सर्वांना अभिमान वाटेल, असे प्रेरणास्थळ निर्माण करा-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. सर्वांना अभिमान वाटेल, असे जिल्ह्याचे हृदयस्थळ असलेल्या मालटेकडी येथे ‘शिवसृष्टी’च्या रुपाने प्रेरणास्थळ निर्माण करा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी आज येथे केले.
महानगरपालिका क्षेत्रातील मालटेकडी येथे पर्यटन विकास योजनेंतर्गत विकास कामाचे भूमीपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा आयुक्त देवीदास पवार, माजी महापौर चेतन गावंडे, माजी नगरसेवक दिनेश बुब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, शहराच्या मध्यभागी हिरवाळीने आच्छादलेल्या मालटेकडी येथे सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या निसर्गरम्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट व ऐतिहासिक घटनांची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी शिवसृष्टी विकासांतर्गत म्युरल वॉलची निर्मिती करण्यात येत आहे. ते अधिक आकर्षित होण्यासाठी महानगरपालिकाने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राज्यातील विविध कामांचा अभ्यास करुन शहरात भव्य व अभिमान वाटेल असे प्रेरणास्थळ निर्माण करावे. शिवसृष्टी विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करु, असेही ते यावेळी म्हणाले.