Monday, October 27

अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?

अमिताभ बच्चन यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रुपये आणि मिठाई दिल्याचा व्हिडिओ व्हायरल – सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा उत्सव. पण यंदा सोशल मीडियावर मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून वाद पेटला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचा डबा आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम दिल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एका कंटेंट क्रिएटरने जुहू येथील ‘जलसा’ बंगल्या बाहेर हा व्हिडिओ शूट केला असून, कर्मचाऱ्यांपैकी एकाने स्वतः ही माहिती दिली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिग बींवर टीकेची झोड उठवली आहे. “बिग बींची संपत्ती जशी प्रचंड, तशी भेट मात्र ‘मिनिमल’ का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिलं, “ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना फक्त 10 हजार? लाजिरवाणं आहे हे!”

तर काहींनी बच्चन यांच्या बाजूनेही मत मांडलं. “भेट किती दिली हे नाही, भावना काय आहे ते महत्त्वाचं”, असं म्हणत त्यांनी बिग बींचं समर्थन केलं. पण बहुतांश प्रतिक्रिया नकारात्मकच दिसल्या.

मोठ्या कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना लाखोंच्या भेटी मिळाल्याचे व्हिडिओ जेव्हा व्हायरल होत आहेत, तेव्हा बच्चन यांची ‘दहा हजारांची भेट’ चर्चेचा विषय ठरली आहे. काहींनी विनोदी पद्धतीने लिहिलं, “बिग बींनी दिलं गिफ्ट, पण नेटिझन्सनी दिला ‘सूटेबल बॉम्ब’!” आता नेटकऱ्यांच्या या वादावर स्वतः अमिताभ बच्चन काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.