आश्नम शाळा वसंतनगर ता. मुखेड ही शाळा माळरानावर वसलेली.त्या शाळेजवळ मोठं गाव नाही. मुखेड तालुक्याचे ठिकाण शाळेपासून आठ दहा कि मी दूर.आश्रमशाळेच्या पश्चिम दिशेला एक छोटसं गाव वसलेलं.अंतर असेल दिड दोन किमी.त्या गावाचं नाव शेळकेवाडी.हे गाव मुखेड तालुक्यात तर आश्रम शाळेच्या पूर्वेकडे आडमाळवाडी हेही छोटसंच गाव वसलेले.अंतर असेल शाळेपासून दिड दोन किमी हे गाव कंधार तालुक्यात. आडमाळवाडी मुखेड पासुन जवळ पण कंधार तालुक्यात येते.
आडमाळवाडीला दरवर्षी मला निश्चित आठवत नाही पण कदाचीत मार्च एप्रिल महिन्यात नियमित किर्तन भजनाचा सप्ताह चालायचा. त्या सप्ताहला उमरज ता. कंधार येथील नामदेव महाराज घोडयावर बसून आडमाळवाडीला यायचे. नामदेव महाराज गोल चेहऱ्यांचे टपोरे डोळे. बारीक सरळ् नाक. कानात सोन्याचे रींग असत. डोक्यावर गोल लाल गुलाबी पटका बांधलेला असायचा. चेहरा टवटवीत. पहाण्यात करुणा, दया, शांती सामावलेली आसे.असं त्याचं व्यक्तीमत्व वाटायचे.
आडमाळवाडीतील ते सात दिवस आमच्यासाठी मौजमजेचे असायचे.जवळ पैसा नसायचा पण आम्ही संध्याकाळी तेथे जात असू. तेथे किर्तन व्हायचे. भजन व्हायचे. भारुडाची स्पर्धा व्हायची. ती भारूड स्पर्धा मला खूप आवडायची.
मला निश्चित आठवत नाही ;पण मी चौथीला असेन. रविवार सुट्टीचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. माझ्या खोलीत राहणारे आठ दहा मुलं आम्ही कंधार मुखेड रोडवर फिरत निघालेले. बोलत बोलत रुई तांड्यापर्यंत गेलो. तांडा कंधार मुखेड रोडला लागूनच आहे.
तांडयातील सात आठ बाया डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेवून रुईकडून येत होत्या. तेवढयात एक जीप गाडी आली. गाडी अचानक त्या बायांसमोर थांबली. गाडी थांबलेली पाहून आम्ही घाबरलोत. आम्हाला आता ते धरुन तळ्याच्या पाळूत किंवा नवीन पुलामध्ये पुरतात असं मला वाटलं. आम्ही पळून जाण्याच्या तयारीत होतो ; पण त्या गाडीतून एक गोरापान, पांढरा नेहरू शर्ट, पातळ तलम धोतर, धोतराचा शेव पायापर्यत सोडलेलं, डोक्यावर काळेभोर केस, केसाची छान भांग पाडलेली, छान टपोरे बोलके डोळे. थोडसं लाबंट पसरट चेहरा. सरळ नाक, चेहऱ्यावर प्रसन्नता असलेल काटक शरीराचा तरुण गाडीतून उतरला.गाडीतून उतरत असतानाच त्यांनी दोन्ही हात जोडत म्हणाला, ‘जय क्रांती’ बाया काहीही बोलल्या नाहीत.
त्या तरुणाच्या बोलण्यात वागण्यात नम्रता ठासून भरलेली. तो तरुण मणुष्य म्हणाला ,”माझ्या याडी तुम्ही किती कष्ट करता. माझी माय आता हे पाणी तुम्ही कोठून आणत आहात?” त्यातली एक वयस्कर बाई डोळ्यात पाणी आणुन म्हणाली, ” बापू तू कोण हाईस?हे पाणी आमी रूई गावाच्या हीरीतून आणलाव.पाणी आणुन आणुन आमच्या टाळूवर केस बी राहीलं नायी बग.”
ते ऐकून तो तरुण म्हणाला , ”याडी इंदिरा गांधी इंदिरा गांधी बोले चो त्यांना मत देता मग पाणी का मागत नाही. पुढे बोलले मी तुमच्यासाठी लढेन. संघर्ष करीन.” तेवढयात त्यातील एक याडी बोलली , “आरं बापू तू कोण हाईस. तूझं गाव कुणतं हाय माय?त्याचं बोलणं आम्ही ऐकत होतो. त्यांची गाडी गेली म्हणजे आम्ही मोकळे. तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी केशव धोंडगे. बहादरपूरा मारो गाव छ याडी. तेव्हापासून मी भाई केशवराव धोंडगेना ओळखतो. भाईनी त्या याडीना वाकून नमस्कार केला. सर्व याडी तांड्याकडे निघाल्या.
भाईची नजर आता आमच्याकडे वळली. ते पटकन माझ्या जवळ आले. माझं हात धरला. हाताला कसला तरी सुवासिक तेल लावले. जय क्रांती म्हणत मला म्हणाले, ” नाव काय आहे तूझं? ” मी पार घाबरून गेलो होतो. आता मला पकडून नेणार असं वाटत होतं.मी रडायला आलो होतो. ते म्हणाले, ” घाबरु नकोस. कोणालाही घाबरायचं नाही. कणखर बन.” माझी भीती कमी झाली पण …
भाईना मी माझं नाव सांगितलो. गाव सांगितलो. वर्ग सांगितलो. तेव्हा भाईनी पाठीवर थाप मारत त्यांच्या गाडी चालकाला म्हणाले, बघ येवढे लहान लहान लेकरं आई वडीलाला सोडून किती दूर राहीलेत.” आम्हाला सगळ्यांना उदेशून त्यावेळी भाई बोलले, ” वसंतराव नाईके रो छोरो अंगुर खाऊ छ . तुम्हाला सिंदळ्या मिळतात का खायाला ? ‘यावर आम्ही फक्त हासलोच. त्याकाळी आम्हाला ना सिंदळ्या माहित होत्या .ना अंगूर.ना वसंतराव नाईक.
दहावी होईपर्यंत मी भाई केशवराव धोंडगे यांचे भाषण एक दोन वेळेस ऐकलो असेन पण ते आडमाळवाडीला आले की मी त्यांना पहाण्यासाठी हमखास जात असे. भाईचं भाषण म्हणजे वैचारिक ज्ञानाची पर्वनी होती . त्यांच्या भाषणात बोलण्यात कधी विनोद असायचा. कधी शालजोडीतून मार असायचा. कधी ते वाईटावर असूड ओढायचे. कधी गदागदा हसावयचे तर कधी सभेतील माणसाच्या डोळ्यात आश्रू आणायचे.
आजन बाहू असलेले धोंडगे साहेब हे आष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते लेखक होते. ते संपादक होते. ते विचारवंत होते. ते पत्रकार होते. ते अनिष्ठ रूढीच्या विरोधात लढणारे, परखड मत मांडणारे नेते होते. धोंडगे साहेब हे खऱ्या अर्थाने दिन दलीत, गोरगरिब, तळागळात पिचत पडलेल्या लोकांचे कैवारी होते.जेथे अन्याय तेथे भाई केशवराव धोंडगे हजर असत. त्यांनी जीवनभर जात, पात, धर्म याचा आधार कधीच घेतला नाही. लोकांच्या न्याय मागण्यासाठी त्यांनी शेकडो सत्याग्रह केले. अनेक मोर्चे काढले.
मी त्यांच्या विषयी वर्तमान पेपरमध्ये वाचलोय मराठवाडाचे प्रश्न ते अग्राहाने मांडत राहीले.विधान सभा गाजवली ते भाईनीच. जेव्हा भाई एख्याद्या दिवशी विधानसभेसत नसत तेव्हा सभासदाना विधानसभा सुनी सुनी वाटायची. सभासदाला भाईची आठवण यायची. त्या काळचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक हे स्वतःभाईना बोलून बोलून दाखवले होते : केशवराव शिवाय विधानसभा गजबजत नाही …
भाई केशवराव गरीबांवर झालेला आन्याय पोटतिडकीने विधानसभेत मांडायचे. त्याचं एक उदाहरण सांगतोय मुखेड जि. नांदेड पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने तांडयातील एका माणसाचां फेटा डोक्यावरून काढला व त्याची मिशी काढायला लावली. हे प्रकरण भाईच्या कानावर गेले. मिशा व फेठा हे कोणत्याही व्यक्तीचे स्वाभिमान आहे त्या गरीबा माणसाला स्वाभिमान नाही का?त्या गरीबाचा पोलीस अधिकाऱ्याने अपमान केला . त्याचं स्वाभिमान दुःखावला म्हणून त्यानी हा प्रश्न विधानसभेत लावून धरला. संबधीत अधिकाऱ्याला शिक्षा करा म्हणून त्यांनी विधानसभेत अग्रह धरला होता.
भाई म्हणजे कणखर, तत्वाला धरुन रहाणारे, तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व. त्यांनी जीवनात कधीच असत्याशी तडजोड केली नाही.ना तडजोड स्विकारली नाही. कोणाचा मुलाहीजाही ठेवला नाही.एकदा ते जय क्रांतीत लिहीले होते पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्यांच्या पाळीव कुत्र्याची समाधी बांधतात ;पण मराठवाडी जीवंत जनतेकडे ते आजीबात लक्ष देत नाहीत.
भाईना महाराष्ट्र मराठवाडयांची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखतात. त्यांना मन्याड खोऱ्याचा वाघ म्हणूनही ओळखतात. या मुलूख मैदानी तोफेच्या समोर सर्व आमदार, खासदार, मंत्री पदाधिकारी, अधिकारी फार वचकून वागत. त्यांच्यासमोर आदरपूर्वक नतमस्तक होत .भाई सत्यासाठी लढत राहीले म्हणून त्यांचा महाराष्ट्रभर दरारा होता.
मराठवाड्याचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडत.विधानसभेत वंदेमात्रम हे गीत भाईनी सुरुवात करायला लावले. औरंगाबदला उपराजधानी करा, विधानसभेचं एक अधिवेशन मराठवाडयात झाले पाहिजे ही त्यांची अग्रहाची मागणी होती. मराठवाडयात औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक ज्या झाल्या ते केवळ भाईमुळेच. मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची त्याची मागणी होती स्वातंत्र्य सैनिकाचे स्मारक व्हावे ही त्यांचीच मागणी होती.
बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या ग्रामवजा तालुक्याचं नाव, त्याचबरोबर जिल्हयाचं नाव भाईनी देशपातळीवर नेलं. महाराष्ट्रात कोठेही गेलो व समोरच्यांनी विचारलं तुम्ही कुठले? उत्तर .. कंधार. समोरचा म्हणायचा भाई केशवराव धोंडगे !! लई घाग गडी आहे.
भाई आमदार म्हणून जनतेची नि:स्वार्थ सेवा करत राहीले. समाजातील तळागळातील लोकांना शिक्षण मिळावे म्हणून कंधार तालुक्यातील गाव, शहर, तांडे व वाडीत प्राथामिक शाळा, माध्यमिक शाळा , महाविद्यालये याचं जाळं विणुन शैक्षणिक क्रांती घडवून आणली. भाई केशवराव धोंडगेचे हे ऋण कोणीच फेडू शकत नाहीत. भाई मराठी, इंग्रजी,हिन्दी व उर्दू भाषेत पारंगत होते.
हजारजबाबीपणात त्यांचा हात महाराष्ट्रात कोणी धरतील असं वाटत नाही. प्र .के.आत्रे सोबत त्याचं काही दिवस वादविवाद चाललं असे त्या काळी चर्चा चालायची. त्यांचा वादविवाद चालायचं हे मला प्र के आत्रे याचं “गुद्दे आणि गुदगुल्या ” हे पुस्तक वाचल्यानंतर कळालं.
मला लहानपणापासूनच भाई केशवराव धोंडगे आवडायचे. १९७७च्या खासदारकीसाठी भाई थांबले होते. मला नुकतच मतदानचं हक्क प्राप्त झालेलं होतं.मी भिंतीवर गेरूने लिहायचो “धोंडगेचा गाडा दिल्लीला धाडा” माझं पहिलं मत मी त्यांना दिलं होतं. त्यांना खासदरकीचा काळ कमी मिळाला. पण कमी काळातही त्यांनी आपल्या वाणीने तेथील सभागृह ही दनाणून सोडले होते. त्यावेळी विरोधी पक्षात इंदिरा गांधी असताना भाईनी तत्कालीन शासनला खणकावून सांगितलं होतं इंदिराजीना जेलमध्ये टाकण्याची चूक करू नका.
माझी साहेबासोबत भेट मी कंधारला गटशिक्षण अधिकारी असताना झाली होती. त्यांनी फोन लावून मला त्यांच्या घरी बोलावले. हाताला आत्तर लावले. तेव्हा मला माझ्या बालपणाची आठवण झाली. शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून माझा सत्कार केला.ती आठवण व त्यावेळी त्यांनी बराच वेळ माझ्याशी बोलले. त्यावेळी त्यांनी दिलेली शिकवण मी माझ्या काळजात कोरुन ठेवलेली आहे.
अनेक गुणांनी घडविलेले मडविलेले भाई केशवराव धोंडगे आपल्यातून गेल्याची माहिती एक जानेवारी रोजी धडकली.एक जानेवारी दोन हजार तेवीस हा दिवस नांदेड जिल्ह्यासाठी विशेष करून कंधार व लोहयासाठी काळाकुठ्ठ अंधार घेवून उजाडला होता. भाई गेले पण त्यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिकार्यांचं गाठोडं मागे आपल्यासाठी ठेवून गेलेत. केशवराव धोंडगे हे केशवराव धोंडगेच होते. ते शेवटपर्यंत दलबदलू ,आयाराम गयारामचं राजकारण केलं नाही. भाईना भावपूर्ण श्रध्दांजली.
- राठोड मोतीराम रुपसिंग
- नांदेड -६
- ९९२२६५२४०७
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–