आधारकार्ड काढून 10 वर्षे पूर्ण असल्यास कार्ड अपडेट करावे – जिल्हाधिकारी पवनीत कौर
गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : आधारकार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपले कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
आधारकार्डधारकांना स्वत:चे ओळखपत्र व रहिवाशी पत्त्याचा पुरावा अद्ययावत करण्यासाठी कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात आले आहेत. अद्ययावतीकरणासाठी कार्डधारकांनी स्वत:चे ओळखपत्र (निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड आदी) व रहिवासी पुरावा (वीज देयक, निवडणूक मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, पाणी देयक, शिधापत्रिका आदी) कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन अपलोड करून घ्यावे. त्यासाठी 50 रूपये शुल्क आकारण्यात येईल.
तथापि, myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर स्वत:हून कागदपत्रे अपलोड करता येतात. स्वत:हून कागदपत्रे अपलोड केल्यास 15 जूनपर्यंत ही सेवा विनामूल्य वापरता येईल. mAadhaar ॲपमार्फतही कागदपत्रे अपलोड करता येतील. हे ॲप गुगल प्ले स्टोरला मिळू शकेल.
विविध योजनांमध्ये पात्र व्यक्तींना शासकीय अनुदान व लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आधारकार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी ते तत्काळ अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.