक्यातील कोंडा आणि उवा हमखास निघून जात असे. स्नो पावडरचे डब्बे, आरसे, रिबिना व इतर शृ़ंगाराच्या वस्तू याच आरसे फणी डाबलेवाल्याकडे मिळत. त्या काळी किराणा दुकान सोडले तर शृंगाराच्या वस्तूचे स्पेशल दुकाने अशी नव्हतीच.किराणा दुकानातही संपूर्ण शृंगाराच्या वस्तू मिळत नसे.किराणा दुकानात मुख्यत: भुसार मालच मिळत असे.

वडर
ग्रामीण महाराष्ट्रात त्या काळी जात्यावर दळण दळावे लागत असे.त्यामुळे घरोघरी पहाटे जात्याची घरघर ऐकू येत असे.पण दळणारी बाई, बाया दळतांना ओव्या म्हणत असल्याने ती घरघरही कानाला गोड लागत असे. दळण दळता जात्याच्या दगडाचे पाते चोपडे झाले की ते टाकवावे लागत असे. महिन्यातून एक खेप तरी ते टाकवावेच लागत असे. याकरिणा वडर समाजाच्या बाया गावोगावी ‘आहे काय जाते पाते टाकवाचे’ म्हणत फिरत असे.जाते पाटे टाकविणारी ही मंडळी नगदी पैसे घेत असे. त्याचे दर सुद्धा जाते पाहून दहा वीस पैसे ते चाराने असे असत.वडर जमातीतली माणसेही या कामी मदत करीत असे. मिरची मसाले वाटण्यासाठी उरोटा पाटा यापैकी पाटा सुद्धा चोपडा झाला की टाकवावा लागत असे.कालांतराने इंजिन अन नंतर वीजेवर चालणाऱ्या पीठाच्या गिरण्या सुरु झाल्या अन ही जात्याची घरघर कायमची बंद झाली.उरोटा पाट्याची जागा आता मिक्सरने घेतली अन ‘आहे काय जाते पाटे टाकवाचे’ हा आवाजही नाहीसा झाला.

कल्हईवाला
त्या काळी घरोघरी जर्मन, पितळ, व तांबे या धातू़ंची स्वयंपाकाची भांडी वापरात रहात असे.पैकी पितळच्या भांड्यांना आतून कल्हई लावण्याची प्रथा होती.कथिल या धातूचा पातळ थर लावत असे.आम्लयुक्त पदार्थाचा थेट संयोग पितळेच्या धातूशी येवू नये व अन्न पदार्थ सुरक्षित रहावे हे त्यामागे वैज्ञानिक कारण होते. तसेच कल्हई केल्याने अन्न शिजवितांना ते बुडाशी लागत नाही हे ही दुसरे कारण होते. त्याकरिता भांड्याला कल्हई लावणारी मंडळी गावोगावी सतत येत होती. कारण एकदा लावलेली कल्हई दोन तीन महिन्यातून निघून जात असे. मग पुन्हा कल्हई लावणे आलेच. हा धंदा त्यावेळी तेजीत होता.
उनी कपडे विकणारे रोहिल्ला
ही मंडळी जरी रोहिलखंड मध्ये रहात असली तरी त्यांचा व्यवसाय उनी कपडे विकण्याचा होता.काश्मीर, लुधियाना येथून हिवाळ्यात वापरण्यासाठी लागणारे स्वेटर्स,शाल, ब्लॅंकेट्स, टोपरे घेऊन ही मंडळी गावोगावी दुकान थाटत असे. ही मंडळी खऱ्या अर्थाने ग्रामीण कास्तकारांची मदत करीत होती असे म्हणायला काही हरकत नाही.
कारण ते हा सर्व माल उधारीत वाटत असे. या हंगामात घेतलेल्या मालाचे पैसे पीक निघाल्यावर पुढच्या हंगामात मागत असे. त्यांचा पेहराव जरी सावकारासारखा वाटत असला तरी ते व्याज वगैरे मागत नसे. जेवढ्या पैशाचा माल घेतला तेवढेच पैसे ते मागत.जास्त रक्कम असली की मग दोन हंगामाचीही मुदत मिळत असे.
परमुलुखातून येणाऱ्या ह्या मंडळीचा कास्तकारांवर तेव्हा खूप भरवसा होता. त्याच विश्वासाने ही मंडळी कोसो अंतर पार करुन आपल्याकडील खेडेगावात येत होती.
कालांतराने उनी कपडे सर्वत्र मिळू लागल्यामुळे रोहिल्ल्यांचे येणेही बंद झाले.
गुरे ढोरे राखणारे गुराखी,गवारी, ग्राम वैदू, लोकशाहीर, हात पाहून भविष्य सांगणारे ज्योतिषी, पोपट घेऊन फिरणारे ज्योतिषी,डोक्यावर टोपले घेऊन भांडे विकणाऱ्या महिला, विड्याची पाने विकणारा बारी समाज, केसावर फुगे विकणारे गधीचं दूध विकणाऱ्या महिला, शेतात मेंढरं बसविणारे बनगी धनकर, वासुदेव, गोसावी, पोथराजे, गावोगावी सायकलवर फिरुन आईस कांडी, बर्फ गोळा विकणारे फिरस्ती, गोंधळी, किंगरी वाजवत आपला उदरनिर्वाह चालविणारे भराडी, डहाकेवाले,गारुडी…
अशा सर्व घटकांनी मिळून गावगाडे समृद्ध रहात असे. घंटागाडी नसली तरी प्रत्येक घरचा कचरा टाकण्यासाठी गावठाणावर वेगळी व्यवस्था असे.
तंटे भांडण गावचा पाटीलच सामोपचराने मिटवीत असे.गावगाड्यात कमालीची आपुलकी होती. एकमेकांना उसने जिन्नस मागण्याची लाज वाटत नसे. अडीअडचणीत एकमेकांना मदत ही गावसंस्कृतीच होती.ती आता लोप पावल्यातच जमा आहे.
आताच्या GEN Z जनरेशनला यातील काही गोष्टी ऐकूण नवलही वाटू शकते.ज्यांचा जन्म मागच्या शतकातील पूर्वार्धातला आहे त्यांनी वरील स्थित्यंतरे जवळून अनुभवलेली आहे. ती पिढीही आता नाहीशी होण्याच्या उंबरठ्यावर आहे.तो काळ आताच्या व पुढील जनरेशनला माहित असावा म्हणूनच हा लेखनप्रपंच.

-आबासाहेब कडू
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!