नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण
सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. आज वाढलेली भस्मासूर महागाई पती-पत्नी दोघांनाही संसार सुखाचा करण्यासाठी नोकरी करण्यास प्रवृत्त करते. मानवी गरजा वाढल्या आहेत. जीवन सुखी समाधानी असावे या आशेने नोकरी करणे आज काळाची गरज आहे. नोकरी करणारा पुरुष घर सोडून जाताना त्याच्या जबाबदाऱ्या बऱ्याच अंशी घर सोडल्यानंतर संपतात पण, एका स्त्रीला घरात असताना व घरात नसताना दोन्ही ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या अगदी सावधगिरीने पूर्ण कराव्या लागतात.
घरात वडीलधारी मंडळी सासू-सासरे असले तर त्यांच्या गरजा काय आहेत? त्या पूर्ण केल्याशिवाय, स्वयंपाक केल्याशिवाय तिला घर सोडता येत नाही. त्यावेळी तिच्या संयमाची फार मोठी परीक्षा सुरू असते. तिने कितीही मोठा पगार जरी घरात दिला तरी त्या पगाराबरोबर, तिची त्यागी वृत्ती तिला द्यावी लागते. तिला प्रत्येकाच्या गरजांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तरच कुटुंब आनंदी राहते. अन्यथा त्या कुटुंबामध्ये वाद सुरू होतात. या वादाची परिणीती विभक्त कुटुंब पद्धतीत होते. घरातील मंडळी सुशिक्षित, समजूतदार असल्यास ते एखाद्या बाईला किंवा एखाद्या व्यक्तीला घरात कामासाठी ठेवतात. त्यामुळे काही वेळ घरातील स्त्रीला स्वतःसाठी मिळू लागतो.
अशा कुटुंबामध्ये आनंद, एकोपा आणि सहकार्याची भावना विकसित झालेली दिसते. नोकरी करणारी सून असल्यास तिला सहकार्य करणारे घरातील इतर तिच्या नोकरीत खारीचा वाटा उचलतात. पगार जरी ती घेत असली तरी त्या नोकरीला योग्य रित्या पार पाडण्यासाठी हवे असलेले सहकार्य मात्र पूर्णतः कुटुंबियांकडून मिळते.
नोकरी करत असताना घरातील लहानग्यांना सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत. घरात कोणीतरी मोठं माणूस असेल तर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी बऱ्याच प्रमाणात ते सांभाळतात. पण, घरात पती-पत्नी खेरीज इतर कोणी मोठे नसल्यास या मुलांच्या बाल वयावर फार मोठा परिणाम होतो. बरेचदा त्यांना घरातच एखाद्या दिवसभरासाठी ठेवलेल्या बाईच्या हातात सोपवावे लागते. त्या ही व्यतिरिक्त जर घरात सांभाळणारी बाई नसली तर पाळणा घरात ठेवावे लागते. घरातील वातावरणातून दूर ते मूल परक्या अशा व्यक्तीच्या हातात जाते.
आता प्रश्न निर्माण होतो तो संस्काराचा. आई-वडिलांबरोबर मूल राहत असताना काही अनुभव घेते. काही चुका करते. त्यावर आई वडिलांचा अंकुश असतो. ते सतत त्याला समजावत असतात. त्याच्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण जर का ते मूल पाळणा घरात असेल आणि तिथे जास्त मुलं असली तर मात्र त्या मुलाला कुठेतरी आपण आपल्या आई-वडिलांपासून दूर सोडलेला आहे.आपले इथे कोणीच नाही,असे भय वाटू लागते. ते मूल थोडं शांत राहते. कधी कधी परिस्थिती उलट होते ते मूल सतत रडू लागत. पण पर्याय नसल्याने ते या परिस्थितीशी हळूहळू जुळवून घेऊ लागतं. हे जुळवणे त्याला आईवडिलांपासून तोडण्याचा प्रयत्न करते.
या ठिकाणी थोर शिक्षणतज्ज्ञ जाॅन ड्युटी यांचा विचार मोलाचा वाटतो. ते म्हणतात, ”माणूस हा निसर्गाचा एक घटक आहे आणि माणसाचे जीवन, त्याचा अनुभव व नैसर्गिक प्रक्रियांचाच एक प्रकार आहे. हा निसर्गवादी दृष्टिकोण ड्यूई ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य होय. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रयोगाधिष्ठित वैज्ञानिक विचारपद्धतीला त्यांनी दिलेले महत्त्व.”१ यावरुन आपल्याला कळते निसर्गाच्या सान्निध्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कुटुंबाची जडणघडण चांगली होते.
कुटुंबामध्ये आपण ज्यावेळेला राहतो. त्यावेळेला कुटुंबाच्या गरजा काय आहेत? आपल्याला कुटुंबातील इतर व्यक्तींशी कसे वागले पाहिजे? एकमेकांना कसे सहकार्य केले पाहिजे? यातून संस्कारांची वाढ होते. आपल्या परंपरा काय आहेत? सण उत्सव कसे साजरे करावे? कशाप्रकारे इतरांना भेटल्यावर त्यांच्याशी बोलावे? नातेसंबंध टिकवावे. हे कुटुंबात राहिल्यावर कळते. एकाकी राहिलेले मूल आजूबाजूच्या परिसराशी, शेजारीपाजा-यांशी, समाजाशी काही प्रमाणात दुरावते. त्याची एकाकीपणाची भावना वाढू लागल्यावर त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. आपण काहीच कामाचे नाही. आपल्याला काही करता येत नाही. अशी भावना निर्माण होते. उलट पक्षी अपवादात्मक परिस्थितीत एखादं मूल जरी एकट राहत असलं तरी ते मात्र स्वतः सतत काहीतरी प्रयत्न करून आपल्यात बदल करण्याचा खटाटोप करते. पण, अशी उदाहरणे फार कमी असतील. शेवटी आई-वडिलांचा संस्कार, आई-वडिलांचे प्रेम, वडीलधाऱ्या मंडळींचा सहवास मुलाच्या जडणघडणीत फार महत्त्वाचा आहे.
घरात कोणीच नसल्यावर ते घर म्हणजे एक केवळ वास्तू राहते. त्या वास्तूमध्ये आपल्याला फक्त आपल्या कामापुरते म्हणजे पेईंग गेस्ट सारखे आपण येतो आणि निघून जातो. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे मोल काय आहे? हे मुलांना समजत नाही. मूल लहान असताना जे संस्कार घडले ते जीवनभर त्याच्या मनावर बिंबवले जाते. आपली आई वडील नोकरी निमित्त बाहेर जातात. फक्त रात्री घरी येतात.आपणही या घरात केवळ रात्री राहतो. अशी त्याची एक कल्पना बनलेली असते. पण ज्या वेळेला आई-वडिलांबरोबर,आजी-आजोबांबरोबर मूल राहते. त्यावेळेला त्याला कुटुंब म्हणजे काय? कुटुंबात आपल्या आजी आजोबांचे महत्त्व काय? वडीलधारी मंडळी किती मोलाची आहेत? याची जाणीव होते.
मूल म्हणजे काही एखादी वस्तू नाही. तिला आज इथे ठेवले आणि उद्या तिथे ठेवले.
मूल म्हणजे काही एखादी वस्तू नाही. तिला आज इथे ठेवले आणि उद्या तिथे ठेवले.
आईच्या वडिलांच्या मायेच्या पंखाखाली, आजी आजोबांच्या संरक्षणाखाली ते मूल अगदी सक्षम, हुशार आणि चाणाक्ष बनते. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आपण शाळेतून, कुटुंबातून, समाजातून शिकू शकत नाही. भावनेचा ओलावा हा आपण आपल्या आई-वडिलांकडून, वडीलधाऱ्या मंडळींकडून, भावा-बहिणीकडून, मित्रपरिवाराकडून शिकू शकतो. त्यामुळे नोकरी करणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे. त्यांच्या समस्या काय आहेत? ते समजून घेणे गरजेचे आहे. केवळ घरात पगार दिला म्हणून आपली जबाबदारी संपली असे कर्तबगार वडिलांनी न मानता काही वेळ मुलांसाठी राखून ठेवावा.
घरातील गृहिणी पत्नी असली म्हणून आपण काही करायचं नाही असं होत नाही. तसंच घरात असलेल्या स्त्रीने मीच घरातली कामे का करू असाही अविर्भाव ठेवू नये. घरातील स्त्री ही त्या पूर्ण कुटुंबाची जडणघडण करण्यात एक महत्त्वाची व्यक्ती असते. तिच्या मायेने, प्रेमाने ते कुटुंब पुढे येत असते. आईने दाखवलेला नि:स्वार्थी भाव मुलांच्या मनात एक प्रेरणा निर्माण करतो. आई दिवसभर काम करते. सर्वांसाठी खचता खाते. ही भावना एकदा मुलाच्या मनात निर्माण झाली की तो ही इतरांसाठी प्रयत्न करू लागतो. स्वतःबरोबर इतरांच्या गरजांसाठी खपतो. जीवन जगताना पदोपदी स्वार्थी वृत्ती दिसत असली तरी आईचा नि:स्वार्थीपणा, वडिलांची परोपकारी वृत्ती पाहून हे मूल आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश यासाठी प्रयत्न करू लागते.
नोकरी करणा- या मुलांनी ही कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यावा. त्यांच्याशी प्रेमाने, औदार्यपूर्ण वागावे. जमेल तशी मदत करावी. कुटुंब एक वटवृक्ष आहे. त्यातील एक फांदी आपण आहोत. हा डोलारा एकाच्या खांद्यावर देऊन चालणार नाही. मुले त्याचे नवे आधारस्तंभ आहेत. त्यांनी अर्थाजनासह कुटुंबाच्या जडणघडणीला आधार द्यावा. मग अचानक स्वार्थातून परमार्थ साधण्यासारखं सगळं चांगलं चांगलं घडू लागेल. एका सक्षम, आनंदी कुटुंबाची जडणघडण होईल.
डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
मो. ९६१९५३६४४१संदर्भ : १) मराठी विश्वकोश आधार नेट
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
मो. ९६१९५३६४४१संदर्भ : १) मराठी विश्वकोश आधार नेट