भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्ष या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक व अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्धे जग पादाक्रांत केलेले आहे.
तथागतांच्या रक्षा-अस्थींचे चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध अस्थींची चोरी झाली होती. अर्थात चोरांना शिताफीने पकडण्यात आले. बुद्धाच्या म्हणून बनावट अस्थी-रक्षाही पुरातत्व वस्तु संग्राहकांत सतत चर्चेत राहिल्या आहेत. सुरक्षित असे भव्य स्तूप बांधण्याची सुरुवात सम्राट अशोकाने सुरु केली असली आणि नंतर ती पद्धत श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, चीन ते पार कंबोडियापर्यंत पसरली असली तरी अशोकपुर्व काळातील स्तूप नेमके कोठे आणि कसे होते याबाबत विद्वानांत चर्चा व वाद आहेत.
भारतातील पुरातन श्रमण परंपरेत श्रमणाच्या मृत्युनंतर श्रमणाला बठ्या ध्यानस्थ अवस्थेत पुरण्याची व त्यावर मातीचा गोलाकार ढिग उभारण्याची प्रथा बुद्धपूर्व कालातही होती. या उंच ढिगाला प्राकृत भाषेत “थूप” असे म्हटले जाई. याचेच नंतरचे संस्कृतीकरण म्हणजे “स्तूप”. या स्तुपांत कलात्मकता नसे. बौद्ध वाड्मयावरून पुर्वबुद्धांचेही स्तूप होते असे उल्लेख मिळतात. या काळातील स्तूपांचे स्वतंत्र अवशेष सापडले नसले तरी पिपरावा (जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) येथे १८९८ मद्धे सापडलेल्या स्तुपाखाली अजुन एक स्तुपाचे जे अवशेष मिळाले आहेत त्यावरून किमान बुद्धकालातील स्तुपांची कल्पना येते.
आज स्तूप या शब्दाचा एकमेव अर्थ आहे तो म्हणजे भगवान बुद्धाची रक्षा व अस्थी यांचे जतन करण्यासाठी, त्यामार्फत बुद्धाचे अस्तित्व वर्तमानातही जाणवण्यासाठी बांधलेली गोलाकार घुमटाकार वास्तू. पहिला स्तूप भगवान बुद्धाच्या जिवीतकालातच झाल्याचे संकेत मिळतात. मगधाचा राजा बिंबीसार याची राजधानी राजगृह येथे तथागत आले असता बिंबीसाराच्या पत्न्या कोसलादेवी, क्षेमा आणि छेल्लना त्यांचे दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्यावेळीस भगवान येथे नसले तरी त्यांचे दर्शन सतत मिळावे म्हणून तिघींनीही तथागतांचे केस व नखे मागितली व त्यावर आपण स्तूप उभारू असे सांगितले. तथागतांनी त्यांची इच्छा पुर्ण केली. हा स्तूप राजगृहात बांधला गेला असावा.
भगवान बुद्धांचे परिनिर्वान कुशीनारा येथे वैशाखी पौर्णिमेला इसवी सनपूर्व ४८३ मद्धे झाले. परिनिर्वाणानंतर तथागतांचा देह सुशोभित करून सातव्या दिवशी कुशीनाराच्या पुर्वेला असलेल्या मुकूटबंधन या ठिकाणी तथागतांचे अग्नीसंस्कार केले गेले. त्यांची रक्षा व अस्थी गोळा करण्यात आल्या व त्या एका सभागारात ठेवून त्यांच्या रक्षनासाठी कुशिनाराचे स्वत: सशस्त्र मल्ल कोट करून राहिले. बुद्धाच्या परिनिर्वाणाची वार्ता तोवर सर्वत्र पसरली होती. स्तुपांसाठी त्यांच्या अस्थी व रक्षेसाठी सर्वप्रथन अजातशत्रूने मागणी केली. तोवर शाक्य, लिच्छवी, कोलीय, पावा इत्यादि गणराज्यांतुनही मागण्या यायला लागल्या. यावर संघर्ष नको म्हणून द्रोण नांवाच्या एकाने रक्षा व अस्थींचे आठ भाग करून सर्वांना द्यावे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे रक्षा-अस्थींचे वाटप झाले. कलह टळला. वेगवेगळ्या नगरांत आठ ठिकाणी स्तूप बनवले गेले.
पण महास्तूपवंशानुसार पुढे “महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितले की ह्या सर्व अस्थि परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने सर्वांकडून रक्षा-अस्थी पुन्हा एकत्रीत करून एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थि ठेवल्या आणि त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तूपात ठेवल्या. चंदनी पेटीवर त्याने सुवर्णाचे पान बसवले आणि त्यात भविष्य लिहीले की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल.” या कथेतील ऐतिहासिकता किती (विशेषत: भविष्यवाणीमुळे) हा जरी विवादास्पद मुद्दा असला तरी मुळचे स्तूप कोणते हे आज आपल्याला माहित नाही हे वास्तव आहे. पिपरावा येथील स्तूप मात्र मुळच्याच एका स्तुपावर उभारला गेलेला नवीन स्तूप असावा असे अनुमान करता येईल एवढे पुरावे सुदैवाने मिळाले आहेत.
बुद्धाचे महापरिनिर्वाण ते सम्राट अशोकाचा बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणुन उदय यात किमान अडिचशे ते पावनेतिनशे वर्षांचे अंतर आहे. या प्रदिर्घ काळात सुरुवातेला बुद्ध अस्थी-रक्षेचे व त्यावरील स्तुपांचे संरक्षण बौद्ध भिक्खुंनी केले असले तरी पुढे त्यावर अवकळा आली असावी व ते स्तूप विस्मृतीत गेले असावेत असे महास्तूपवंशातील वृत्तांतातील अतिशयोक्ती बाजुला काढली तर स्पष्ट होते. त्यानुसार सम्राट अशोक हा बुद्धानुयायी झाल्यानंतर त्याने ८४००० स्तूप उभारायचे ठरवले. पण त्यासाठी बुद्ध अस्थी-रक्षा मिळवण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले, स्तुपांच्या मुळच्या जागा शोधण्यासाठी जुन्या-जाणत्यांची मदत घ्यावी लागली. सम्राट अशोकाने सांची, सारनाथ सारखे असंख्य स्तूप त्याच्या साम्राज्यात, सुदूर अफगाणिस्तानपर्यंत उभारले. धम्मप्रचारकांमार्फत काही अस्थी-धातु श्रीलंका, ब्रह्मदेश ते चीनर्यंत पाठवण्यात आले. बृहद्भारतातील स्तूप (व अस्थी-धातू) जोवर बौद्ध धर्म जोमात होता तोवर सुरक्षित राहिले. अनेक चीनी प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनांत भारतात हजारो स्तूप असल्याचे नोंदवून ठेवले आहे.
● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
- तथागत बुद्धाचे केस, श्वेडागोन पॅगोडा, म्यानमार
परंतू नंतर मात्र अवकळा आली. स्तुप, विहार, लेणी जवळपास हजार वर्ष पार विस्मरणात गेले. इतकेच काय अनेक मूळ गांवे-नगरेही नष्ट झाली अथवा त्यांची कालौघात नांवेही बदलली गेली. १८१८ नंतर मात्र ब्रिटिश, जर्मन पुरातत्वविदांनी एकामागुन एक उत्खनने करत अनेक स्तूप प्रकाशात आणले. अवशेषमात्र उरलेल्या स्तूपांत ठेवण्यात आलेले अस्थीधातू दिल्ली, कलकत्ता व पटनासारख्या शहरांतील पुरातत्व संग्रहालयांत हलवण्यात आले. या प्रकारात अनेक गफलतीही झाल्या. सारनाथ येथील उत्खनन तेथील राजा चैतसिंग बेनारस यांचे दिवान जगत सिंग यांनी केले होते. त्यांना हिरव्या रंगाच्या संगमरवराच्या पेटीत अस्थी-धातू आढळून आले. पण इतिहासाचे ज्ञान नसलेल्या जगत सिंगाने ते अस्थीधातू गंगेत विसर्जित केले. ती संगमर्वरी पेटी मात्र कोलकात्याच्या संग्रहालयात पोहोचली.
- बुद्ध दात अस्थी, श्रीलंका
श्रीलंकेत भगवान बुद्धाचा दात कसा पोहोचला याच्या अनेक थरारक दंतकथा असल्या तरी तो बहुदा अशोकाने पाठवलेल्या धम्मप्रचारकांनी तेथे नेला असावा. पोर्तुगिजांनी (१५६१) आधी अनुराधपूर येथील स्तुपात ठेवलेला दात पन्नास हजार पौंडांच्या बदल्यात मागितला. तो न मिळाल्याने बराच संघर्ष झाला. हा दात आता क्यंडी येथील स्तुपात संरक्षित ठेवला असला तरी “रेलिक्स ओफ बुद्धा” या ग्रंथात सुरुवातीलाच पुस्तकाचे लेखक जोन एस. स्ट्रोंग (John S. Strong) पुराव्यानिशी सांगतात कि पोर्तुगिजांनी हा दात श्रीलंकेवरील चढाईत ताब्यात घेतला आणि गोवा येथे तेथील आर्च बिशप डोन ग्यास्पर (Don Gaspar) याच्या हट्टामुळे नष्ट करण्यात आला. यामागे अर्थात परधर्म विद्वेशाची भावना होती.
- लिंगगुअंग बुद्ध विहार येथे तथागत बुद्ध यांचे दात अस्थी, बीजिंग, चीन.
बुद्धांच्या अस्थीधातुच्या इतिहासात एक रोमांचक रहस्यमय प्रकरणही घडले आहे. पिपरावा (जि. सिद्धार्थनगर, उ.प्र.) येथे १८९८ साली खोदकाम करतांना तेथील इस्टेट म्यनेजर विल्ल्यम पेपे याला भुमिगत एक दगडी पेटी सापडली. त्यात त्याला कुंभांत ठेवलेले अस्थी अवशेष व १६०० रत्ने व चांदी-सोन्याची फुले सापडली. एका भांड्यावर अज्ञात लिपीत लिहिलेला मजकुरही त्याला दिसला. त्याने तो डा. अंटोन फ्युहर या जर्मन पुरातत्वविदाकडून वाचून घेतला…त्यावर ब्राह्मी लिपीत “या शाक्यमुनी बुद्धाच्या अस्थी आहेत…” असा मजकूर लिहिल्याचे आढळले. इतिहासातील ही एक रोमांचक घटना…पण अन्य पुरातत्वविदांनी या अवशेषांवर व मजकुरावरही ते संशयास्पद व बनावट असल्याचे आक्षेप घेतले. वादात न पडण्यासाठी इंग्रज सरकारने सापडलेले अस्थी-धातू सयामचा राजा राम (पाचवा) यास एक राजनैतिक चाल म्हनून बहाल करून टाकले आणि रत्ने व भांडी कलकत्ता संग्रहालयात पाठवून दिली. पुढे जवळपास शंभर वर्षांनी यावर पुन्हा संशोधन झाले व ते अवशेष व लेखन बनावट नसून अस्सलच असल्याचे सिद्ध करण्यात आले. तेथे उत्खननात स्तुपच सापडला व त्याखालीही अजून एक जुना स्तूप असल्याचेही उघडकीला आले.
- बुद्ध दात अस्थी, सिंगापूर
या शतकात पाटण्यातील के. पी. जयस्वाल इन्स्टिटय़ूटकडून १९५८ आणि १९८१ मध्ये वैशाली येथील स्तूप भागात उत्खनन करण्यात आले होते. त्या वेळी आणखी एक मंजूषा (हिरव्या रंगाची संगमरवरी पेटी) सापडली. त्यातदेखील भगवान बुद्ध यांच्या अस्थी आढळून आल्या. त्या सध्या पाटणा येथील संग्रहालयात आहेत. हे उत्खनन ए. एस. आळतेकर यांच्या देखरेखीखाली झाले होते. ब्रिटिश कालखंडात नागार्जुनकोंडा येथील कुली काम करणा-या एका व्यक्तीला भांडे सापडले होते. त्यामध्येही अस्थींचा काही भाग होता. त्याचे परीक्षण करण्यात आल्यानंतर त्या भगवान बुद्ध यांच्या अस्थी असल्याचे स्पष्ट झाले होते.
- बुद्ध अस्थी दिल्ली म्युझियम, दिल्ली भारत
बुद्धाच्या अस्थीधातूचा इतिहास पाहता बव्हंशी अस्थीधातू भारतातीलच ज्ञात-अज्ञात विहारांत असल्याचे दिसते. पुरातत्वीय दृष्ट्या हा मोलाचा ठेवा असल्याने त्याचे जतन करण्याची जबाबदारी सर्वस्वी पुरातत्व विभागाची आहे. भारतात सापडलेल्या अस्थीधातू सध्या दिल्ली येथील पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहेत. त्या बुद्ध स्तूपांमध्ये ठेवल्या जाव्यात यासाठी ३0-३५ वर्षे बौद्ध धर्मनेत्यांचे प्रयत्न असले तरी त्यात अजून यश मिळाले नाही. पण आपल्या अस्थी स्तूपामध्ये ठेवाव्यात, अशी खुद्द भगवान बुद्धांचीच इच्छा होती. आणि सुखी आयुष्याचा मंत्र देणार्या बुद्धांच्या अस्थी प्रदर्शनासाठी नसून त्या पूजनासाठी आहेत, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांचे म्हणणे होते.
- – संजय सोनवणी (ज्येष्ठ इतिहास अभ्यासक)
- साभार :- धम्मचक्र टीम.
- *संकलन :- मिलिंद आशा तानाजी धावारे, जयभीम परिवार मैत्री संघ.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–