पोतराज…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
पोतराज
पोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक. तो जातीने महार वा बहुधा मातंग असतो. पोतराज हा शब्द म्हणजे पोत्तुराजु या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत सात बहिणी या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्धआहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला मरीआईवाला व लक्ष्मीआईवाला अशीही नावे आहेत.
पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा कडकलक्ष्मी आली असे म्हटले जाते. मरीआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात. पोतराजाच्या हातातील कोरड्याला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे. लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे.
पोतराज पुरुष असूनही तो बहुतांशी स्त्रीवेषात असतो. त्याच्या कंबरेभोवती असलेला हिरव्या खणांचा घागरा हा लिंबाचा पाला नेसण्याच्या प्रथेचा अवशेष असण्याची शक्यता आहे. त्याच्या कंबरेच्या वरचा भाग उघडा असतो दाढी राखलेली नसते पण मिशा मात्र असतात. त्याने स्त्रियांप्रमाणे वाढविलेल्या केसांचा बहुदा अंबाडा बांधलेला असतो व कपाळावर हळद व कुंकू यांचा मळवट असतो. डोक्यावर मरीआईचा देव्हारा व हातात मोरपिसांचा कुंचा घेतलेली त्याची पत्नीही त्याच्याबरोबर असते.
पोतराजाच्या स्त्रीवेषाचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे, प्राचीन काळी स्त्रियाच ग्रामदैवतांचे पौरोहित्य करीत असत नंतरच्या काळात ते पौरोहित्य पुरुषांकडे आले, तरी त्यांना स्त्रीवेष धारण करण्याची प्रथा स्वीकारावी लागली, असे महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. दक्षिणेतील ग्रामदेवी पातिव्रत्यासाठी किंवा कडक कौमार्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या उपासनेत स्त्रियांचे, नपुंसक पुरुषांचे आणि स्त्रीत्वाचा आभास निर्माण करणाऱ्या पुरुषांचे प्रस्थ दिसते, असे या बाबतीत रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे. देवीशी तादात्म्य साधण्याच्या हेतूनेही हा स्त्रीवेष धारण केला असण्याची शक्यता आहे.
पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी गावात येतो, तेव्हा डफडे व क्वचित ढोलके वाजवत असतो. गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा तो करतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत तो नाचतो, तेव्हा त्याची पत्नीही नाचत असते. तो आलीया मरीबाई, बया! दार उघड इ. गीते म्हणतो. ओवी छंदातील या गीतांतून प्रामुख्याने मरीआई, लक्ष्मीआई, कोल्हापूर इत्यादींचे महात्म्य असते. एकनाथांचे बया! दार उघड हे प्रसिद्ध भारूड पोतराजाच्या भूमिकेतून लिहिलेले आहे.
मरीआईच्या देव्हाऱ्याचे दार उघडावे आणि तिने प्रसन्न व्हावे, यासाठी पोतराज आत्मपीडनाचा मार्ग पत्करतो. नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभोवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वतःच्या मनगटाचा चावा घेणे इ. प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो. त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी  भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते.
महाराष्ट्रातील पोतराजांपेक्षा दक्षिणेतील पोतराज अधिक उग्र असतात, असे दिसते. पोतराज होण्याची दीक्षा घेताना भांग, गांजा, अफू, दारू इ. मादक पदार्थ प्रजेला आणावे लागतात आणि पोतराजाला प्रत्येक कलालाच्या दुकानात दारू पिण्याचा व दक्षिणा मागण्याचा हक्क असतो. असे त्रिं. ना. आत्रे यांनी म्हटले आहे.
मरीआईच्या कोपाने पटकी, देवी इ. साथी येतात आणि पोतराजाने तिला प्रसन्न केले, की त्या नाहीशा होतात, अशी लोकांची समजूत असते. प्रत्येक गावात पोतराज नसतो परंतु पटकीची साथ आली असता मरीआईचा गाडा बाहेर नेण्यासाठी त्याला बोलावले जाते. या विधीचे पौरोहित्य तोच करतो. गाड्यावर देवीची मूर्ती ठेवून गाडा गावाच्या शिवेबाहेर नेला जातो आणि तो नेताना देवीने पुन्हा कोणीकडूनही गावात येऊ नये, यासाठी पोतराज सगळीकडून ‘गाव बांधण्या’चा एक विधी करतो.
संकलन: सदानंद पाटील,
रत्नागिरी
(मराठी विश्वकोश)

Leave a comment