जय भीम – जळजळीत सत्य
जय भीम!
ही कसली हाक? कसला हुंकार?
ही कोण्या जातपातीत अडकलेल्यांची मिरासदारी नाही,
ही बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली मशाल आहे!
ही मशाल पेटली तेव्हा—
झोपड्यांतल्या अंधारातल्या चुली पेटल्या,
हाडं खिळखिळी झालेल्या मजुरांच्या हातात
नवे रक्त उकळू लागले,
आणि नागड्या अंगावरही स्वाभिमानाची चिलखत चढली.
शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!
बाबासाहेब म्हणाले होते,
आणि तो मंत्र आजही रक्तात धगधगतो,
ढोंगी व्यवस्था लचके तोडते,
म्हणूनच ज्ञानाच्या तलवारीला धार देतो!
जय भीम!
हा मंत्र आहे, हा गर्जना आहे—
ही खुराड्यात अडकलेल्या लेकरांची ललकारी आहे,
मोकाट सुटलेल्या माणुसभक्षक विचारांना
खिळ बसवणारी जळजळीत क्रांती आहे.
कोण म्हणतो जय भीम ही जात आहे?
ही तर रक्तात उसळणारी विद्रोहाची लाट आहे,
ती लाट जात नाही, धर्मही नाही,
ती बाबासाहेबांच्या शब्दांनी उभी राहिलेली
एक नव्या युगाची सुरुवात आहे!
रस्त्यावर चिरडलेल्या पायांनी
पुन्हा उभं राहायचं,
शिकायचं, भिडायचं, संघटित व्हायचं,
स्वाभिमानाच्या शिलालेखावर
माणूस म्हणून जगायचं,
आणि पिळवणुकीच्या हातावर
बळकट मूठ वज्रासारखी ठोकायची!
जय भीम!
हा सलामीचा नारा नाही,
ही एक जळती मशाल आहे—
अंधाराच्या काळजाला फाडणारी!
आपला विद्रोही,
प्रा.प्रविणकुमार वा.राणे,
9272341725
मुक्काम पोस्ट -हरणखेड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा