एकल महिलांच्या काळीज कापणाऱ्या वास्तव कथा लिहिणारी दमदार कथालेखिका म्हणजे डॉ.प्रतिभा जाधव: प्रा.सुमती पवार यांचे प्रतिपादन
डॉ.प्रतिभा जाधव लिखित कोरोना एकल महिलांचे वास्तव जगणे चित्रित करणाऱ्या ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच कामगार नगर, सातपूर(नाशिक) येथे संपन्न झाला.
याप्रसंगी प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुमती पवार, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कुलकर्णी, आरती आहिरे, चित्रकार अरविंद शेलार व निलेश निकम मंचावर उपस्थित होते. प्रा. सुमती पवार प्रमुख अतिथी होत्या व कोरोना एकल महिला भगिनींच्या हस्ते ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आहे.
याप्रसंगी प्रा.सुमती पवार भाषणात म्हणाल्या की, “वेदनेच्या बंद दारात डोकावून वेदना, प्रश्न, समस्येस नेमक्या शब्दांत बांधून आपल्या काळजाचा ठाव घेणारी, समाजाच्या तळागाळात अनेक प्रश्नांशी झुंजणाऱ्या, कोलमडलेल्या, उभे राहू पाहणाऱ्या एकल महिलांना बोलतं करणारी, मायेचा हात देणारी कृतिशील कार्यकर्ती लेखिका म्हणजे डॉ.प्रतिभा जाधव. त्यांनी खूप कमी वयात विविध क्षेत्रांत नाना पातळीवर उल्लेखनीय काम उभे करून राज्य-देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली स्वयंभू ओळख निर्माण केली आहे.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कामात हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात जुळलेल्या डॉ.प्रतिभा जाधव महाराष्ट्रातील आजच्या आघाडीच्या साहित्यिक आहेत. कल्पनेचा मागमूस नाही, खणखणीत वास्तव, अस्वस्थ करणारी भाषाशैली, प्रखर सत्यनिष्ठ वैचारिक बुद्धिप्रामाण्यवादी लेखन भूमिका हे त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य आहे. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांच्या सुन्न करणाऱ्या जीवघेण्या आयुष्याचे वास्तव दर्शन करून देणाऱ्या,आर्त भेदक अशा कथांचा संग्रह म्हणजे ‘दहा महिन्यांचा संसार’ हे पुस्तक होय.
या प्रकारची संवेदनशीलता व प्रभावी मांडणी करण्याची क्षमता साहित्यात अलीकडे दुर्मिळ होताना दिसते म्हणूनच कथालेखनाच्या प्रांतात पहिलेच दमदार पाऊल टाकणाऱ्या कथालेखिका डॉ.प्रतिभा जाधव वेगळ्या ठरतात. ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहाच्या निमित्ताने एकल महिलांचे विश्व चित्रित करणाऱ्या स्वतंत्र साहित्यनिर्मितीस प्रारंभ झाला आहे असे मला वाटते.”
सामाजिक कार्यकर्त्या आरती अहिरे, चित्रकार अरविंद शेलार यांनीही ह्या कथांबद्दल आपल्या मनोगतातून गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन शशिकांत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकांत पिसू यांनी मानले.