Monday, December 8

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!

गवळी सर श्रद्धांजली – भैरवनाथ विद्यालय पुणेवाडीचे माजी मुख्याध्यापक

१९९२ ते १९९५ या काळात भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी मध्ये शिक्षण घेत असताना श्री. गवळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. एकाचवेळी कर्तव्यकठोर मुख्याध्यापक, शाळेतील सर्वांसाठी प्रेमळ पालक, भूमिती आणि विज्ञान यांसारखे अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे अशी विविध रूपे सरांमधे बघायला मिळाली.


आम्हां ९५ च्या दहावीच्या बॅचवर सरांची विशेष नजर होती. आमच्यावर सरांनी खूप भरभरून प्रेम केले. शारदा उदावंत, सविता रेपाळे आणि विष्णू औटी यांची बॅच म्हणून आम्ही सरांच्या सतत लक्षात राहिलो. या विद्यालयात मला जवळपास अडीच वर्षे शिक्षक म्हणून काम करता आले. यावेळी सुद्धा अध्यापनासंदर्भात सरांचं सतत मोलाचं मार्गदर्शन मिळत गेले. नंतर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना सर आवर्जून चौकशी करत असत.


एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर सरांचं शेड्युल व्यस्त असताना सतत संपर्कात राहून काय चाललंय याची माहिती घेत. कितीही त्रास असला तरी प्रशासक म्हणून काम करत असताना डोक्यावर बर्फ ठेवून आणि वेळप्रसंगी कठोर वागून, सर्वांना सोबत घेऊन कसं काम करायचं, हे मला सरांकडून शिकायला मिळाले.


मागील दोन तीन वर्षांपासून सरांची तब्येत ठीक नव्हती. औषधोपचार चालू होते. मध्यंतरी पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून सावरून ते आता बरे झाले होते. यापुढे छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार करण्यासाठी नियोजन चालू होते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काल काही रूटीन उपचारासाठी नगरमधील हाॅस्पिटल मध्ये त्यांना नेलं असता तिथे अचानक आलेल्या स्ट्रोक मुळे तब्येतीत गुंतागुंत निर्माण झाली. कालपासून डॉ. सतत शर्थीचे प्रयत्न करत होते. मी सुद्धा डॉ च्या संपर्कात होतो. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यातच सरांचे निधन झाले. असं काही घडेल आणि आज सरांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल, अशी पुसटशी शंका सुद्धा मनात नव्हती.


विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या कालावधीसाठी ठसा उमटवणारे हे व्यक्तिमत्त्व अनंताच्या प्रवासाला कायमचे निघून गेले. भैरवनाथ विद्यालय पुणेवाडीचा इतिहास सरांच्या शिवाय अपुर्ण आहे. सरांच्या आत्म्यास परमेश्वर सद्गती आणि शांती देवो. ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ द्यावे. आदरणीय श्री. गवळी सरांना भैरवनाथ विद्यालय सर्व शिक्षक, ९५ ची दहावीची बॅच तसेच आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!

Vishnu Auti IRS Sir

श्री. विष्णू औटी, IRS
आयकर उपायुक्त छत्रपती संभाजीनगर
सरांचा माजी विद्यार्थी
मार्च ९५ ची दहावीची बॅच

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.