
छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री) – राज्यातील शेतकरीवर्गावर वाढत असलेल्या कर्जाच्या दबावामुळे शेतकरी दांपत्याने हृदयद्रावक आत्महत्या केली. फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील 43 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी विलास रामभाऊ जमधडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले.
कर्जाचा ताण आणि शेतीतून अपुर्या उत्पन्नामुळे विलास आणि रमाबाई यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून साधत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावर बचत गटाचेही कर्ज असल्याचे स्पष्ट झाले.
शुक्रवारी रमाबाई यांनी शेतातील विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलं आणि नातेवाईक घरी परतले. परंतु सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर शेतात जाऊन व्हॉट्सअॅप ग्रुपवर “कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे” असा संदेश टाकला आणि रमाबाईंच्या आत्महत्येच्या विहिरीजवळील झाडाला गळफास घेतला.
गावकांनी संदेश वाचताच तिथे धाव घेतली, परंतु विलास जमधडे यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे आळंद गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्जबाजारीपण, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीतील अपुर्या उत्पन्नामुळे राज्यातील शेतकरी वर्गावर वाढत असलेल्या दबावाची ही आणखी एक दुःखद उदाहरण ठरली आहे.