भारतीय समाज जातीचा आगर आहे. ह्या जातीव्यवस्थेने भारतीय बहुसंख्य समाजाला मानवी अधिकारापासून वंचित ठेवले. या देशातील मुलनिवासींना आपल्या व्यवस्थेत स्थान दिले नाही. जे भारताचे खरे प्रतिनिधि होते त्यांना शोषणाच्या कप्प्यात डांबून स्वतःचा विकास करणारा वैदिक सनातनी धर्म हा भारतीय समाजाचा खरा शत्रू आहे.कारण त्यांनी स्वहितासाठी आपल्याच माणसाला गुलाम बनवले होते.
आदिवासी हा समाज निसर्गपूजक आहे. त्यांची संस्कृती ही मातृसत्ताक आहे. ते स्वतंत्र विचाराचे आहेत. सिंधू सभ्यता ,मेहुलगढ सभ्यता ,बुद्ध कालिन सभ्यता यामध्ये आदिवासी हा समाज खरा लढवय्य होता. निसर्गाच्या बदलत्या प्रवाहाचा वेध घेऊन जगणारा हा समाज खरा मानवतावादी विचारांचा पाईक होता. पण हजारो वर्षाच्या आर्यव्यस्थेने देशातील लोकांना विभक्त केले .काही शूद्र ,अति शूद्र आणि आदिवासी अशी विभागणी करून भारतीय इतिहासाला गालबोट लावले .
भारताचा इतिहास ब्राह्मणवाद व बुद्धिझम यामधील रक्तरंजित इतिहास आहे .असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आदिवासी समाजाला स्वतःची संस्कृती, स्वतःची भाषा, स्वतःची कार्यपद्धती ,स्वतःची नीतिमूल्य आहेत . ही संस्कृती भारतात प्राचीन आणि प्रभावी अशी आहे. या संस्कृतीचे पाळेमुळे जमिनीतील घट्ट बसलेले आहेत .ते आजही आपल्याला सर्वांना पाहायला मिळते.प्राचिन वाड्:मयानी आदिवासी समाजाच्या इतिहासाला पुढे येऊ दिले नाही .याचे कारण देतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,” वाङ्ममय म्हणजे जवळजवळ सर्वस्वी ब्राह्मणांना जे श्रेष्ठ पदाचे अधिकार आणि हक्क आहे त्यांची जोपासना करणे हाच मुख्य हेतू असणारे वाङ्ममय आहे. अशी स्थिती असताना ब्राह्मणांनी त्या वाङ्मयाच्या पवित्रला उचलून का धरू नये बरे ..! ते धरणारच ..! ज्या कारणामुळे ते पावित्र उचलून धरावे असे ब्राह्मणाला वाटते त्याच कारणामुळे त्या पावित्र्याचा धिक्कार करा असे ब्राह्मणेत्तराला वाटते. ज्याला पवित्र वाङ्मय म्हणून मानले जाते त्यामध्ये तिरस्कारणीय सामाजिक तत्त्वज्ञान सांगण्यात आले आहे आणि हेच तत्त्वज्ञान आपल्या सामाजिक अवनतीला कारणीभूत झाले आहे .याचे ज्ञान ब्राह्मणेत्ताराला झालेले असल्यामुळे ब्राह्मण ज्या दृष्टीने ज्या वाङ्मयाकडे पाहतो त्याच्या अगदी उलट दृष्टीने ब्राह्मणेत्तर त्या वाङ्मयाकडे पाहतो” या विचारदृष्टीचा वापर करून वाङ्ममयकडे आज बहुजन समाजाने पाहावे.
आदिवासी हा समाज हजारो वर्षापासून जंगलाच्या सानिध्यात राहून शहरीकरणापासून दूर राहिला. जेव्हा भारतात इंग्रजाचे साम्राज्य निर्माण झाले तेव्हा इंग्रजांनी आपली राज्यव्यवस्था जंगलाच्या भागांकडे वळवली. जंगलातील नैसर्गिक साधन संपत्तीचा मानवाला काही उपयोग होऊ शकते का यासाठी त्यांनी जंगलामध्ये विविध संशोधन केंद्र उभारली. त्यासाठी अभ्यास मंडळ तयार केले .या अभ्यास मंडळातून जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजासोबत त्यांची ओळख झाली. आदिवासी समाजातील सर्व चालीरीती आणि जंगलतील खजिना त्यांनी समजून घेतला .त्यांनी आदिवासीवर फार अन्याय केला नाही .कारण त्यांना आदिवासी समाजामध्ये असलेल्या ज्ञानाची ओळख जगाला करून द्यायची होती .अशा काळामध्ये काही भागांमध्ये इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचे धोरण आखल्यामुळे आदिवासी समाजाला आपल्या उपजीविका करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. अशाच परिस्थितीमध्ये क्रांतीयोध्दा जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. त्या काळातील असलेल्या असहिष्णू व विषमतामय वातावरणामध्ये त्यांनी आपली सशस्त्र क्रांती केली. क्रांतीयोध्दा जननायक बिरसा मुंडा ह्या पुस्तकातून प्रब्रम्हानंद मडावी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याची ओळख वाचकाला करून दिली. याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो.
क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा यामध्ये एकूण आठ प्रकरण आहेत. तसेच सात परिशिष्टे आहेत. या ग्रंथातून आदिवासी समाजाने केलेले बिरसा मुंडा पूर्वीचे आंदोलन, बिरसा मुंडाचे आंदोलन यांचा लेखाजोखा मांडलेला आहे. आदिवासी समाजाला लाभलेले बिरसा मुंडाचे क्रांतीयुद्ध समग्र परिवर्तनाची लढाई होती. त्यांची लढाई फक्त इंग्रजाविरुद्ध होती असा इतिहास रंगवला असला तरी त्याची लढाई इथल्या ब्राह्मणशाहीविरुद्ध होती. हे आपण वास्तव ओळखले पाहिजेत.
ज्या व्यवस्थेने समाजकारणाची व्यवस्था नेस्तनाबूत केली. मानवी अधिकार हिरावून घेतले. यज्ञयाग, कर्मकांड, अंधश्रद्धा यांनी जनतेला लुटले .आदिवासी स्त्रीवर, लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले .त्यांना सभ्य समाजात येण्यापासून रोखले. या व्यवस्थेविरुद्ध जननायक बिरसा मुंडा यांनी एल्गार पुकारला. त्यांनी कमी वयामध्ये आपल्या जीवनाचे नवे तत्त्वज्ञान मांडले .नवीन एक वैज्ञानिक दृष्टी मानली. समस्त समाजासाठी आपला बिरसाधरम निर्माण करून नव्या विचारप्रवाहातला गती दिली.
प्रब्रम्हानंद मडावी यांची ही चौथी कलाकृती आहे .यापूर्वी आपण कोणत्या देशात राहतो ..बफरझोन.. दोन कवितासंग्रह आणि जयपालसिंग: हाकीचा कर्णधार ते संविधान सभा हा वैचारिक प्रबोधनात्मक लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून व वैचारिक लेखनातून मराठी साहित्याला नवीन ओळख करून दिलेली आहे.
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची लेखणी बारूद बनलेली आहे. माणूस व मानवतावाद हाच त्यांच्या लेखनाचा मुख्य बिंदू आहे .राजेश मडावी आपल्या बर्ल्ब मध्ये लिहितात की,” इतिहासाच्या एकांगी प्रेमात न अडकता आदिवासींच्या दाहक वर्तमान प्रश्नांचा अन्योन्यसंबंध अधोरेखित व्हावा आणि संविधाननिष्ठ चळवळीला ताकद मिळावी. ही त्यांच्या लेखनामागची खरी तळमळ आहे.” हे निरीक्षणे अत्यंत वास्तववादी आहेत .या ग्रंथाला डॉ. नीलकांत कुलसंगे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे ते आपल्या प्रस्तावनेत लिहितात की ,”आजची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती पाहता आदिवासीसकट सर्व बहुजन समाजाला मंथन करण्याची गरज आहे. नव्या पिढीला समतामुलक विचारांनी जोडायचे आहे. तळागळातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर बिरसा मुंडा सारख्या महानायकाचे चरित्र आदिवासीच्या नसानसात भिंनले पाहिजेत.” हे मत अत्यंत अनमोल असे आहे. तर लेखक आपल्या मनोगत म्हणतात की बिरसाचे महान कार्य तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावे त्यांना कळावे आणि बिरसाच्या जीवन संघर्षातून प्रेरणा घेऊन विशेषता तरुणांनी आजचे वर्तमान उद्याचे भविष्य आहे. या जाणिवेसह नव्याने वाटचाल करावी. हाच निखळ हेतू या लेखनामागील आहे हे नम्रपणे सांगावे असे वाटते.”या विचारावरून लेखकाचा खरा मानवीय विचाराचा दृष्टिकोन दिसून येतो.
आज चंगळवादी वातावरणात बहुजन समाज पूर्णतः गुरफाटून गेला आहे. आपल्या अस्तित्व आणि अस्मिता तो गमावत चालला आहे .या अस्मिताला अधोरेखित करण्याचे काम प्रब्रम्हानंद मडावी आपल्या क्रांतीयोध्दा जननायक बिरसा मुंडा या चरित्र ग्रंथतातून वाचकाला करून देतात.
या ग्रंथात बिरसाच्या उदयापूर्वी झालेले आदिवासींचे बंड, या प्रकरणात आदिवासी समाजाच्या उठावाचे विश्लेषण केले आहे.सथाल उठावावर भाष्य करताना कार्ल मार्क्स लिहतो की,”Outbreak on the Santhals a half savage tribes in Rajmahal Hill in Bengal,put down after seven months guerilla warfare in February 1856″.हे विचार आदिवासी उठावाचे क्रांतीत्व विशद करणारे आहे.
बिरसा मुंडा चा जन्म ,बालपण आणि शिक्षण , बिरसाचे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन ,बिरसाचा इंग्रजा विरोधात विद्रोह आणि तुरुंगवास,या प्रकरणात बिरसा धरमची तत्वे आज ही प्रासंगिक आहेत.ते पुढीलप्रमाणे आहेत. “१) या जगात निसर्ग हाच शक्तिशाली आहे तोच विश्वाचा निर्माता आहे. सर्वांची सुरक्षा आणि कल्याण तोच करेल .२) सर्वांनी एकाच धाग्यात गुंफले पाहिजेत .३)घराच्या भोवतालचा परिसर अगदी स्वच्छ व नीटनेटका असावा .४)खोटे बोलू नका. चोरी करू नका. कोणाचा द्वेष करू नका. मुंग्यासारखे परिश्रमी बणा.५) एक दुसऱ्यावर प्रेम करा आणि नेहमी संघटित रहा.६) दृष्ट मित्र आणि आळसी दोस्त यापासून दूर राहा .७)मद्य व्यक्तीचा नाश करतो म्हणून दारूचे सेवन करू नका. त्यापासून दूर राहा. हे त्याचे विचार काळाच्या किती पुढे होते याची प्रच्यती आपल्याला येते. चलकद येथे बिरसा दरबार सुरू होता. त्या भाषणात ते म्हणाले की,” सर्वांनी अन्यायाविरोधात उभे राहून या आणि आपलं गमावलेला स्वातंत्र्य परत मिळवू या..! जमीनदार आणि महाजन हे आपल्या अज्ञानाचा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेत आहेत. आपली पिळवणूक करीत आहेत. आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणे बंद केले पाहिजेत. ब्रिटिश आणि काही मिशनरी लोक आपलेच तेवढे गुन्हेगार आहेत. हे सर्व दिकू लोक आपल्याला दैनंदिन अवस्थेला जबाबदार आहेत. आपल्या लढा या सर्वांच्या विरोधात आहे एवढे लक्षात ठेवा” .ह्या भाषणातून लोकांना फार मोठी ऊर्जा मिळाली होती.
हजारीबाग जेलमधून सुटका व स्वातंत्र्याचा उठाव, जन नायकाच्या उठावाचा शेवट, मुंडा आदिवासी आणि त्यांच्या शिक्षेची कारणे, १६ मे १९०० रोजी मुंडा कैद्याची सुनावणी आणि बॅरिस्टर जेकब याचा युक्तिवाद.हा युक्तीवाद मानवीय दृष्टिने अत्यंत महत्वाचा आहे.अशा प्रकरणातून बिरसा मुंडा यांच्या कार्यकर्तुत्वाचा पट त्यांनी अत्यंत वास्तव विचाराने वाचकापर्यंत पोहोचविलेला आहे .
बिरसाच्या जीवनातचे सत्यनिष्ठता कार्य समजवून देणे, बिरसा यांनी आपल्या जीवनात केलेले शोषणाविरुद्ध आंदोलन ,ख्रिस्त धर्माचा स्वीकार केल्यानंतर ते ख्रिस्ती धर्मात रमू शकले नाही .वनहक्क, जंगल, जमीन आणि जल या निसर्ग संसाधनाप्रती ते अत्यंत जागृत होते. आमचे अधिकार कोणीही हिरावून कोणी घेऊ शकत नाही. २५ वर्षाच्या तरुणांनी भारतीय इतिहासात स्वतःचा ठसा उमटवला.आदिवासी समाजाला नव्या क्रांतीसाठी तयार केले .त्यांचे कार्य अत्यंत क्रांतिकारी आहे. त्यांनी स्व:हितापेक्षा समाजाहितालाच प्रथम प्राधान्य दिले. त्यानी इंग्रजांच्या गुलामी विरुद्ध आवाज बुलंद केला तसाच बुलंद आवाज त्यांनी प्रस्थापित ब्राह्मणशाही, सामंतशाही ,जमीनदार यांच्याविरुद्ध केला. त्यांच्या कार्याने भारतीय इतिहासाला आदिवासी समाजाच्या वास्तवगर्भी भूमिकेची ओळख झाली .
जागतिक आदिवासी एक आहेत. पण भारतात त्याला मान्यता नाही. संविधानातील अधिकार दिले असले तरी त्यांची पूर्तता राज्यकर्ते करू शकली नाही .देशाची राष्ट्रपती एक महिला आदिवासी असताना संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलावल्या जात नाही .यावरून अजूनही आदिवासींना ब्राह्मणशाही मान देत नाही हे आपण ओळखले पाहिजेत. संविधानानुसार राष्ट्रपती सर्वोच्च पदी असले तरी ब्राह्मणवादी विचारात आदिवासींची जागा अस्पृश्यतेचीच आहे. त्यामुळे आता भारतातील आदिवासी ,अनुसूचित जाती, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक यांनी त्याची जागा दाखवून द्यावी .
आदिवासी हे वनवासी नाहीत ते हिंदू पण नाहीत. तरी आज काही आदिवासी संघाच्या कार्यात सामील होऊन स्वतःला वनवासी म्हणतात.ब्रामणविचाराने ते चालतात .ब्राम्हणाकडून पुजा करतात,हिंदू देव देवीची उपासना करतात.वनवासी आश्रमात त्याना आदिवासी लोकाची संस्कृती न शिकवता हिंदू विचारप्रणाली शिकवतात. वनवासी आश्रमात बिरसा विचारांचा क्रांतिकारी युवक उभा राहू नये यासाठी त्यांनी धर्म व जाती यामध्ये मशगुल ठेवतात.योग्य इतिहासाची माहिती त्यांना होऊ देत नाही.
अनुसूचित जमातीचे संविधानिक आरक्षण मिळाले असले तरी ते पूर्णतः मिळत नाही .आज तर एस.सी आणि एस.टीचे आरक्षण समाप्त करण्याचे षडयंत्र राज्यव्यवस्था करत आहे.
या आरक्षणाला हद्दपार करण्यासाठी आदिवासी आणि अनुसूचित जातीतील नेते त्यांना मदत करत आहेत ही फार शोकांतिका आहे. आदिवासीच्या मतावर आपली राजकीय पोळी शेकण्याचा फक्त राजकीय पक्ष वापर करत आहे.हे नक्कीच धोकादायक .
बिरसा मुंडा यांचा वारसा चालवायचा असेल तर तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा सोबत त्यांचे नाते जोडले पाहिजे. जोपर्यंत आपण हिंदू विचारापासून स्वतःला वेगळे करणार नाही तोपर्यंत आदिवासी समाजाचे शोषण होतच राहील. शोषण करणारा हा वर्ग इथला अभिजनवर्ग राहील. हे आपण ओळखले पाहिजेत.
आदिवासी समाजाची उन्नती होण्यासाठी आज आपल्या मुलांना आदिवासी साहित्य ,इतिहास वाचायला दिला पाहिजेत .जोपर्यंत आदिवासी समाजापर्यंत खरा इतिहास पोचणार नाही तोपर्यंत आपला तरुण नव्या भारतात आपली भूमिका वटवणार नाही. जल, जंगल, जमीन यामध्ये आता गुरफटून न राहता आपल्या देशातील सर्व संसाधनावर आपला हिस्सा आहे. तो हिस्सा न मिळाल्यास तो हिसकावून घ्यावा.संविधानातील आर्थिक विकासाचा वाटा मिळावा यासाठी संघर्ष करावा.नव्या उलगुलानासाठी आदिवासी तरूणाने सज्ज राहावे.
आज आदिवासी समाजाला आपले अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यावर विद्रोह करणे हा जननायक बिरसा मुंडाचा करारी बाणा होता . या क्रांतीकारी विचाराची आज नक्कीच बहुजन वर्गातील सर्व माणसाना गरज आहे. थाॅर्नडाईक यांनी म्हटले आहे की,”माणूस विचार करतो ही प्राणिशास्त्र सिध्द बाब आहे आणि माणूस जो काही विचार करतो ती समाजशास्त्रीय बाब आहे.”असेच समाजशास्त्रीय विचार या ग्रंथात आपल्याला पाहावयास मिळतात. भारताला एकसंघ ठेवण्यासाठी बिरसा मुंडाचा क्रांतिकारी व अहिंसक मार्गाचा अवलंब केल्यास आपल्या संपूर्ण भारत एक होऊ शकतो हा आशावाद या चरित्र ग्रंथातून प्रस्फोटीत झाला आहे.
प्रब्रम्हानंद मडावी यांचा
क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा हा वैचारिक चरित्र संग्रह अस्तित्वाचा क्रांतिकारी जीवनपट आहे .बिरसा मुंडा यांच्या जीवनातील क्रांतिकारक घटनांचा मूल्यजागर आहे .या ग्रंथाचे मराठी वाचकांनी स्वागत करावे. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे सामूहिक वाचन करून जनतेपर्यंत पोहोचवावे. हा एवढा लाखमोलाचा ग्रंथ अत्यंत चिंतनात्मक आहे .प्रब्रह्मानंद मडावी यांची एकूणच दृष्टी विचारवेधक, तत्वचिंतक आणि वास्तवगर्भी आहे.चरित्रग्रंथाची भाषा साधी व सोपी आहे .वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. परिशिष्टातल माहिती अनमोल आहे. त्यांची येणारी कलाकृती ही मानवीय समाजाला नवे उन्नयन देणारी असावी अशी आशा आहे. यासाठी लेखकाला पुढील कलाकृतीस मंगलकामना चिंतितो.
– प्रा.संदीप गायकवाड
९६३७३५७४००
पुस्तकाचे नाव: क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा
लेखक – ब्रह्मानंद मडावी
प्रकाशक- हरिवंश प्रकाशन गजानन मंदिर रोड विद्यानगर चंद्रपूर
मुखपृष्ठ- भारत सलाम
मूल्य -१८० रुपये
भ्रमणध्वनी -९२८४२७१९२९