नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 
उद्या १ जानेवारी २०२४, नव्या वर्षाची सुरुवात …. *“रोज नवा सूर्य उगवतो, रोज नवे वर्ष आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर, रोज नवा हर्ष आहे. रोज नवा चंद्र उगवतो रोज नवी रात आहे. आभाळातल्या चांदण्यांवर, रोज नवी बात आहे.”* पुस्तकाचे पाने उलटवावी तशी आयुष्याची पाने उलटत जातात, प्रत्येक दिवस रोज नव्या विचारांची मैफिल घेऊन येत असतो. आला दिवस गेला या प्रमाणे जीवनमान मागे पडत चालले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत चालला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. जसजसा काळ बदलला तस तसे जीवनमान बदलत चालले आहे. राहणीमान, खानपान, दळणवळण, संपर्क, गाठीभेटी, सण यात अमुलाग्र बदल होत चालला आहे. या धकाधकीच्या जीवनात एकमेकाकडे बघायला कुणाला वेळ राहिला नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मानव पळतो आहे. “फक्त कॅलेंडरचे पान बदलत आहे, मात्र दैनंदिन अडीअडचणी तशाच आहेत.”
आपण स्वतःमध्ये झाकून पाहिले तर इतरांकडे एक बोट करण्यापेक्षा आपल्याकडे चार बोटे फिरलेली असतात हे कोणी लक्षात घेत नाही. अशावेळी जर आपण आत्मपरीक्षण केले तर? काही अशा व्यक्ती आहेत ज्या स्वतःला बदलण्याचा विचार करतात. यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे असते, म्हणून कोणी नव्या वर्षाच्या एक तारखेपासून काही संकल्प करायचे ठरवतात.. संकल्प करायचे तरी काय..? काही जण जे अतिप्रमाणात आपल्या अंगी गुण आहेत ते सोडायचा संकल्प करतात तर काही जण जे आपल्याकडे नाही ते अमलात आणण्याचा प्रयत्न करतात. “पिंड पिंड मतिर्भिन्ना” या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे संकल्प वेगवेगळे असू शकतात. काही तर मित्राने हा संकल्प केला म्हणून आपणही करायचा असं ठरवतात. माणसाने संकल्प जरूर करावे पण त्यासाठी नवीन वर्षाची सुरुवातच का असावी हा देखील चर्चेचा विषय आहे. जर रोज नवीन दिवस नवी रात्र उगवत असेल तर कोणत्याही दिवशी तुम्ही संकल्प करू शकता असे मला वाटते. त्याकरिता नवीन वर्षच कशाला हवे. आणि “जर संकल्प करायचेच असेल तर काही संकल्प हे समाजोपयोगी ठरले पाहिजे. केवळ स्वार्थासाठी संकल्प करून फायदा नाही.”
सध्या समाजात आपण बारकाईने पाहिले तर असे लक्षात येते की, दिवसेंदिवस मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. एकवेळ घरातील व्यक्ती दुरावली तरी चालले पण मोबाईल दुरावता कामा नये. मोबाईल हा लहानमुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. या मोबाईलच्या सततच्या वापरामुळे पाहण्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार वाढले आहे, दिसायला कमी होणे, चष्मा लागणे, डोके दुखणे, डोळ्यातून सतत पाणी येणे असे प्रकार होत आहेत. डॉक्टरांच्या अहवालानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे “अल्झायमर आणि पार्किन्सन” असे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत आहे. मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. तर हल्ली अश्लील आणि अचकटविचकट रील्स बनवण्याचे आणि पाहण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. “मोबाईलच्या अतिप्रमाणात होणाऱ्या वापरावर समाजमाध्यमातून अथवा मोठमोठ्या शाळा महाविद्यालयातून जनजागृती करून याला प्रतिबंधात्मक उपाय आणि कमी वापराबद्दल जनजागृती करण्यासाठी संकल्प करणे गरजेच आहे.” यासाठी प्रत्येकाने स्वतः पुढे येवून स्वतःपासून सुरुवात करून समाजाला हा संकल्प करून दाखवला पाहिजे तरच येणारी उद्याची नवीन पिढी जागृत होईल अन्यथा याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहे.
पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, घरात प्रत्येक मोठ्या माणसाचे लहान सदस्यावर लक्ष असायचे, कोणी चुकत असेल तर त्याला लगेच समज दिल्या जायची. वयोमर्यादेत आदर होता, मोठ्या माणसाच्या आज्ञा लहान माणसे पाळत होती. एकमेकांना धाक होता. आता काही विभक्त कुटुंब पद्धतीत नवरा बायको आणि लाडाचे एकच मुल असा परिवार असतो. नवरा आणि बायको दोघेही नोकरीला असल्याने मुलाला लहानपणापासूनच पाळणाघरात किंवा केअरटेकरकडे ठेवले जाते. आईबापाचे दिवसभर दर्शन होत नाही, त्यांचा सहवास लाभत नाही परिणामी अशी मुले प्रामुख्याने बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाहेरील व्यक्ती जसे मार्गदशन करेल तशी ही मुले समाजात वागत असतात. काही ठिकाणी योग्य मार्गदर्शन होते मात्र काही ठिकाणी अविचारी मार्गदर्शन झाल्याने अशी मुले पुढे वेगळा मार्ग निवडतात. अतिलाडाने वाढलेल्या मुलाला कुणाचा धाक रहात नाही, आईवडिलांना नोकरीमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि समाजातील काही वाया गेलेल्या मुलांच्या नादी लागून अशी मुले व्यसनाधीन बनतात. व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला एक गंभीर आजार आहे. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आपण पाहत आहोत. ही व्यसनाधीनता रोखण्यासाठी तरुण युवकांनी पुढे यायला पाहिजे. यासाठी “शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कार्यशाळा घेऊन अशा व्यसनाधीन झालेल्या पिढीला समोपचाराने योग्य मार्गावर आणण्याचा संकल्प करायला हवा…”
हल्ली घराघरातील संवाद कमी होत चालले आहे. बाप दिवसभर कामावर असतो, मुलांशी संपर्क होत नाही आणि बाप घरी आला की मुलगा काहीतरी काम काढून बाहेर जातो.. आणि तो येतो तेव्हा बाप झोपलेला असतो. कुणाचाच कुणाशी संवाद होतांना दिसत नाही, अनेक पालकांच्या मुलांबद्दल अशाच भावना दिसून येतात. मुले चंगळवादाकडे झुकलेली दिसून येतात. रोज नवनवीन फॅशनेबल कपडे घालायचे, मोटारसायकल अथवा बाप कमाईची चारचाकी गाडी घेऊन मित्रांत जायचे, हॉटेलात पार्ट्या करायच्या..मी फार मोठ्या घरचा असल्याचा आव आणून मोठ्यापणा मिरवायचा, मी म्हणजे जग या अविर्भावात रहायचे. घरात कुणाशी व्यवस्थित बोलायचे नाही.. समजूतदारपणा अंगी बाळगायचा नाही यामुळे अनेक परिवारात वैफल्यग्रस्त वातावरण दिसून येते. चिडचिड, ताणतणाव, अबोला अशा कारणांमुळे घरातील व्यक्ती हतबल होतात आणि पर्यायाने नको ते पाऊल उचलतात. “ही मानसिकता बदलण्यासाठी संकल्प व्हायला हवेत.”
महिलांवरचे अत्याचार हा एक मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आज समाजात आ वासून उभा आहे. दोन वर्षाच्या मुलीपासून तर ६० वर्षाच्या म्हाताऱ्या महिलांवर काही नराधमाने बलात्कार केल्याचे आपल्या वाचनात येते, दूरदर्शनवर बातमीत ऐकले  जाते. समाजातील अशा घातक मनोविकृत व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे परिवारातील आणि समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना एकटीला घराबाहेर जाणे कधी कधी त्रासदायक होते. हे नराधम केवळ बलात्कारावर थांबत नाहीत तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मुलीचा अथवा महिलेचा खून देखील करतात इतकी क्रूरता या समाजातील काही मनोविकृत लोकांमध्ये भरलेली दिसून येते. “अशा मनोविकृत लोकांना शासन करण्यासाठी काही संकल्प व्हायला पाहिजे.”
समाजातील बरीच तरुण पिढी मोबाईल पाहण्यात, रील्स बनवण्यात, व्हाटसअप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर विविध प्रयोग करण्यात व्यस्त आहे. याचाच फायदा घेत काही ठराविक मुले शिक्षण घेऊन पुढे जात आहेत तर काही यात अडकून पडले आहेत. मुलांना सर्व आयते मिळते, पालक मुलांचा अति लाड करीत असल्याने मुलांमधील कार्यक्रियाशीलता कमी होऊन मुले आळशी होतांना दिसत आहे, परिणामी कष्ट करण्याची क्षमता लयास गेल्यामुळे शेतीत, कारखानदारीत मजूर मिळेनासे झालेत त्यामुळे उद्योग धंद्यात अत्याधुनिकता येवून मानव विरहीत यंत्राचा वापर होऊ लागल्याने मोठमोठ्या कंपन्यांनी नोकर भरती कमी केली.. तरुण पिढी बेरोजगार होत आहे किंबहुना झाली देखील आहे त्यातच शासकीय नोकरीत बरीच कामे कमी झाल्याने तेथेही शासनाने नोकरभरती कमी केली आहे. बेरोजगारीचा भस्मासुर इतका वाढला आहे की, शेतीला मजूर मिळेनासे झाले आहे आणि आपल्या मुलांना शेत्तीत राबायला पाठवायचे नाही या मानसिकतेने काही पालकांच्या अति लाडाने मुलांना शेतीचे कामे देखील होत नाहीत आणि बाहेर रोजगार उपलब्ध नाही आणि जो रोजगार आहे तो मुलांना पसंत नाही त्यामुळे तरुण पिढी बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी तरुणांनी व्यवसायाकडे वळाले पाहिजे. “तरुण पिढीने जर संकल्प करायचा असेल तर या बेरोजगारीला बाजूला ठेवून स्वयंरोजगार उपलब्ध करून आपल्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी संकल्प व्हायला हवा.”
शेती व्यवसायाला जगाची जीवन संजीवनी म्हटले आहे मात्र शेती व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. बऱ्याच ठिकाणी पर्जन्यमान कमी प्रमाणात असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. भूगर्भातील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर शेतीला पाणीपुरवठा करणारे बोअरवेल कोरडे निघत आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतक-यांवरचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. जगाचा पोशिंदा कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करत आहे. उत्पादित मालाच्या किमतीपेक्षा उत्पादनाचा खर्च दुप्पट होतो त्यामुळे संसाराची आर्थिक घडी बसवताना या जगाच्या पोशिंद्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का? यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. “शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संकल्प व्हायला हवेत.”
समाजात अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करायला हवा तरच भविष्य उज्ज्वल आहे.
शब्दांकन
– प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)