गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : आयुष्यमान भारत योजनव्दारे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड मिळण्यासाठी संबधित विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून द्यावे. जिल्ह्यातील उर्वरित पात्र 6 लक्ष 68 हजार 586 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट त्वरीत पूर्ण करा. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड’संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, नगर विकास शाखा सुमेध अलोने, जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी यांनी आपल्या विभागामार्फत विहित कालावधीचे नियोजन करुन गोल्डन कार्ड तयार करण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यासाठी असलेले उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवशी किमान 10 गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठरवून द्यावे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित 6 लक्ष 68 हजार 586 पात्र लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी दिले.