
दही हे भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जेवणात दह्याला नेहमीच स्थान असतं. केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही दही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळेच दह्याला सुपरफूड म्हटलं जातं. दह्यात प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले जिवाणू असतात, जे आपल्या पचनसंस्थेला निरोगी ठेवतात. याशिवाय कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशिअम या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले दही शरीराला उर्जा देतं, हाडे मजबूत करतं आणि एकूण आरोग्य सुधारतं.
रोज दही खाल्ल्यास अनेक प्रकारे शरीराला फायदा होतो. सर्वात आधी, दह्याचे सेवन हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पोषक घटक शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर दह्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे.
दह्यामुळे पचनप्रक्रियाही सुधारते. यातील प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतात, ज्यामुळे पोट हलके राहते आणि गॅस, फुगणे किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांपासून सुटका मिळते. नियमित दही खाणाऱ्या व्यक्तींचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते आणि शरीरात हलकेपणा जाणवतो.
वजन कमी करण्यासाठीही दही उपयुक्त ठरतं. दह्यातील कॅल्शिअम कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनला नियंत्रणात ठेवतो. या हार्मोनमुळे पोटाभोवती चरबी साचते, त्यामुळे दह्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि शरीर सडपातळ दिसते.
याशिवाय दह्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यात असलेले प्रोबायोटिक्स आणि जीवनसत्वं शरीराला संसर्गांपासून वाचवतात. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर लहान-मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळतं. दह्याचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ते नैसर्गिक रोगप्रतिकारक बळ देतं.
तथापि, दह्याचं सेवन मर्यादित प्रमाणात आणि योग्य वेळी करावं. दिवसातून एकदा जेवणात दही समाविष्ट करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते, पण रात्री झोपण्यापूर्वी दही खाणं टाळावं, कारण त्याचा थंड स्वभाव काही व्यक्तींना त्रासदायक ठरू शकतो.
रोजच्या आहारात एक वाटी ताजं घरगुती दही समाविष्ट केल्याने शरीर निरोगी राहातं, पचन सुधारतं, हृदय सुरक्षित राहतं आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. म्हणूनच म्हणतात “दही रोज खा, आरोग्यदायी रहा!”