जनसामान्याच्या अंतर्मनातील कोलाहल शब्दातीत करणारी गझल :’एक कैफियत ‘
"काळ्या अंधाराला आता तुडवत गेलो
दुःखालाही मी सोन्याने मढवत गेलो !"
आयुष्यातील अंधार पायदळी तुडवून, दुःखाला सोन्याने मढवित जाणारा मु.पो.शृंगारतळी, त.गुहागर,जि.रत्नागिरी येथील दिलदार,जिगरबाज गझलकार, कवी, कादंबरीकार प्रा.डाँ.बाळासाहेब लबडे यांचा 'एक कैफियत' हा पहिलाच गझलसंग्रह ,महाजन पब्लिकेशन हाऊस, पुणे यांनी प्रकाशीत केला आहे. यात छोट्या बहरपासून मोठ्या बहरातील एकूण 87 गझलांचा समावेश आहे. याची प्रस्तावना प्रख्यात जेष्ठ गझलकार ए.के.शेख, पनवेल यांनी लिहीली आहे. ते डाँ.लबडे यांचे गझलेविषयी व्यक्त होताना म्हणतात..." साहित्यकृतीतील ताल-तोल, लय, प्रतिमा, भाषा त्यांच्या व्यासंगावर अवलंबून असतो. लबडेसरांचं मन कलासक्त आहे. त्यांच्या गझलेची भाषा,आशय, सामान्य सर्वसामान्य माणसाच्या अंतर्मनाचा ठाव घेणारा आहे. आपल्या अनुभवाचे, विचारांचे,भावनांचे, प्रतिमांचे शब्दसिद्धीचे, स्वरसंहितेचे सर्व संचित सरांनी गझ...