
लहानपणी शाळेचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास होता. त्या काळात प्रत्येक गोष्ट नवीन, निरागस आणि गंमतीशीर वाटायची. त्यातलीच एक मजेशीर आठवण म्हणजे “लघवीची सुटी”. ही सुटी खूपच छोटी असायची मधल्या सुटीच्या आधी काही मिनिटांची. पण आमच्यासाठी ती मोठी घटना असायची. त्या वेळी शाळांमध्ये शौचालयं नव्हती. शिक्षक वर्गात सांगायचे, “लघवीची सुटी झाली!” आणि सगळी मुलं धावत सुटायची. कुणी झाडामागे, कुणी शाळेच्या कुंपणाबाहेर. आम्ही मुलं त्यातही मजा शोधायचो. कुणी म्हणायचं, “पहा माझी लघवी किती लांब गेली!” तर कुणी तिचा रंग बघून टिप्पणी करायचं. त्या क्षणांत कोणतंही दडपण नव्हतं, लाज नव्हती, फक्त खेळ आणि कुतूहल होतं.
लहानपणी प्रत्येक गोष्ट आम्हाला उत्सुकतेनं बघायला भाग पाडायची. आपण कसे जन्मलो, वडिलांना दाढी-मिशा आहेत पण आईला का नाहीत, आई-वडिलांच्या लग्नात आपण का नव्हतो असे प्रश्न सतत मनात यायचे. तेव्हा कोणी हसत हसत काहीतरी सांगायचं, पण खर उत्तरं मोठं झाल्यावर मिळाल तरी त्या कुतूहलाचा गोडवा हरवला.
मोठं होताना शाळा, घर आणि समाज आपल्याला “शहाणपण” शिकवतात. पण त्याच शहाणपणात आपली निरागसता हरवते. लहानपणी आपण विचार करायचो चंद्रावर माणसं कशी जातात, ढगांना रंग का नसतो, देव कुठे राहतो? पण आता आपण असे प्रश्न विचारत नाही, कारण आपल्याला वाटतं, “हे सगळं माहित असण्याची गरज नाही.”
लहानपणी आपण पडायचो, चुकायचो, पण हसत उठायचो. मोठं झाल्यावर मात्र पडण्याआधीच घाबरतो. आपल्याला सगळं माहित असल्याचं वाटतं, म्हणून नवीन काही शिकण्याची इच्छा राहत नाही. त्या काळातली “लघवीची सुटी” फक्त सुटी नव्हती, ती आमच्या मोकळेपणाचं प्रतीक होती. त्या दोन मिनिटांत आम्ही खऱ्या अर्थानं स्वच्छंद होतो. आजच्या मुलांना मोबाईल, इंटरनेट, महाग खेळणी आहेत, पण अशी एकही सुटी नाही जी त्यांना हसवेल, मोकळं करेल. त्यांचं बालपण सुरक्षित आहे, पण निर्जीव आहे.
मोठं होणं आवश्यक आहे, पण मनाने लहान राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बालपणीचं कुतूहल, हसू आणि उत्सुकता हीच खरी जिवंतपणाची खूण आहे. “लघवीची सुटी” आज आपल्याला सांगते की, आयुष्यात थोडं थांबायला, मोकळं व्हायला आणि हसायला वेळ द्यायला हवा.
आज आपण सगळं प्रायव्हेट केलं आहे भावना, संवाद, प्रश्न, अगदी हसूही. पण बालपणी सगळं उघडं होतं मनही, विचारही. म्हणूनच त्या दिवसांची आठवण आजही मनाला हलकी करते. जगण्याच्या या गडबडीत आपण पुन्हा थोडी “लघवीची सुटी” घ्यायला हवी म्हणजे स्वतःसाठी थोडा मोकळा श्वास, थोडं हास्य, थोडं जगणं. बालपण परत मिळवता येत नाही, पण त्याचं निरागसपण नक्की जगता येतं. कारण, मोठं होणं सहज शक्य असतं… पण मनाने लहान राहणं हेच खरं शहाणपण असतं नाही का?

बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य