Sunday, October 26

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा

“गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा

दिवाळी हा भारतीय संस्कृतीत समृद्धी, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. मात्र गोरबंजारा समाजातील ‘दवाळी’ ही फक्त एक सण म्हणून नव्हे तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचे संदर्भ विधी, लोकगीते आणि परंपरा, समाजाच्या भटक्या इतिहासाशी, निसर्गाशी आणि सामूहिक जीवनाशी घट्ट जोडले गेलेले आहेत.

गोरबंजारांची ‘दवाळी’ दोन दिवसांची असली तरी तिचा आशय शतकानुशतकांचा सांस्कृतिक वारसा सांगतो. पहिल्या दिवशी कुमारिका मुली परंपरेनुसार घराघरांत जाऊन दिवा घेऊन ‘मेऱा’ च्या रुपाने थोरामोठ्यांचे शुभचिंतन करतात आणि पारंपरिक गीतांद्वारे समृद्धीचे आशीर्वचन मागतात. या विधीत समाजातील स्त्रीशक्ती आणि एकात्मतेची जाणीव स्पष्ट दिसते. दुसऱ्या दिवशी पार पडणारी ‘गोधन पूजा’ पशुधन आणि निसर्गाबद्दल गोरबंजारांचा कृतज्ञतेचा उत्सव ठरतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी होणारी ही पूजा केवळ धार्मिक कर्मकांड नाही; ती जीवनचक्राविषयीच्या तत्त्वज्ञानाची साक्ष ठरते.

गायी-बैल हे त्यांच्या श्रम, निसर्ग आणि अर्थव्यवस्थेचे धुरीण असल्याने गोधन पूजेला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्वही आहे. कुमारिका मुली माळरान, नदीतून पारंपरिक गवत, फुले आणून गायी-बैलांच्या शेणाचे प्रतीकात्मक रूप ‘गोधन’ तयार करून पारंपरिक गीते म्हणत शेणाच्या आकृतीची पूजा करतात, ज्यातून निसर्गाशी एकरूप होण्याची प्रांजळ कला दिसते. गोर बंजारा संस्कृतीचे अभ्यासक डॉ. सुभाष राठोड यांच्या मते, “बंजारा तांडा संस्कृतीतील दिवाळी सामाजिक ऐक्य, कौटुंबिक नाते आणि सांस्कृतिक ओळख यांचा जिवंत साक्षात्कार आहे.

प्रत्येक सणात सामूहिकतेची भावना अधोरेखित होते, जी व्यक्तीपेक्षा समाज, वैयक्तिकतेपेक्षा एकात्मता !” या परंपरेत केवळ रूढी नाही, तर स्त्रीचा सन्मान, निसर्गोपासना आणि पर्यावरणाशी समन्वय यांचा त्रिवेणी संगम आहे. आधुनिक शहरीकरण आणि डिजिटल जगाच्या गोंधळातही गोरबंजार समाज या मूल्यांना चिकटून आहे, हे आशादायी आहे. त्यांच्या ‘दवाळी’तून विसरलेल्या निसर्गभानाचा, कुटुंबबंधाचा आणि सामुदायिकतेचा पुनश्च स्मरण घडते.

⁃ डॉ. सुभाष राठोड, पुणे

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.