सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे व बालहत्या प्रतिबंधक गृहाचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, जनतेकडून ‘महात्मा’ ही पदवी प्राप्त झालेले सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांच्या ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक व अखंड काव्यरचना या ग्रंथांनी बहुजन समाजात क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला असता ते शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते.एक थोर कृतिशील समाजसुधारक युगपुरुष होते, हे स्पष्ट होते.
ज्या काळात स्त्री व शुद्रांना परंपरेने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या काळात महात्मा फुलेंनी सन १८४८ ते १८५१ या चार वर्षात स्त्रीशुद्रांसाठी १८ शाळा काढल्या व योग्य असा अभ्यासक्रमही तयार केला कारण शिक्षण नसल्यामुळे समाजाचे खूप नुकसान झाले आहे हे सांगताना ते म्हणतात.
“विद्येविना मती गेली ।
मती विना नीती गेली।।
नीती विना गती गेली।
गती विना वित्त गेले।
वित्त विना शुद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले “
ही जोतीबांनी केलेली मिमांसा आहे. महात्मा फुले यांना सामाजिक परिवर्तन हवे होते म्हणून ही शैक्षणिक क्रांती केली. रुढी – परंपरातून समाजाला मुक्ती – बालविधवा, केशवपन, बालविवाह, विजोड विवाह, बालहत्या, बहुपत्नीत्व या दुष्ट रुढी परंपरांचा त्यांनी कडाडून विरोध केला त्यातून समाजाला मुक्त केले. अशा प्रकारे देव, धर्मग्रंथ, धर्म, तीर्थस्थान व सर्व वंद्य परंपरेच्या विरुद्ध व सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड केले म्हणूनच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जोतीबांच्या बाबतीत म्हणतात.
महाराष्ट्र ज्ञानेश्वरांचा ।
महाराष्ट्र तुक्याचा ।।
जोतीबा हा लोकांचा।
महाराष्ट्र सुधारक आगळा ॥
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात सत्यधर्माची लक्षणे सांगताना म. फुले यांनी पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ, त्यागी, निष्ठावान, अहिंसक आहे असे पुरोगामी विचार मांडले. स्त्रियांना स्वतःचे मानवी हक्क समजू नये म्हणून विद्या बंदी होती. यासाठी त्यांनी इ.स. १८४८ साली मुलींसाठी शाळा काढून स्त्रियांना विविध बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला व पुढे स्त्री – मुक्ती संदर्भात कृतीशील कार्य केले.
सत्यधर्माची लक्षणे विशद करताना, सर्व स्त्री – पुरुषास निर्मिकाने धर्म – राजकीय स्वतंत्रता दिली आहे. मानवी हक्कांविषयी बोलण्याचे – लिहिण्याचे व प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, हे म. फुले यांचे विचार लोकशाही प्रणालीची मूलभूत तत्वेच आहेत म्हणून ते लोकशाही क्रांतीचे अग्रदूत ठरतात.
विश्वकुटुंब निर्मितीसाठी आवश्यक मूलभूत मानवी हक्क व त्यासाठी हवा असलेला वर्तनक्रम व वैचारिक भूमिका म. फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात ३३ कलमी नियमात मांडलेली आहे. म्हणून ते विश्वधर्मी ठरतात.
म. फुलेंचे विचार हे त्यांच्या वेळेपर्यंत कुणालाही मांडता न आलेले क्रांतिदर्शी विचार होते म्हणून ते क्रांतिदर्शी विचारवंत ठरतात.
सत्यधर्माची लक्षणे सांगताना म. फुले यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मत प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते आज घटनेव्दारे सर्वांना बहाल केलेले आहेत .
गणपतराव थोरात यांना सत्यवर्तनाचे नियम (लक्षणे) सांगताना महात्मा फुले यांनी स्त्री – पुरुष समतेचे विचार मांडलेले आहेत. स्त्री व पुरुषाला समान स्वातंत्र्य सांगितले आहे. असे विचार मांडताना ‘स्त्री अथवा पुरुष’ असा शब्द प्रयोग म्हणजे प्रथम स्त्रीचा उल्लेख आणि नंतर पुरुषाचा उल्लेख केलेला आहे. पुरुषाप्रमाणे स्त्री ही सर्व अधिकारांचा उपभोग घेऊ शकते कारण स्त्रीला निर्मिकाने पुरुषाप्रमाणे हक्क दिले आहेत. म्हणून स्त्री व पुरुषांना समान मानणारे व लेखणारे सत्यवर्तनी होत असे म. फुले म्हणतात .यावरुन सामाजिक समता खऱ्या अर्थाने समाजात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असे म्हणता येईल. पती व पत्नी वगळून सर्वांना बहिण – भावाचे नाते अर्थात बंधुत्वाचे नाते मानणारा सत्यवर्तनी होय. या बाबत त्यांच्या अखंड या काव्यरचनेत ते म्हणतात ,
‘ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणासी ।
धरावे पोटाशी बंधूपरी ॥
सत्य वर्तनी वैद्यांच्या आज्ञेवाचून अफू – भांग – मद्य इ. अंमली पदार्थाचे सेवन करून दुसऱ्यांवर अन्याय करीत नाहीत. दारुमुळे कसे नुकसान होते ते सांगताना ‘अखंडादि काव्यरचनेत’ म. फुले म्हणतात.
दारुच्या नादात। मुढ खर्च करी । करितो भिकारी । मुला बाळा॥
एक दिन तरी । मद्य वर्ज करा ।
तोच पैसा भरा । ग्रंथासाठी॥
सत्यवर्तनी स्री-पुरुष व्याभिचार करीत नाहीत. अनैतिक व्यक्तिचा सन्मान ठेवीत नाहीत. जोतीराव फुले म्हणतात,
मानवांचा धर्म । सत्य सर्व नीती ॥
बाकी कुरापती । जोती म्हणे ॥
ग्रहतारे व धातू दगडांच्या मूर्ती ऐवजी विश्वनिर्माण कर्त्यास मानणारे, सृष्टीतील सर्व वस्तुंचा सर्व प्राणीमात्रांना उपभोग घेऊ देणारे, निर्मिकास त्या वस्तू निरर्थक अर्पण करून त्याचे पोकळ नामस्मरण न करणारे, धर्मग्रंथाची भीती दाखवून – नवग्रहाची पीडा दाखवून, अंगारा धुपारा देऊन निरर्थक पूजा – जपजाप्य करायला सांगून अज्ञानी लोकांना फसवीत नाहीत ते सत्यवर्तनी होत असे म. फुले म्हणतात .खोट्या धर्म आचाराविषयी ‘ब्राम्हणांचे कसब’ या ग्रंथात म. फुले म्हणतात,
‘जप अनुष्ठान । यज्ञविधि केला ।
मूढ नागविला ।ग्रहमिषे॥
स्त्री-पुरुष स्वातंत्र्य, प्राणीमात्रास जगण्याचे स्वातंत्र्य, स्वत:प्रमाणे इतरांनाही धार्मिक व राजकीय स्वातंत्र्य, सर्व स्त्री-पुरुषांना स्वविचार बोलणे – लिहिणे – प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य आहे ,असे मानून व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे सत्यवर्तनी होत असे म. फुले म्हणतात.
जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यवर्तनाच्या अर्थात सत्यधर्माच्या लक्षणावरून त्यांच्या मानवता धर्माची लक्षणे, त्यांची विचारधारा,त्यांनी केलेली वैचारिक क्रांती दिसून येते. त्यांच्या या विचाराने प्रेरीत झालेले महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे म्हणतात.
‘सत्याचा पालनवाला ।
हा धन्य जोतीबा झाला।।
पतितांचा पालनवाला।
हा धन्य महात्मा झाला॥
म. फुले म्हणतात, कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित अथवा ईश्वर प्रेरणेने निर्माण झालेला नाही. म्हणून त्यांनी धर्मपुस्तक जगाच्या हितासाठी आहेत असे म्हणणाऱ्या पण सामान्यांना ते न दाखविणाऱ्या अशा कपटी बढाईखोरांवर विश्वास ठेऊ नका, असे म्हटले आहे. महात्मा फुले यांच्या मते जगात एकच धर्म आहे. अखंडादि काव्यरचेत ते म्हणतात.
सत्यवीण नाही। जगी अन्य धर्म । कळवावे वर्म। जोती म्हणे॥
धर्माचरण करताना देव व भक्त यांच्यातील मध्यस्थाची गरज त्यांनी नाकारली. धर्माच्या नावाखाली नवग्रहांची पीडा दाखवून अंगारा धुपारा देऊन, जपजाप्य करून ब्रम्हर्षीचे सोंग घेऊन अज्ञानी लोकांना लुबाडणाऱ्यांचा त्यांनी निषेध केला आहे आणि खऱ्या धर्माचा प्रचार त्यांनी केला ते म्हणतात.
जगामाजी एक । सत्यधर्म खास ।
सांगा सर्वत्रास ? जोती म्हणे
एकेश्वरादी धर्माची कल्पना – जन्माधिष्ठीत जातीय धर्म संकल्पना म. फुले यांनी नाकारली व देव, ईश्वर, धर्म या कल्पना नाकारून विश्वनिर्माण कर्त्यास निर्मिक हा शब्द वापरला व एकेश्वरवादी धर्माची कल्पना त्यांनी मांडली आणि त्या धर्माचा केंद्रबिंदु मनुष्य व नीती आहे असे सांगितले.
सत्य सर्वांचे आदी घर ।
सर्व धर्माचे माहेर ॥
अशी त्यांची धारणा होती. या सत्यधर्माच्या प्रचारासाठी त्यांनी दि. २३ सप्टेंबर, १८७३ रोजी ‘सत्यशोधक समाजा’ ची स्थापना केली. म. फुले कट्टर एकेश्वरवादी होते. बहुदेवतावादाची कल्पना ही अज्ञानमूलक व भ्रामक आहे असे ते म्हणतात. त्यांच्या अखंडादि काव्यरचनेत ते म्हणतात,
‘मानवाचे साठी बहु धर्म कसे ।
झाला का हो पिसे।जोती म्हणे’
सत्यवर्तनी धर्मग्रंथाची भीती दाखवून नवग्रहांची पीडा दाखवून अज्ञानी लोकांना फरविणाऱ्याचा धिक्कार करतात. ब्राम्हणांचे कसब या ग्रंथात ते म्हणतात. ‘खारका खोबरे नैवद्याचा भार दक्षिणा रीतसर पैसालूट’ सत्यवर्तनी वैद्यकीय आज्ञेशिवाय अफू, भांग, मद्य इ. अंमली पदार्थांचे सेवन करून इतरांवर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार करतात. याबाबत म. फुले उपदेश करताना म्हणतात.
‘एक दिन तरी मद्य वर्ज करा ।
तोच पैसा भरा ग्रंथासाठी ॥’
महात्मा फुले यांचा अंतीम ग्रंथ ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ जोतीराव फुले यांनी अर्धागवायूचा झटका आल्यानंतर उजवा हात लुळा झाल्यावर शरीरातील व्यथा सहन करीत डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. जीवनाच्या अंतीम क्षणी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या मृत्युनंतर १८९१ साली झाले.
मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावर विश्वकुटुंब कसे निर्माण होईल. त्याकरिता लागणारा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका म. फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात मांडलेली आहे. एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक असे नाव दिले आहे. असे या ग्रंथाच्या १ एप्रिल १८८९ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत जोतीराव फुले यांनी म्हटले आहे.
या ग्रंथात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी भारतीय लोकशाहीची मूलभूत तत्वे विशद करून सांगितली आहेत. या दृष्टीने हा ग्रंथ लोकशाहीची गाथा ठरावा असा आहे. हा सर्वांचा जीवन विकास साधणारा ग्रंथ आहे .या ग्रंथात सुख, निर्मिक, पाप, पुण्य, जातीभेद, धर्म, नीती, दैव, सत्य, जन्म, लग्न, मृत्यु, श्राध्द, व्यक्तिस्वातंत्र्य इ. सर्व गोष्टींचा योग्य तो उहापोह करून जीवन विकासात्मक निष्कर्ष काढलेला आहे. खंडादि काव्यरचनेचा ओनामाच म. फुलेंनी ‘निर्मिक’ या शब्दापासून केलेला आहे ते म्हणतात.
सर्वाचा निर्मिक। आहे एक धनी। त्याचे भय मनी ।धरा सर्व ॥
त्यांनी विश्वनिर्माणकर्त्यास निर्मिक’ हा नवशब्द वापरला आहे. कारण जगातील ईश्वरवाचक सर्व प्रचलित शब्दांच्या पाठीमागे आराधना, भक्ती,पूजा-अर्चा करण्याचे एक निराळे कर्मकांड व्यर्थ असून ते माणसामाणसामध्ये फुट पाडणारे आहे, असे म. फुले म्हणतात. म्हणूनच ते म्हणतात –
मानवांचे धर्म । नसावे अनेक ॥निर्मिक तो एक । जोती म्हणे॥
जीवनाच्या शेवटी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ या ग्रंथातील सत्य वर्तना विषयीचे सांगितलेले ३३ नियम
बोले तैसा चाले ।
त्याची वंदाची पाऊले॥
यानुसार प्रथम म. फुले यांनी आचरणात आणले. स्वतःच्या निरक्षर पत्नीला (सावित्रीबाई) शिक्षण देऊन भारतातील आद्य स्त्री शिक्षिका बनविले. स्व-कर्तृत्वाने बहुजन समाजात शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवून आणली. समाजक्रांतिकारक युगपुरुष , कृतिशील समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
-प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
(महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त)
रुक्मिणी नगर,अमरावती .
मो. ८०८७७४८६०९