शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा
आजच्या काळात शिक्षण हा समाजाच्या उभारणीसाठी सर्वात महत्त्वाचा पाया आहे. पण दुर्दैवाने, शिक्षणाच्या या पवित्र प्रक्रियेचं बाजारीकरण होतंय, आणि याच गोष्टीविरोधात खंडाळा येथे एक परखड, धारदार आवाज उठविला सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी.
*ज्या शाळेने पोसलं, वाढवलं – त्या शाळेचंच विस्मरण का?
विजय ढाले यांनी आपल्या भाषणात ज्या मुद्द्यांना स्पर्श केला, ते प्रत्येक सुजाण नागरिकाने आत्मपरीक्षण करत समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या शाळांनी अनेक शिक्षकांचा संसार चालवला. पण तेच शिक्षक निवृत्तीनंतर “कॉन्व्हेंट शाळा” काढून शिक्षणाचा बाजार थाटत आहेत. हे शिक्षक कधीकाळी सरकारी शाळेत शिकवणारे होते. त्यांनी मिळवलेल्या वेतनातूनच आता खाजगी शिक्षणसंस्था उभारून समाजाचं शोषण करणं, हे फसवणूकीचं दुसरं रूप नाही का?
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
*आधुनिक शिक्षण की फसवणूक?
भोळी भाबडी जनता “इंग्रजी शिक्षण” किंवा “आधुनिक सुविधा” यांच्या मोहात अडकते आणि आपल्या लेकरांना गावाबाहेरच्या महागड्या शाळांमध्ये घालते. पण त्या शाळांमध्ये शिक्षणापेक्षा अधिक भर असतो, ड्रेस, फी, आणि इतर खर्चांवर. याच्या उलट, जिल्हा परिषद शाळा, जी मोफत शिक्षण देते, अनुभव असलेले शिक्षक देते आणि मूल्यशिक्षणाचं मूळ जपतात याकडे पालकाचे दुर्लक्षित होत आहेत.
* शाळा समायोजन आणि दत्तक योजना – शिक्षणाला धोका
सरकारच्या या धोरणांविरोधात विजय ढाले यांनी आंदोलन करून निर्णय स्थगित करायला भाग पाडलं. त्यांच्या मते, हे धोरण ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण हिरावून घेण्यास कारणीभूत ठरू शकतं.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
*आपल्या गावातील शाळा – आपल्या संस्कारांचं घर
कवी ढाले पालकांना आवाहन करतात –
“तुमचं लेकरू तुमच्याच गावात शिकू द्या. गरिबी, मेहनत, माणुसकी आणि संस्कार यांचा प्रत्यक्ष अनुभव त्याला होऊ द्या.”
शाळा म्हणजे फक्त इमारत नव्हे – ती आपल्या संस्कृतीची जपणूक करणारी जागा आहे. शिक्षणाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांना ओळखा, आणि गावातील शाळांवर पुन्हा विश्वास ठेवा.
* परिणाम: कृतीतून विश्वास
या भाषणाचा प्रभाव इतका होता की खंडाळा गावातील २० ते २२ पालकांनी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेतच दाखल केली. ही केवळ सुरुवात आहे – शिक्षण वाचवण्याच्या लढ्याची!
* शेवटी एवढंच…
“शिक्षणाची सुरुवात आपल्या गावातूनच व्हावी,
आपल्या मातीच्या शाळेतूनच व्हावी.
कारण शिक्षण हे ज्ञान देतं,
पण संस्कार फक्त गाव देतो.”