
जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे रविवारी पहाटे खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आग लागल्यानंतर तब्बल २० मिनिटे कोणीही लक्ष दिलं नाही आणि वॉर्डबॉय तिथून पळून गेले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, “जेव्हा धूर दिसायला लागला तेव्हा मी डॉक्टर आणि नर्सला सांगितलं. पण कुणीही काही केलं नाही. प्लॅस्टिकच्या ट्यूब जळत होत्या आणि धूर पसरत होता. वॉर्डबॉय सगळे पळून गेले. मीच माझ्या आईला आयसीयूतून बाहेर काढलं. तिची प्रकृती काय आहे, हेही कुणी सांगत नाही.”
मात्र रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनुराग धाकड यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले, “घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये ११ रुग्ण होते. आमच्याकडे अग्निशमन उपकरणं होती आणि आम्ही तात्काळ प्रयत्न सुरू केले. पण धूर खूप वेगाने पसरल्याने आत प्रवेश करणे कठीण झाले. सहा रुग्णांचा मृत्यू झाला, पाच जणांना वाचवण्यात यश आलं.”
फायर ब्रिगेड अधिकारी अवधेश पांडे यांनी सांगितले, “आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. संपूर्ण वॉर्ड धुराने व्यापलेला होता. आत जाता येत नव्हतं, त्यामुळे आम्ही इमारतीच्या दुसऱ्या बाजूचे काच फोडून पाण्याचा पंप सुरू केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दीड तास लागला. तोपर्यंत काही रुग्णांचा मृत्यू झाला होता.”
या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा उपाययोजना आणि स्टाफच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ