भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनक
अलीकडे दरड कोसळण्याच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.. रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील जोशीमठाला भूस्खलना मुळे घरांना तडे जावून दरड कोसळल्या या भागातील ७२३ घरांना तडे गेल्याने अनेक कुटुंबे उधास्वस्त झालीत.
दरड कोसळण्याच्या घटनांना भूस्खलन म्हणतात. दरडी कोसळण्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात.
भूस्खलन ही उतारावर जमीन वेगाने सरकण्याची स्थिती आहे, ज्यामध्ये खडक, ढिगारा आणि माती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली एकत्र घसरतात. भौतिकशास्त्रातील त्याचे स्पष्टीकरण थोडे क्लिष्ट आहे. यानुसार, पर्वत आणि डोंगर उतारांवर खडक आणि पृष्ठभाग (माती इ.) एकमेकांसोबत घट्ट चिकटलेले असतात. जेव्हा काही बाह्य दाबामुळे यांच्यातील हा घट्टपणा कमी होतो, तेव्हा दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. इंडिया टुडेने आयआयटी रुरकी येथील भूविज्ञान विभागाच्या प्राध्यापिका शारदा प्रसाद प्रधान यांच्या हवाल्याने सांगितले की, ‘पृष्ठभागावरील सामग्री टक्कर आणि संयोगामुळे उतारावर एकत्र असते, त्याच्यातील हा दबाव कमी झाला स्खलन किंवा भूकंपा सारख्या घटना घडतात. उतारवरील पृष्ठभागावर ब्रेकिंग फोर्समुळे घसरण्याची स्थिती तयार होते. त्यामुळे अशा ठिकाणी कोणतेही कार्य करण्याअगोदर या पृष्ठभागाची स्थिती विचारात घेणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडतात. एका ठराविक प्रमाणातील पाऊस आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण हाच पाऊस जेव्हा मुसळधारेचे स्वरुप घेतो तेव्हा होणारे शेतीचे नुकसान तसेच पश्चिम घाटासारख्या भागात डोंगरकडे आणि उताराखाली राहणाऱ्या मानवी वस्त्यांच्या काळजीचे कारण ठरतो. पश्चिम घाटातील डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीसाठी पावसाळ्यात अतिवृष्टीचा धोका दरवर्षी उद्भवतो. लोकवस्तीच्या जवळ भूस्खलनाची ठिकाणे असणे ही बाब मानवी जीवितास तसेच मालमत्तेस मोठा धोका पोहोचवू शकते. अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, भूस्खलनाच्या शक्यता वाढतात.
भूस्खलनाची तीन मुख्य कारणे आहेत. ज्यामध्ये तेथील जमिनीतील मातीचे गुणधर्म, खडक, जमिनीच्या थरांची संरचना ज्या प्रकारची असेल त्याप्रमाणे मोठा पाऊस, कमी अधिक क्षमतेच्या भूकंपामुळे कठीण खडकावरील मातीचा थर मोकळा होते. त्यामुळं भूस्खलन होऊ शकते. याशिवाय शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण, निवासी व अन्य कारणांसाठी डोंगर रांगावर वाढते अतिक्रमण, डोंगरातील खोदकाम, डोंगरावरील वृक्षतोड, निर्वनीकरण आदी स्वरुपातील मानवी हस्तक्षेप हा देखील महत्वाचा घटक भूस्खलनाला कारणीभूत आहे.
राज्यातील १५ टक्के भूभाग दरडप्रवण असून त्यामध्ये पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ९ जिल्ह्यांचा समावेश होतो. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या संधी, भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. विशेषत: अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये, खडकातील संधी – भेगा – फटीमध्ये पाणी शिरुन खडकाची झीज होत राहते. वजन वाढते आणि खडकांचे तुकडे अलग होवू लागतात. अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जावून म्हणजेच दरड कोसळून खालील बाजूस स्थिरावतात.
अतिपर्जन्यमानाच्या कालावधीत उतारी प्रदेशावरुन वाहून जाणारे पाणी सपाटीकरण केलेल्या भागात स्थिरावते आणि मुरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात होते. यामुळे जांभा खडकांमध्ये विघटन प्रक्रिया गतिमान होते आणि चिबड भूसभूशीत प्रस्तर ढासळतात. माळीण दुर्घटना ही पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील भूस्खलनाची सर्वात मोठी दुर्घटना होय.
पश्चिम घाटातील डोंगराळ भाग त्यामुळे डोंगराळ भागाखालील लोकवस्तीला विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
कसा देता येईल लोकसहभाग?
मोठा डोंगर आणि मुसळधार पाऊस या मानवी नियंत्रणातील बाबी नाहीत. पण हवामान खाते किंवा प्रशासन धोक्याची सूचना देईपर्यंत वाट न पाहता तेथील ग्रामस्थांनी सलग तास-दोन तास मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होणे गरजेचे आहे. त्यानंतर तेथील डोंगर, उतारावरील मातीच्या पाहणीनंतर तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार पुन्हा घरी परतण्याचा विचार करावा.
दरड प्रवण परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने समिती स्थापन करावी. पर्जन्यवृष्टीचा कल कसा आहे याचा आढावा घ्यावा. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुस्थितीत आहेत काय तसेच डोंगरमाथ्यावर कोठे भेगा पडल्या आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. घाटातील रस्ते अतिवृष्टीदरम्यान दरडी कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद केले जातात. अशा वेळी या रस्त्यांवरुन प्रवास करण्याचा धोका पत्करु नये. मानवी जीवन अनमोल असून त्यासाठी एवढी काळजी घेणे तरी गरजेचे आहे.
-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६
ReplyForward |