प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर
शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू होणार
नवी दिल्ली, : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.
प्रधानमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास, प्रधानमंत्री श्री.मोदी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करुन मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तद्नंतर 3.15 च्या सुमारास, श्री. मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.