
जगायचं थांबलं का?
कष्ट मेहनत न करता ही
इथं पोट कोणाचं भरलं का?
आरक्षण मिळत नाही म्हणून
कोणी जगायचं थांबलं का?
मुंगीचेच उदाहरण घ्या ना!
एक लहानसा तो जीव आहे
कण कण माती जमा करुन
तिचं बनवलेलं वारुळ आहे
परिश्रमा वाचून किटकाचं
आयुष्याशी कधी जमलं का?…
झाडावर उमललेली कळी
हळूहळू सुंदर फुल बनते
हसत खेळत जीवन जगा
बागडतांनी नेहमी म्हणते
कोणी तरी कुस्करणार आहे
म्हणून उमलायचं लांबलं का?…
नदी नाले सुर्य चंद्र आणि तारे
यांच्या कामात कधी खंड नाही
निसर्गाच्या नियमानुसार वागणं
यांनी केलं कधी बंड नाही
आपला आपला नित्यक्रम
अहो यांनी कधी सोडलं का?…
अडचणी समस्या प्रश्न
हा जीवनाचा एक भाग आहे
प्रयत्न करत राहीलं पाहिजे
सातत्यातच मिळतो माग आहे
दे रे हरी पलंगावरी असं म्हणून
कधी कोणाचं भागलं का?…
कामावरती निष्ठा असावी
आत्मविश्वास समोर ठेवू
सत्य अहिंसा आणि शांततेनं
आपण सारेच पुढं पुढं जाऊ
या जगात कोणावाचून कोणाचं
तुम्हीच सांगा अडलं का?…
वाद आहेत विवाद आहेत
विश्वासघात अन् धोका ही
प्रेमळ प्रांजळ मन असू द्या
नकळत मिळतो मोका ही
कधी होतो क्रोध अनावर
पथ्थ्यावर काही पडलं का?
आरक्षण मिळत नाही म्हणून
कोणी जगायचं थांबलं का?
-पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१