महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 14 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
गौरव प्रकाशन अमरावती,(प्रतिनिधी) : वीरशैव लिंगायत समाजासाठी समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी काम करणाऱ्यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी नामवंत कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्य क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक अशा दोन पुरस्कारासाठी गुरुवार दि. 14 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समात-शिवा पुरस्कारासाठी पात्रता व नियमावली दि. 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयासह महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे.
व्यक्ती पुरस्कारासाठी पात्रता : या पुरस्कारासाठी पुरुषाचे वय 50 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त तसेच स्त्रियांचे वय 40 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. या क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष वैयक्तिक किंवा संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र ठरतील.
सामाजिक संस्थांसाठी पात्रता : या पुरस्कारासाठी संबंधित संस्था पब्लिक चॅरिटेबल व ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960 खाली नोंदणीकृत असावी. स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य दहा वर्षापासून अधिक असावे. तसेच ती संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. वीरशैव- लिगांयत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करूनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थाना दिला जाईल.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार अर्जाचा नमुना समाज कल्याण सहायक आयुक्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्जामध्ये अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज छायाचित्र (तीन प्रती), वयाचा दाखला, शैक्षणिक पुरावा, सामाजिक कार्याची माहिती व त्यासंबंधीचे पुरावे, पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला सर्व तीन प्रतीत असणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांनी समाज कल्याण कार्यालयात वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.