महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊनगेली. आयुष्यभर संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. हे कळल्यावर सात कोटी दलितांच्या अनभिषिक्त राजाच्या अंतिम क्षणी कुणीही नसावे असे म्हणून जगजीवनराम बाबासाहेबांचे पाय धरून ओक्साबोक्सी रडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या पाच दिवसांचा प्रवास अतिशय व्यस्त आणि भावनिक होता.
महामानवाचे शेवटचे पाच दिवस- 
१ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिल्लीतील मथुरा रोडवरील बुद्धिष्ट आर्ट एक्झिबिशन पाहिले त्यातील विविध देशांतील बुद्धाचे पुतळे पाहिले, त्यानंतर परत निघताना कॅनाट प्लेस रोडवरील बुक डेपोत जाऊन ७ पुस्तके विकत घेतले व रात्री उशिरापर्यंत हेच पुस्तके चाळीत राहिले.
* २ डिसेंबर १९५६ रोजी दिवसभर त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे लेखन केले. त्यामुळे दुपारचे जेवण उशिराच घेतले. संध्याकाळी दलाई लामांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहिले.यावेळी त्यांनी भारतात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार कसा करता येईल याची चर्चा केली,रात्री परत ग्रंथाचे लेखन केले. यावेळीच ते नानकचंद रत्तुना म्हणाले की,पुस्तके माझ्या हयातीत प्रकाशित होतील काय? बौद्ध धम्माचा भारतभर मी प्रचार करू शकेन काय? त्यावर नानकचंद रत्तू ‘हाँ साहब’ एवढेच म्हणाले. पण बाबासाहेब आज थोडे थकलेले होते म्हणून रात्री १०.३० वाजताच झोपले.
* ३ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबआंबेडकरांनी १६ डिसेंबर रोजी व मुंबईत बौद्ध धम्मदीक्षा समारंभ कार्यक्रम आखला तसे मुंबईच्या कार्यकत्र्यांना कळविले. नानकचंद रत्तूना रेल्वेची फस्ट क्लासची चार तिकिटे बुक करण्यास सांगितली. पण तिकिटे बुक झाली नाहीत तेव्हा बाबासाहेबांनी १४डिसेंबरची विमानांची तिकिटे बुक केली.
 १४ ते १८ डिसेंबरपर्यंत बाबासाहेब मुंबईत कुमारसेन समर्थ यांच्याकडे थांबणार होते.
*४ डिसेंबर १९५६ रोजी रात्रीच्या जागरणामुळे बाबासाहेब उशिरा उठले. पण खूपच थकलेले वाटत होते.११ वाजता जैन धर्मीय अधिवेशनासंबंधी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगाने थोर समाजवादी नेते एस.एम.जोशी व प्र.के.अत्रे यांना पत्र लिहिली त्याचप्रमाणे भारतात बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी आर्थिकसाह्य मिळावे म्हणून ब्रह्मदेशाच्या सरकारला एक पत्र लिहिले.
*५ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब मुंबईत होणारा धर्मांतर सोहळा, भारतात धर्माचा प्रचार या चिंतेत होते. दिवसभर उर्वरित ग्रंथाचे लेखन केले हे ग्रंथ आपल्या हयातीत प्रकाशित व्हावेत,अशी त्यांची तळमळ होती. रात्री त्यांना अस्वस्थ वाटत होते.अशा अवस्थेतही बुद्ध आणि धम्म ग्रंथाची प्रस्तावना लिहिली.अत्रे,जोशी यांना लिहिलेली पत्रे डोळ्यांखालून घातली. झोपेचे इंजेक्शन घेऊन झोप येत नव्हती. हे सारे जवळून नानकचंद पाहात होते.या अनुषंगाने ते म्हणतात मला बाबासाहेबांचा चेहरा थकलेला दिसत होता.अशा अवस्थेतही त्यांनी मुंबईच्या तिकिटाची कार्यक्रमाची चौकशी केली.तेवढ्यात स्वयंपाकी सुदाम बाबांनी जेवणास बोलावले. डायनिंग हॉलचा मार्ग ड्रॉईंग रूममधूनच होता.या हॉलच्या दोन्ही बाजूंनी ग्रंथाची खचून भरलेली कपाटे होती ते पाहातच बाबासाहेब डायनिंग हॉलकडे गेले.इच्छा नसतानाही दोन खास खाल्ले. ड्रॉईंग हॉलमध्ये आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर डोळे मिटून थोडा वेळ स्तब्ध झाले.एक दीर्घश्वास सोडला त्यांनी त्रिसरण म्हटले त्यानंतर नानकचंद कडून मालिश करून घेतली. मसाज झाल्यानंतर काठीच्या आधाराने उठले व उठतानाच ‘चल उचल कबिरा तेरा भवसागर डेरा’ असे म्हणाले नानकचंदाना बुद्ध गीताची रेकॉर्ड लावण्यास सांगितली.त्यांना चिंता होती दलितांच्या भविष्याची, रात्री ११.१५वा. नानकचंद रत्तू घरी जाण्यास निघाले पण परतबाबासाहेबांनी बोलावून घेतले त्यांनी लिहिलेली पत्र जवळ ठेवण्यास सांगितले. ११.३५ वा.नानकचंदांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली,रत्तूनी बाबासाहेबांचे जवळून शेवटचे दर्शन घेतले.
* अखेरचा प्रवास ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळीच बाबासाहेब निघून गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदामबाबांनी दिली.नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसारमाध्यमांना ही बातमी दिली. ११.५५ वा. मुंबईच्या पी.ई सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन केला घनशाम तळवटकर यांना प्रथम बातमी दिली.त्यानंतर औरंगाबादला फोन करून बळवंतराव वराळे यांना ही दुःखद बातमी सांगितली. त्यानंतर  वा-यासारखी ही बातमी सर्वत्र पसरली.दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू इतर मंत्री यांनी भेट दिली.सायंकाळी ४.३० वा.बाबासाहेबांचा पार्थिव देह ट्रकने दिल्ली विमानतळावर आणला.बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली. रात्री ९.०० वा. हे विमान नागपूरला उतरण्यात आले.ज्या ठिकणी दीक्षा समारंभ झाला, त्या ठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वा.पर्यंत ठेवण्यात आला.१२ वा. हे विमान नागपूरहून निघाले व रात्री १.५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले.त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता. त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना राजगृहावर आणण्यात आले. त्या ठिकाणी प्रचंड आक्रोश सुरू होता. अंत्यसंस्काराला जागा दिला नाही बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराची व्यवस्था सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. हिंदू कॉलनीच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू न देण्याची हळूच चर्चा सवर्णात असल्याची जाणीव झाली.तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदू म्हणून मरणार नाही.अशी प्रतिज्ञा करणा-या बाबासाहेबांचा अंतिम संस्कार हिंदूच्या स्मशानभूमीत कशाला? व प्रचंड गर्दी लक्षात घेता त्यांचा अंतिम संस्कार शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत झाले. पण तत्कालीन म्युनिसिपल कमिशनर पी. आर. नायक यांनी विरोध केला व परवानगी नाकारली. त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते तेथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. पण ती जागा देण्यासाठी काँग्रेसने विरोध केला तेव्हा बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते सी. के. बोले यांच्या मालकीची जमीन होती.त्या जमिनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले व त्या ठिकाणी बौद्ध धम्म विधिनुसार भिक्खू एच धर्मानंद यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य यांच्या हस्ते हा अंत्यसंस्कार पार पडला..
ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन  व कोटी कोटी प्रणाम..!

Leave a comment